मोदींवर टीकेची संधी न सोडणाऱ्या ममता बॅनर्जी शांत झाल्या, काही सेटिंग झाली का?
राजकारणात कोणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो हे सगळ्यांना माहितेय. मात्र राजकीय मैत्रीत किंवा शत्रुत्वात अचानक बदल होत असेल तर नक्कीच शंका निर्माण होते. असंच काहीसं ममता बॅनर्जी यांच्या बाबतीत घडतंय.
नेहमी मोदींवर आगपखड करणाऱ्या ममता बॅनर्जी अलीकडच्या काळात मोदींवर टीका करणं टाळलंय, एवढंच नाही तर काही वेळेस मोदींची वाहवाही करणारी विधानं सुद्धा त्यांनी केलीत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचे सूर अचानक का बदललेत यावरून विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर टीका केली जातेय.
बॅनर्जींचे अलीकडच्या काळातले काही विधान पाहिल्यास याची जाणीव होते.
१. त्यांनी अलीकडेच म्हटलंय की, विरोधी पक्षतील नेत्यांच्या विरोधात ईडी आणि सीबीआयकडून जी कारवाई केली जात आहे त्यात पंतप्रधान मोदी हे जबाबदार आहेत असं त्यांना वाटत नाही.
२. सीबीआय आता पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयांतर्गत येत नाही. याचे अधिकार आत गृह मंत्रालयाकडे देण्यात आले आहेत. कोलकात्यात ईडीने मागील एका महिन्यात १०८ खटले दाखल केले आहेत आणि २१ धाडी टाकल्या आहेत. हे काम मोदी करत नसून भाजपचे स्थानिक नेते करत आहेत.
ममता बॅनर्जींच्या या मोदींना अनुकूल असलेल्या विधानांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी टीका केलीय.
सीपीआय आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बॅनर्जींवर मोदींना क्लीन चिट देण्याचा आरोप लावलाय. तसेच केंद्र सरकारकडून विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी स्वायत्त संस्थांचा वापर केला जात असतांना ममतांचे हे विधान योग्य नाहीत असंही त्यांनी म्हटलंय. विरोधक असं मानतात की जोपर्यंत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह तपास यंत्रणांना आदेश दिल्याशिवाय तपास यंत्रणा असं करूच शकत नाहीत.
ममता बॅनर्जी एकेकाळी एनडीएमध्ये होत्या त्यामुळे काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी बॅनर्जींना उजव्या विचारांची समर्थक म्हणून त्यांच्यावर हल्ला चढवलाय.
पण ममता बॅनर्जीं शांत झाल्या असल्या तरी त्यांच्या पक्षात आणि राज्यात शांतात नाही.
एकीकडे टीएमसीचे जनरल सेक्रेटरी अभिषेकी बॅनर्जी यांच्यावर तपास यंत्रणांची कारवाई सुरु आहे. शिक्षक भर्ती घोटाळ्याच्या आरोपाखाली तृणमूलचे दोन माजी मंत्री पार्थ चॅटर्जी आणि परेशचंद्र अधिकारी जेल मध्ये आहेत. तसेच पार्टीचे मोठे नेते अनुब्रत मंडळ हे सुद्धा तपास यंत्रणांच्या ताब्यात आहेत.
तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या तिजोरीत खडखडाट होत आहे. मुळात आर्थिक प्रगती नसलेल्या राज्याच्या तिजोरीत येणारे पैसे जीएसटीमुळे बऱ्याच प्रमाणात आटलाय. त्यामुळे राज्य चालवणे आणि वेगवेगळ्या योजनांवर होणार खर्च कुठून करायचा हा प्रश्न आहे. सोबतच महाराष्ट्रात शिवसेना पक्षात जशी बांधखोरी झाली तशीच बंडखोरी तृणमूलमध्ये तर होणार नाही ना याची बॅनर्जींना चिंता लागली आहे.
मग पक्षात इतकं संकट आलं असतांना ममता बॅनर्जींनी मोदींच्या नावाने टीका करणे का बंद केलंय? त्यामुळे विरोधी पक्ष ममता बॅनर्जींच्या या शांततेवर शंका घेत आहेत.
तृणमूलचे अनेक नेते आणि ममता बॅनर्जींचा भाचा अभिषेक बॅनर्जी याच्याविरोधात सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करण्याच्या स्वतःच्याच टीका ममता बॅनर्जींनी बंद केल्यात आणि पंतप्रधान मोदींना यातून क्लीन चिट दिलेली दिसते.
