अवघ्या २५ दिवसात महाराष्ट्र लॉकडाऊनच्या स्थितीपर्यंत येवून पोहचला….

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन लागणार हे नक्की झालेलं आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील जनतेशी संवाद साधून या संदर्भातील घोषणा करणार आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना हा लॉकडाऊन जसा यापूर्वी मार्च-एप्रिल २०२० मध्ये होता तसा असणार असल्याचं सांगितल आहे.

मात्र साधे निर्बंध ते कडक लॉकडाऊन असा प्रवास महाराष्ट्रानं अवघ्या २५ दिवसात पार केला आहे.

साधणार जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात रुग्ण संख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली होती, त्यानंतर पुढच्या २ महिन्यात अशी परिस्थिती आली कि मिशन बिगिन अगेन अंतर्गत शिथिल करत आणलेले निर्बंध पुन्हा लावायला सुरुवात केली. जानेवारीच्या पंधरवड्यात प्रत्येक दिवशी २ हजार पर्यंत सापडत असलेले रुग्ण मार्च महिन्यापर्यंत साधारण ३५ हजार पर्यंत वाढायला लागले. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ लाखांच्या वर पोहचली.

हाच आकडा कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात २७ मार्च २०२१ रोजी साधे निर्बंध लागू केले.

यात मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू केली. रात्री ८ ते सकाळी ७ अशी जमावबंदीची वेळ होती. या वेळेत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई केली होती. तसचं सर्व सार्वजनिक ठिकाणं ( उद्याने आणि समुद्र किनारे ) रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.

लग्न समारंभासाठी ५० तर अंत्यसंस्काराला २० जणांच्या उपस्थितीचे निर्बंध लावले. मॉल, ऑडिटोरियम आणि रेस्टॉरंट्स रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. 

मात्र तरीही हा आकडा कमी आला नाही. १ एप्रिल पर्यंत प्रत्येक दिवशीचा हा आकडा ४३ हजार प्रत्येक दिवशी असा वाढला. याच काळात बेडसाठी पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला. ऑक्सिजन मिळवण्यासाठी धावाधाव सुरु झाली. बऱ्यापैकी बंद केलेले जम्बो कोविड सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्यात आले.

त्यानंतर ४ एप्रिल रुग्ण संख्या प्रत्येक दिवशी ५७ हजार सापडायला सुरुवात झाली. त्यामुळे राज्य शासनाने निर्बंध वाढवायचे ठरवले. अवघ्या १० दिवसांमध्ये लाखभर ऍक्टिव्ह रुग्ण वाढले होते.

४ एप्रिल २०२१ – ब्रेक दि चेनच्या मोहिमेला सुरवात

या दिवसापासून राज्यात मिशन बिगिन अगेन ऐवजी ब्रेक दि चेन हि मोहीम सुरु करण्यात आली. या अंतर्गत दिवसा जमावबंदी आणि रात्री संचार बंदी असं स्वरूप ठेवण्यात आलं. गर्दीची ठिकाण आणि मनोरंजनाची ठिकाण पुन्हा बंद करण्यात आले. थिएटर, मल्टिप्लेक्स, जिम, वॉटर पार्क अशी ठिकाण देखील बंद करण्यात आली. हॉटेल आणि बार केवळ होम डिलिव्हरीसाठी सुरु ठेवण्यात आले.

याच दिवशी ब्रेक दि चेन चा पुढचा टप्पा म्हणून विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.

या काळात महाराष्ट्रात ऑक्सिजनचा देखील तुटवडा जाणवायला लागला होता. त्यासाठी इतर राज्यांकडून ऑक्सिजन आणण्यासाठीच्या पर्यायाची चाचपणी सुरु झाली. केंद्राला तशी विनंती देखील केली गेली. रेमडीसीवरचा प्रचंड तुटवडा जाणवायला लागला.

१० आणि ११ एप्रिल २०२१ – कडक विकेंड लॉकडाऊन

९ एप्रिल २०२१ रोजी राज्यात ५८ हजार नवे कोरोना बाधित आढळून आले होते. त्यामुळे सुट्टीच्या दोन दिवशी ब्रेक दि चेन च्या अंतर्गत कडक लॉकडाऊनची अमलबजावणी सुरु झाली. यात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला.

दारूची दुकानं, इलेक्ट्रॉनिक वस्तू एसी, कूलर, फ्रीज यांच्या विक्री आणि दुरूस्तीची दुकानं, बांधकाम सामुग्रीची दुकानं, फोन, लॅपटॉपची दुकानं बंद ठेवण्यात आली.

सोबतच अत्यावश्यक सार्वजनिक वाहतूक वगळता सर्व वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

१३ एप्रिल २०२१  – मर्यादित लॉकडाऊन

विकेंड लॉकडाऊन नंतर देखील १२ एप्रिल रोजी राज्यात तब्बल ५१ हजार ७०० नवीन रुग्ण आढळून आले. ४ एप्रिल रोजी ४ लाख असलेले ऍक्टिव्ह रुग्ण अवघ्या ९ दिवसांमध्ये ५ लाख ६४ हजारांच्या घरात पोहचले. त्यामुळे ब्रेक दि चेनच्या मोहिमे अंतर्गत ४ एप्रिलला टाकलेले निर्बंध बदलण्याबाबत पुन्हा चर्चा सुरु झाली, आणि राज्यात मर्यादित लॉकडाऊन समोर आला.

१३ एप्रिल रोजी १५ दिवसांसाठी महाराष्ट्रात कलम १४४ लागू केले गेले. त्यानुसार राज्यात संचारबंदीचे आदेश दिले. यात अनावश्यक कारणांसाठी नागरिकांचं बाहेर फिरणं पूर्णपणे बंद केलं गेलं. सोबतच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या. दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. 

सार्वजनिक वाहतूक अत्यावश्यकसाठी सुरु ठेवली गेली. मात्र त्यामुळे किराणा, भाजीपालाच्या नावाखाली लोक बाहेर पडत होते. त्यामुळे राज्य सरकारचा ब्रेक दि चेनचा उद्देश सफल होत नव्हता.

२० एप्रिल २०२१ – कडक लॉकडाऊन

मर्यदित लॉकडाऊन लावून देखील रुग्ण वाढ थांबत नसल्यानं राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार उद्या म्हणजे २१ एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधून याबाबद्दलची माहिती देणार आहेत.

वाढती रुग्णसंख्या थांबवणे आणि आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी करण हा या लॉकडाऊनचा उद्देश असल्याचं आरोग्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे. मागच्या ७ दिवसांमध्ये ऍक्टिव्ह रुग्ण संख्या दीड लाखांनी वाढली आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.