चर्चेसाठी बोलावून घेतलं आणि टिकैत यांनी भर सभेत मुख्यमंत्र्याचा अपमान केला

आपल्या देशात शेती, शेतकरी आणि त्यासंबंधीचा राजकारण हे फार पूर्वीपासून चालत आलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून ते लोकसभेपर्यंत मत मागताना पण शेती याच प्रश्नाला प्राधान्य दिला जातो. पुढे कोणत्याही पक्षाचं सरकार आलं आणि त्याचे कोणीही पंतप्रधान, मुख्यमंत्री झाले तरी ते शेतकऱ्याला हलक्यात घेण्याचं धाडस करताना दिसत नाहीत.

पण याला अपवाद ठरला तो उत्तरप्रदेशच्या एका माजी मुख्यमंत्र्यांचा.

त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हलक्यात तर घेतलंच, शिवाय त्यांच्याच पोलीस प्रशासनाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता.

आपल्या पांढऱ्या कुर्त्याला हिसका देत पायावर पाय टाकून हे मुख्यमंत्री सोफ्यावर बसले कि त्यांच दिवसभराचं काम सुरु व्हायचं. आपल्या अस्सल गोरखपूरी भाषेत ते अधिकाऱ्यांना आदेश द्यायचे, सूचना करायचे. अशा व्यक्तिमत्वामुळे त्यांच्या वागण्यात एक वेगळाच रुबाब जाणवायचा. अश्या  रुबाबदार मुख्यमंत्र्यांचं नाव म्हणजे वीर बहादूर सिंग.

पण त्यांच्या याच रुबाबाला जमिनीवर आणताना प्रसंगी मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचं धाडस दाखवलं ते जेष्ठ शेतकरी नेते कै. महेंद्रसिंग टिकैत यांनी. 

हुक्का गुडगुडी ओढणारे, आपल्या भाषेत बोलणारे, आणि शेतकऱ्यांसाठी दिल्लीला देखील झुकवायची ताकद असणारे महेंद्रसिंग टिकैत लोकांना आपल्यातीलच एक वाटायचे. त्यांच्या भाषणातून आणि वागण्यातून शेतकऱ्यांप्रतीचा जिव्हाळा कोणताही दिखावेपणा न करता दिसून यायचा.

त्यांनी एकदा का शेतकऱ्यांसाठी आंदोलनाची हाक दिली की कोणतंही राज्य असो तिथल्या प्रशासनाला धडकी भरलीच म्हणून समजायची. त्यांच्या एक हाकेवर हजारो शेतकरी रस्त्यावर उतरायचा. हीच त्यांची खरी ताकद होती.

गोष्ट आहे १९८७. राजीव गांधी यांच्या खास मर्जीतले असलेले वीर बहादूर तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. शासनाने वीजेची दरवाढ घोषित केली होती, यात शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा देखील समावेश होता. ही अन्यायकारक दरवाढ मागे घ्यावी म्हणून शेतकऱ्यांनी मागणी केली होती.

पण शासन वारंवार ही मागणी नामंजूर करत होते. त्याच दरम्यान हरियाणामध्ये देवीलाल यांच्या नेतृत्वात वीज बील जमा न करण्याचं आंदोलन चालू होतं. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महेंद्रसिंग टिकैत यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची हाक दिली. शामली जिल्यातील करमुखेडी वीजगृहाच्या बाहेर हजारोंच्या संख्येने जमले.

थोड्याच दिवसात आंदोलनाने मोठं स्वरूप घेतलं, शेतकरी शांत होते पण वाढती संख्या पाहून परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर जात होती. नाइलाजाने पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात २ शेतकऱ्यांच्या मृत्यू झाला. यामुळे राज्यातील इतर शेतकरी देखील आंदोलनात उतरले. बघता बघता संख्या लाखोंच्या घरात गेली.

देशातील मीडियासह विदेशातील मीडिया देखील हे आंदोलन कव्हर करायला पोहचली होती.

अखेरीस मुख्यमंत्री वीर बहादूर सिंग यांनी आंदोलनाची दखल घेत टिकैत यांना ११ शेतकऱ्यांच शिष्टमंडळ घेऊन चर्चेला येण्याचे आदेश दिले.

पण टिकैत यांनी उलटटपली उत्तर पाठवलं,

मुख्यमंत्र्यांना चर्चा करायची असल्यास त्यांनी येवून भेटावं. 

झालं देखील असचं. मुख्यमंत्र्यानी एक पाऊल आणखी पुढे येत चर्चेदरम्यान काहीतरी घोषणा करण्याची इच्छा देखील व्यक्त केली. पण टिकैत यांनी इथं एक अट ठेवली की, बैठकीत काँग्रेस पक्षाचा झेंडा किंवा कार्यकर्ता कोणीही नसेल. तसेच पोलीस सुद्धा नसतील. वीर बहादूर तरी सुद्धा तयार झाले.

११ ऑगस्ट १९८७ रोजी जेव्हा वीर बहादुर सिंग यांचं हेलिकॉप्टर टिकैत यांच्या सिसोली गावाजवळ उतरलं, तेव्हा तिथं त्यांच्या स्वागताला कोणीच उपस्थित नव्हतं. तिथून बैठकीच्या ठिकाणापर्यंत अर्धा किलोमीटर चालत यावं लागलं.  

मुख्यमंत्री जेव्हा तिथं पोहचले तेव्हा समोर हजारो शेतकरी होते, पण काँग्रेस पक्षाचा एक ही कार्यकर्ता नव्हता. आपल्या शेतकऱ्यांवर केलेल्या गोळीबाराचा निषेध म्हणून त्यावेळी चर्चेला आलेल्या मुख्यमंत्र्यांना टिकैत यांनी साधी खुर्ची देखील देवू केली नाही. रुबाबदार मुख्यमंत्री भर उन्हात एक तास उभे होते. 

जेव्हा मंचावर त्यांनी पाणी मागितलं तर टिकैत यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना दोन्ही हाथ पुढे करायला लावून ओंजळीत पाणी देवू केलं. 

वीर बहादुर सिंग यांच्यासाठी हा प्रचंड मोठा अपमान होता. टिकैत एवढ्यावरच थांबले नव्हते. भाषणा  दरम्यान देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना बऱ्याच कानपिचक्या दिल्या. चर्चेला बोलवून हजारो शेतकऱ्यांसमोर केलेला हा अपमान त्यांच्या एवढा जिव्हारी लागला की ते कोणतीही घोषणा किंवा चर्चा न करताच लखनऊला परतले होते.

पण त्याहून जास्त टिकैत यांच्या जिव्हारी लागला होता आंदोलनातील शेतकऱ्यांचा मृत्यू.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.