कुंभमेळ्यातील साथीचे आजार गेल्या २०० वर्षापासून हजारो जणांचे जीव घेत आहेत..

एका बाजूला देशभरात कोरोनानं थैमान घातलं असताना दुसऱ्या बाजूला उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये सध्या कुंभमेळा सुरु आहे. देशभरात कडक निर्बंध आहेत, इथं मात्र अनेक आखाड्यांतील लाखो साधू- संत आणि भाविक या कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी गंगा नदीच्या किनाऱ्यावर जमा झाले आहेत. एका ठराविक काळानंतर पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हा देशा-परदेशातील हिंदू भाविकांचा पवित्र आणि शाही स्नानासाठी मेळा आयोजित केला जातो.

प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर तीन वर्षातून एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षात पूर्ण कुंभमेळे भरतात. तर दर ६ वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज येथे अर्धकुंभमेळा भरतो, आणि यानंतर तब्बल १४४ वर्षांनंतर अलाहाबाद येथे महाकुंभमेळा आयोजित केला जातो. अगदी मुघलांच्या काळापासून या कुंभमेळ्याचे संदर्भ आढळतात.

मात्र तेव्हा देखील आणि आज देखील या पवित्र मेळ्याची दुसरी ओळख अगदी आवर्जून सांगितली जाते, तशी टीका देखील केली जाते, ती म्हणजे 

‘आजार पसरवणारा आणि मृत्यू वाढवणारा कुंभमेळा.

१९५९ च्या जागतिक आरोग्य संघटनेनं कॉलरावर प्रकाशित केलेल्या मोनोग्राफ सिरीजला बाराकाईनं बघितलं तर तेव्हा संयुक्त असलेल्या उत्‍तरप्रदेश आणि उत्तराखंड प्रांतात सर्वाधिक मृत्युदर होता. सोबतचं त्यात हे देखील सांगितलं होतं की, हा मृत्युदर त्या-त्या वर्षी सर्वाधिक होता ज्या-ज्या वर्षी हरिद्वार आणि प्रयागराजला कुंभमेळा पार पडला होता.

त्यामुळे सहाजिकच कुंभमेळा त्यावेळी पण सुपर स्प्रेडर होता आणि आज देखील आहे.

काही आकडेवारी बघायची झाल्यास ती अगदी १७८३ सालापासूनची उपलब्ध आहे.

१७८३ साली हरिद्वारच्या कुंभमेळ्यात कॉलराची साथ पसरली होती. त्यावेळी अवघ्या आठच दिवसांमध्ये २० हजार जणांचा जीव गेला होता.

त्यानंतर १८७९ च्या हरिद्वारच्याच कुंभमध्ये कॉलराच्या साथीचा मृत्युदर २ लाख व्यक्तींमागे २०० असा होता. त्यावेळी ३ ते ४ महिन्याच्या काळात १० लाखांहून अधिक भाविक आणि साधू कुंभमेळ्यातील शाही स्नानामध्ये सहभागी होतं असतं.

पुढे १८८२ मध्ये अलाहाबादमध्ये झालेल्या कुंभमध्ये कॉलरा आजार पसरल्यामुळे मृत्युदर दुप्पट होवून २ लाख व्यक्तींमागे तो ४०० असा होता. तर हरिद्वारमध्ये पार पडलेल्या १८८५ च्या अर्धकुंभमध्ये प्रति लाख व्यक्तीमागे १७५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर १८९१ च्या कुंभमेळ्यामध्ये सर्वाधिक एक लाख व्यक्तीमागे ४०० जणांचा मृत्यु झाला होता.

त्यानंतर १९०६ च्या कुंभमध्ये देखील १ लाख जाणांच्या मागे ३०० एवढा मृत्युदर होता. पुढे १९१३ आणि १९१५ या वर्षांमध्ये देखील कॉलरामुळे मृत्युदरात चांगलीच वाढ झाली होती. १९१८ ते १९१९ या वर्षी एका वर्षात देशभरात स्पॅनिश फ्ल्यु ने थैमान घातलं होतं. भारतात त्यात जवळपास १ कोटी ८० लाख नागरिकांचा मृत्यु झाला होता.

मात्र त्यावर्षी देखील कुंभ पार पडला होताच. यामुळे देखील हा आजार पसरण्यास आणि मृत्युदर वाढण्यास कुंभमेळ्यानं एकप्रकारे हातभार लावला होता.

आत्ता देखील कोरोना काळात सर्व स्तरांमधून टिका होतं असताना देखील उत्तराखंडमध्ये कुंभ पार पडत आहे. विशेष म्हणजे एका ज्योतिष्याच्या सांगण्यावरून २०२२ मध्ये होणार कुंभ १ वर्ष आधी आयोजित केला आहे. त्या एका माणसांच्या सांगण्यावरून अशा साथीच्या आजारात देखील महिन्यामध्ये ३० लाखांहून अधिक भाविक कुंभमध्ये सहभागी होण्याचा अंदाज आहे.

गेलेल्या मागच्या अवघ्या ५ दिवसांमध्ये या कुंभमध्ये जवळपास १ हजार ७०० जण बाधित सापडले आहेत. आज देखील १ हजारहुन अधिक जण बाधित सापडत आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दखल घेऊन देखील इथले पोलीस कुंभमुळे कोरोना पसरत नसल्याचं म्हणत आहेत.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.