घराणेशाही असावी तर टिकैत यांच्यासारखी, बापाचं नाव काढणारा पोरगा…!

टीव्हीवर एक नेता धीरगंभीर आवाजात ‘एकवेळ आत्महत्या करेन पण आंदोलन मागे घेणार नाही’ असा निश्चय व्यक्त करताना दिसला. त्याच्या डोळ्यात शेतकऱ्यांप्रती तळमळीचे अश्रू होते. यानंतर शेतकऱ्यांनी त्या नेत्याच्या निश्चयाला आणि अश्रुना नुसता सकारात्मक प्रतिसादच दिला नाही तर सामानाची आवारावर केलेले शेतकरी पुन्हा एकदा नव्या दमाने आंदोलनात सहभागी झाले.

कोणाचा होता हा आवाज? तो आवाज होता सध्या शेतकरी आंदोलनाचा चेहरा बनलेले,

भारतीय किसान यूनियन (टिकैत) गटाचे राष्ट्रीय प्रवक्ता

राकेश टिकैत

यांचा. 

राकेश टिकैत यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं आणि त्यासाठी लढण्याचं बाळकडू आपले वडील आणि जेष्ठ शेतकरी नेते कै. महेंद्र सिंह टिकैत यांच्याकडून मिळालं आहे. माजी पंतप्रधान चरणसिंग यांच्यानंतर महेंद्रसिंग टिकैत हे देशातील सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नेते होते.

महेंद्रसिंग यांच्या एका आवाजावर शेतकरी दिल्लीच्या सत्तेला आव्हान द्यायचे. आणि नुसतं आव्हानच द्याचे नाहीत तर आपल्या मागण्या मंजूर करून घेतल्याशिवाय मागे हटत नसत. महेंद्रसिंग टिकैत यांचे आंदोलन म्हणजे चिवट शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन असं म्हंटल जायचं.

ते जवळपास २ दशक भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.

१९८७ मध्ये उत्तरप्रदेशमधील शामली जिल्यातील करमुखेडीमध्ये वीजबिल प्रश्नी आंदोलन करत असताना पोलिसांच्या गोळीबारात दोन शेतकऱ्यांना गोळी लागली, याच घटनेनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भारतीय किसान यूनियनची स्थापना झाली. महेंद्रसिंग टिकैत याचे अध्यक्ष होते.

याच भारतीय किसान युनियनमधून राकेश टिकैत यांच्या शेतकरी चळवळीची सुरुवात झाली. 

राकेशसिंग टिकैत यांनी मेरठ विद्यपीठामधून एमए पूर्ण करून वकिलीचा शिक्षण घेतलं. १९८५ मध्ये लग्न झाल्यानंतर त्याचवर्षी ते दिल्ली पोलीसमध्ये कॉन्सटेबल म्हणून भरती झाले. पुढे प्रमोशनने पोलीस उपनिरीक्षक झाले.

त्याच दरम्यान ९० च्या दशकात दिल्लीच्या लाल किल्ल्यावर महेंद्रसिंग टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकरी आंदोलन चालू होते. अशावेळी सरकारी सेवेत असलेल्या राकेश टिकैत यांच्यावर वडिलांचं आंदोलन संपवण्यासाठी प्रशासनाकडून दबाव वाढू लागला. वरिष्ठ अधिकारी कार्यलयात बोलवून सुनावू लागले.

त्याच वेळी त्यांनी पुढचा मागचा विचार न करता तिथंच नोकरीचा राजीनामा लिहून दिला आणि पोलिसांची नोकरी सोडून वडिलांच्या शेतकरी आंदोलनात सहभागी झाले.

यानंतरच त्यांच्या शेतकरी चळवळीला सुरुवात झाली. बघता बघता ते देशभरातील शेतकऱ्यांचा चेहरा बनले. वडिलांचा वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहू लागले. 

शेतकऱ्यांसाठी केसेस अंगावर घ्यायला आणि तुरुंगात जायला ते मागे पुढे बघत नसत. आज पर्यंत ते तब्ब्ल ४४ वेळा तुरुंगात गेले आहेत. यात मध्यप्रदेशमध्ये जमीन अधिग्रहण कायद्याच्या विरोधात केलेल्या आंदोलनादरम्यान ते ३९ दिवस तुरुंगात होते. दिल्लीत संसद भवनाच्या बाहेर ऊस दरासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान त्यांना सरकार विरोधात निदर्शन केल्याने तिहारच्या तुरुंगात पाठवले होते. देशभरातील अशी क्वचितच कारागृह असतील जिथं राकेशसिंग टिकैत यांची रवानगी केली नसेल.

या दरम्यान त्यांनी दोन वेळा निवडणूक देखील लढवली आहे.

२००७ मध्ये त्यांनी मुजफ्फरनगरच्या  खतौली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. पण विजय मिळवू शकले नाहीत. यानंतर २०१४ साली अमरोहामधून राष्ट्रीय लोक दल पक्षाकडून लोकसभेची देखील निवडणूक लढवली पण इथं देखील त्यांचा पराभव झाला.

२०११ साली वडील महेंद्रसिंग टिकैत यांच्या कॅन्सरने मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा नरेश टिकैत यांना त्यांच्या बालियाना खापच्या नियमानुसार भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले तर राकेश टिकैत यांच्यावर राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली गेली.

पण असं असलं तरी देखील वास्तविक स्वरूपात भारतीय किसान यूनियनची संपूर्ण जबाबदरी ही राकेश टिकैत यांच्यावरच आहे. संघटनेचे सर्वच व्यावहारिक आणि धोरणात्मक निर्णय राकेश टिकैतच घेतात.

आजच्या चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाची संपूर्ण रुपरेषा टिकैतच ठरवत आहेत. सध्या ते या शेतकरी आंदोलनाचा चेहरा बनले आहेत. दिवसरात्र ते आंदोलनात पाय रोवून उभे आहेत. वडिलांसारखचं काहीही झालं तर मागे न हटण्याचा निश्चय त्यांनी २६ जानेवारीच्या हिंसाचारानंतर व्यक्त केला आहे.

या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसेमुळे आता त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. ज्या दिल्ली पोलीसमध्ये टिकैत एकेकाळी सेवेत होते त्याच दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या ३९५ (लूटमार) ३९७ (लुटमारीचा प्रयत्न, जखमी करणे), १२० बी (गुन्हेगारी षडयंत्र रचणे असे गुन्हे दाखल झाले आहेत.

यानंतर देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.