महाराष्ट्रातल्या या गावाने पाकिस्तानला आजवर दोन पंतप्रधान दिलेत..

‘इंदोरे’, नाशिक पासून साधारण पंधरा वीस किलोमीटरवर असणारं छोटंसं गाव. आपल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या इतर खेडेगावा प्रमाणे हे देखील साधंसुधं गाव आहे. छोटी छोटी मंदिरे, एक दर्गा टुमदार घरे आणि हिरवी शेती असंच सगळीकडे दिसणारे चित्र या गावात देखील दिसते.

पण या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे गावाने दोन पंतप्रधान दिलेत. ते हि पाकिस्तानचे.

ऐकून धक्का बसला ना? पण हि गोष्ट खरी आहे.  जस आपल्या देशात गांधी परिवारची घराणे शाही आहे त्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये भुत्तो परिवारची घराणेशाही आहे आणि या भुत्तोंचे गाव म्हणजे इंदोरे.

खरं तर भुत्तो हे मूळचे राजस्थानचे राजपूत. औरंगेजबच्या काळात त्यांचे धर्मान्तर करून मुस्लिम बनवण्यात आलं आणि सिंध प्रांतात धाडण्यात आलं. तेव्हा पासून हा परिवार राजकीय दृष्ट्या प्रभावशाली बनला. अगदी एकोणिसाव्या शतकात इंग्रजांची सत्ता आल्यावर ही त्यांचे महत्व कमी झाले नाही. अत्यंत श्रीमंत समजले जाणारे भुत्तो इंग्रज राजकारणात सक्रिय होते.

या भुत्तोंना देवळाली कॅम्पमध्ये असताना पराक्रम केला म्हणून इंग्रजांकडून नाशिक भागात जहागिरी मिळाल्या होत्या.

यापैकी इंदोरे गावात त्यांच्या शेतजमिनी होत्या. त्या त्यांनी गावातल्या कुळांना कसायला दिलेल्या होत्या. या शेतात दोन मोठ्या बारव देखील होत्या. इंदोरे मध्ये हनुमान मंदिराजवळ भुत्तोंचा मोठा बंगला होता. इंदोरे गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला आजही भुत्तो खानदानाची दफनभूमी नजरेस पडते. 

याच परिवारात शाहनवाज भुत्तो यांचा जन्म झाला. त्यांचे बंधू नवाब नबी बक्स खान भुत्तो हे राजकारणात सक्रिय होते. शाहनवाज भुत्तो हे गुजरातच्या जुनागढ संस्थानचे दिवाण होते. शाहनवाज भुत्तो कित्येक वर्षे इंदोरे येथे राहण्यास होते असं गावकरी सांगतात. नाशिक येथे नगरपालिका स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

ते जेव्हा जुनागढला गेले तेव्हा त्यांनी शेतसारा गोळा करण्यासाठी रानडे नावाच्या वकिलांची नियुक्ती त्याकाळात केली होती.  

शाहनवाज भुत्तो यांना एकूण चार मुले होती. यातला सर्वात धाकटा मुलगा म्हणजे झुल्फिकार अली भुत्तो. हा हुशार होता. तो वाढला मुख्यतः मुंबईत. शिक्षण इंग्लंड आणि अमेरिकेला झालं.

झुल्फिकार भुट्टो ऑक्सफर्डला शिकायला असताना भारत स्वतंत्र झाला. फक्त स्वतंत्र झाला नाही तर पाकिस्तानची निर्मिती देखील झाली. झुल्फिकार अली भुत्तोंचे वडील शाहनवाज हे पाकिस्तानच्या बाजूचे होते. त्यांच्याच आग्रहामुळे जुनागढच्या नवाबाने पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला होता मात्र वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्न्नांमुळे हे शक्य झाले नाही. जुनागढच्या नवाबाला देश सोडून जावे लागले. शाहनवाज भुत्तो देखील पाकिस्तानच्या सिंधला गेले.

