टिळकांनी पाहिलेले स्वप्न मामारावांनी पूर्ण केलं आणि पहिला देवनागरी प्रिंटर बनवला…

मराठी भाषा आणि तिच्याविषयी बोलणारे अनेक जण आपल्याला दिसतात. मराठी भाषा वाचली पाहिजे, टिकली पाहिजे, जपली पाहिजे वैगरे वैगरे. अगोदर मराठी भाषा प्रिंटरवर टाईपचं करता येत नसायची पण

शंकर रामचंद्र दाते म्हणजे मामाराव दाते यांनी मराठी भाषेतील मजकुराचे आधुनिक पद्धतीने मुद्रण करण्यासाठी यांत्रिक प्रणाली विकसित केली. या मुद्रणतज्ञामुळे मराठी पुन्हा नव्या जोमाने लिहिली जाऊ लागली.

तर मामाराव दाते यांनी इतकी मोठी मजल कशी मारली त्याबद्दल जाणून घेऊया.

28 सप्टेंबर 1898 मध्ये शंकर रामचंद्र दाते यांचा जन्म झाला. त्यांचं बालपण व प्राथमिक शिक्षण संगमनेर तालुक्यातील अश्‍वी या गावी झालं. त्यानंतरचे शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि स.प. महाविद्यालयात झालं. लोकसंग्रह दैनिकात संपादकीय आणि व्यवस्थापकीय अनुभव घेतल्यावर १९२९ सालापर्यंत त्यांनी स्वत:च्या मालकीचा, लोकसंग्रह छापखाना चालविला व पुढे तो पुण्याच्या अनाथ विद्यार्थी गृहाला (पुणे विद्यार्थी गृह) विकला.

देवनागरी लिपी यांत्रिक पद्धतीने जुळविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात अनेकांनी प्रयत्न केले होते. देवनागरी लिपीतील मुळाक्षरांना त्यांच्या डोक्यावर मात्रा किंवा वेलांटी, तसेच अक्षराच्याखाली उकार किंवा ऋकार असे प्रत्यय लावले जातात त्यामुळे ते मुद्रणात कसं उतरेल यावर शंका होती आणि काहींनी तर डिक्लेर केलं होतं की असं काही घडूच शकत नाही. मुद्रणाच्या दृष्टिकोनातून ही जुळणी तीन मजली ठरते. रोमन लिपीतली जुळणी ही केवळ एकाच मजल्याची असते. त्यामुळे त्या लिपीसाठी तयार केलेल्या यांत्रिक प्रणालीमध्ये देवनागरी जुळणी होण्यात ही तीन मजली रचनाबंधाची मुख्य अडचण होती. शिवाय, रोमन अक्षरांची संख्या २६. त्यांची जुळणी एकापुढे एक अक्षर टाकून करता येते. पण देवनागरी बाबतीत जरा अवघड दिसत होतं.

मराठीत स्वर १२ व व्यंजने ३६. त्याव्यतिरिक्त, डोक्यावरच्या वेलांटीमध्ये किंवा पायाकडच्या उकारातही ऱ्हस्व, दीर्घ असे पर्यायही आहेतच. दाते यांनी या अडचणी ध्यानात घेऊन आपली प्रणाली विकसित करण्याचे ठरवले.

परदेशात तयार झालेल्या यंत्रावरच आपली लिपी कशी बसवता येईल. याचाच विचार तोवर प्रामुख्याने केला जात असे. लायनो यंत्रावर देवनागरी लिपी बसवण्यासाठी लो.टिळकांचे १९०४ सालापासूनच प्रयत्न चालू होते. लायनो यंत्रावर ९० प्रकारच्या मातृका बसविल्या होत्या. पण देवनागरी लिपीतील अक्षरांची संख्या पुष्कळ होती. टिळकांच्या योजनेत ११३ म्हणजे २३ जास्तच होत्या. त्यानंतर मोनोटाइप यंत्रे सुरू झाली. या यंत्रावर २२५ अक्षरे बसू शकत होती.

का. अ. खाजगीवाले यांनी आपल्या लेखात दाते यांची ही मेहनत लिहून काढली होती. दात्यांनी टिळकांची योजना अभ्यासली. जर्मनीत टायपोग्राफ यंत्रावर एका मातृकेवर दोन-दोन अक्षरे बसविण्यात आली होती, असे त्यांना समजावलं. त्यामुळे १८० अक्षरांत देवनागरी लिपीची जुळणी चांगल्या रीतीने करणे शक्य आहे, असं दात्यांना वाटलं. पण त्या कंपनीने त्यांच्याशी तडजोड केली नाही आणि सहकार्य सुद्धा केलं नाही. त्यामुळे मामाराव दाते तडक इचलकरंजीकरांच्या शिष्यवृत्तीच्या साहाय्याने ते इंग्लंडला मोनोटाइप यंत्रे करणाऱ्या कंपनीस आपली योजना समजावून सांगण्यास गेले. त्या कंपनीने आधी त्यांनी केलेल्या अयशस्वी प्रयोगांची माहिती दिली व यापेक्षा काही निराळी योजना असली, तरच सहकार्याचे आश्वासन दिले.

दात्यांनी रेडहिल या गावातील त्यांच्या प्रयोगशाळेत काही प्रयोग स्वत: करून ‘कर्ण’ (कर्निंग) पद्धत सुचविली. त्यांनी ज्या सुविधा रोमन लिपीच्या बाबतीत रूढ आहेत, त्यांचाच देवनागरीसाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला तर देवनागरी लिपी मोनोटाइप यंत्रावर बसू शकेल, हे निरनिराळ्या चित्रांच्या साहाय्याने प्रतिपादित केले.

ते तज्ज्ञांना तांत्रिकरीत्या पटले. म्हणून प्रथम दहा अक्षरे व स्वरचिन्हे यांच्या रेखाकृती, पंच तयार केले, नंतर त्यांच्या ओळीच्या मातृका तयार केल्या. मजकूर व्यवस्थित छापला गेला. प्रयोग यशस्वी झाला.

प्रश्‍न होता या मातृका कशा बसवावयाच्या हा. त्यांनी वारंवार येणाऱ्या अक्षरांची संख्या किती, स्वरचिन्हांची संख्या किती, याचा तौलनिक अभ्यास केला व २२ मातृका तयार करवून त्या कळफलकावर कुठे व कशा बसवावयाच्या, याची योजना आखून कळफलक तयार केला.

याच तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी स्वतःच्या ‘काळ’ या दैनिकाच्या छपाईसाठी मजकुराची जुळणी करण्यासाठी सुरू केला. ‘काळ’चे संपादनही तेच करीत. त्यांच्या या उपक्रमामुळे मराठी भाषेच्या मुद्रणव्यवस्थेत क्रांतीच झाली. मुद्रण शिक्षण विद्यालय, पुणे मुद्रक संघ व महाराष्ट्र मुद्रण परिषद या संस्थांचेही ते खंदे कार्यकर्ते होते. सतत नवनवीन प्रणाली विकसनाचेच कार्य त्यांनी शेवटपर्यंत केले. 18 जानेवारी 1992 रोजी दाते यांचे निधन झाले पण त्यांनी मराठी भाषेला अमूल्य देणगी दिली.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.