त्यांचा मोठा मुलगा मुंबईमध्ये वकिली करायचा. त्याचा परिवार मात्र भारतातच राहिला. इंग्लंडमध्ये शिकणारे झुल्फिकार अली भुत्तो सुट्टीला म्हणून आपल्या भावाकडे यायचे. त्यांना इथल्या फिल्मइंडस्ट्रीचे मोठे आकर्षण होते. असं म्हणतात कि मधुबालावर त्यांचं प्रचंड प्रेम होत. मुघल ए आझम च्या शूटिंगच्या सेटवर ते तासन तास बसून असायचे.

विशेष म्हणजे त्यांची या पूर्वी २ लग्ने झाली होती. त्यांची दुसरी पत्नी नुसरत या काळात प्रेग्नन्ट होती. पण दिलीप कुमारच्या प्रेमात असलेल्या मधुबालाने झुल्फिकार भुत्तोंना नकार दिला.  

या काळात झुल्फिकार अली भुत्तो यांचे इंदोरे येथे येणे जाणे असायचे. गर्भवती पत्नीला आराम व हवापालट म्हणून ते इंदोरे इथल्या बंगल्यावर घेऊन आले होते.

पण दुर्दैवाने अचानक झुल्फिकार अली यांचे मोठे बंधू इमदाद अली यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण भुत्तो परिवाराने पाकिस्तानला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. झुल्फिकार अली आणि नुसरत यांना कराचीमध्ये जाताच कन्यारत्न झाले. तिचे नाव ठेवण्यात आले बेनझीर.

पाकिस्तानला जाताना त्यांनी इंदोरे गावात वाढत असलेला दुष्काळ पाहून आपली सर्वात मोठी बारव गावाला बक्षीस म्हणून देऊन टाकली.

याच पाण्यावर तिथली शेती जगली. गावक-यांचे पशुधनही या विहिरीवर आपली तहान भागवत आंघोळ करत असे बारवमध्ये उत्तरण्यासाठी पाय-यांचा जीना ही बांधलेला होता. कालंतराने गावक-यांनी बारवमध्ये जाण्याची ही वाट बुझविल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जाते.  

old welll 20180586303

पुढे झुल्फिकार अली भुत्तो राजकारणात गेले. वडिलांच्या वजनामुळे आणि उच्चशिक्षित असल्याने पाकिस्तानमधल्या  बुध्दिवादी वर्गासोबतही त्यांची उठबस होती. १९५७ साली त्यांना संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. येथुन राजकारणातल्या पायऱ्या भुट्टो वेगाने चढले. लष्करशाही नष्ट करून पाकिस्तानमध्ये लोकशाही स्थापन करण्याचा मान त्यांनाच जातो.

पाकिस्तानचे पंतप्रधान झाले, राष्ट्राध्यक्ष देखील झाले. पुढे मात्र त्यांना तिथल्या लष्कराने फासावर चढवले आणि सत्ता आपल्या हाती घेतली.

झुल्फिकार अली यांचा वारसा त्यांच्या मुलीने म्हणजे बेनझीरने पुढे चालवला. त्या देखील दोन वेळा पंतप्रधान बनल्या. त्यांच्या मृत्यूनंतर असं म्हणतात की काकांचे निधन झाले नसते तर बेनझीर भुत्तो इंदोरे गावातच जन्मल्या असत्या.

पाकिस्तानसारख्या कट्टर पंथीयांच्या देशात एक महिला पंतप्रधान बनते हे जगभरात कौतुकास्पद मानले गेले. इंदिरा गांधींशी त्यांची तुलना केली गेली.

त्यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यावर आपल्या गावची लेक म्हणून इंदोरे मधल्या गावकऱ्यानी मिठाई वाटली असल्याचं सांगितलं जातं. बेनझीर याना देखील आपल्या पूर्वजांनी वास्तव्य केलेल्या गावाबद्दल आत्मीयता होती. भुत्तो कुटुंबाचे आणि इंदोरे गावाच्या मातीचं नातं अनेक वर्षांपासूनच असल्यामुळे त्यांचा ऋणानुबंध देखील तसाच घट्ट होता. त्यांचा बॉम्बस्फोटात खून झाल्यावरही गावात शोककळा पसरली होती.

आजही देशभरात नाशिकचं इंदोरे हे बेनझीर यांचं गाव म्हणून फेमस आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.