पण खरंच असं झालंय का? कारण २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात जोरदार लढाई लढून ममता बॅनर्जींनी बाजी जिंकली होती. पण आता त्याच ममता बॅनर्जी कोणतीही टीका न करण्याचं धोरण स्वीकारत आहेत.
एकेकाळी याच ममता बॅनर्जी सभा आणि बैठकांमध्ये मोदींना ताटकळत ठेवत होत्या. तसेच अनेक बैठकांमध्ये एकतर गैरहजर राहत होत्या किंवा त्यातून निघून जात होत्या. कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींच्या फोटोला त्यांनी मोठा विरोध केला होता. तसेच मोदींच्या विरोधात आहेच कोण असा प्रश्न विचारला जात असतांना त्या ठामपणे विरोधी पक्षाच्या नेत्या म्हणून उभ्या होत्या.
मात्र काही महिन्यापासून ममता बॅनर्जींनी मोदींवर जाहीररीत्या टीका करणं कमी केलंय. तर त्याऐवजी राज्यातील भाजप नेत्यांवर टीका करत आहेत. २१ जुलै २०२२ ला निघालेल्या तृणमूलच्या मेगा रॅलीत ममता बॅनर्जींनी मोदींच्या नावाचा उल्लेख सुद्धा केला नाही.
पण ममता बॅनर्जींच्या भूमिकेत बदल होण्याची सुरुवात नेमकी झाली कुठून?
जेव्हा भाजपने उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून जगदीप धनखड यांच्या नावाची घोषणा केली तेव्हा तृणमूलने धनखड यांचा विरोध न करण्याचा पवित्र घेतला होता. धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते त्यामुळे ममता या नेहमी राज्यपाल धनखड यांच्यावर सहकार्य न करण्याचे आरोप लावत होत्या. पण निवडणुकीत त्यांनी या वादापासून स्वतःला लांब ठेवलं आणि उपराष्ट्रपती म्हणून धनखड यांना समर्थन दिलं होतं.
तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ममता बॅनर्जींनी एक विधान केलं होतं ज्यात त्यांनी “आरएसएस मध्ये प्रत्येक व्यक्ती वाईटच असत असं नाही” असं म्हटलं होतं. तेव्हा काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी ममता पूर्वीप्रमाणे एनडीएबद्दल आत्मीयता बाळगत आहेत अशी टीका केली होती. त्यानंतर ममतांनी नरेंद्र मोदींवर कोणत्याही प्रकारची जाहीर टीका केलेली नाहीय.
पक्षातील नेत्यांवर चालू असलेल्या चौकशांमुळे ममतांनी ही मवाळ भूमिका घेतलीय असं सांगितलं जातं.
त्यामुळे त्यांच्या या भूमिकेवर शंका घेतली जात आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ममता बॅनर्जी आणि मोदींची एक बैठक झाली होती. त्यामुळे दोघांमध्ये या मुद्यावरून सेटिंग झालीय अशा प्रकारच्या राजकीय अफवांना ऊत आला होता. त्यात अशी चर्चा केली जात होती की आजपर्यंत ममता ज्या पद्धतीने मोदींना पर्याय म्हणून स्वतःला समोर ठेवत होत्या. त्यात आता बदल होईल का.
कारण एकीकडे आपचे अरविंद केजरीवाल मोदींच्या समोर उभे राहत आहेत. ते भाजप आणि काँगेसला हरवण्यासाठी दुसऱ्या कोणत्याच पक्षाचं नेतृत्व स्वीकारायला तयार नाहीत.
तर दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे सुद्धा त्यांचा एजेंडा राबवत आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जींसाठी राष्ट्रीय पातळीवर उतरणे अधिक कठीण असेल.यामुळे असा निष्कर्ष काढला जात आहे की, जर ममता मोदींच्या विरोधात भूमिका घेत असतील तर त्यांचंच नुकसान होण्याची शक्यता आहे.
कारण एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे तर दुसरीकडे शिवसेनेत झालेल्या बंडखोरीप्रमाणे भाजपकडून तृणमूलमध्ये बंडखोरी घडवून आणण्याचा धोका आहे. तेव्हा मोदींना टार्गेट न करणे ममतांच्याच फायद्याचं ठरू शकते असं राजकीय जाणकार सांगतात.
सध्या ममतांनी जी मवाळ भूमिका घेतलीय ती कोणत्या कारणास्तव घेतली याचे कारण येत्या काळात ममतांच्या विधानामुळे आणि राजकीय बदलांमुळे स्पष्ट होईल.
हे ही वाच भिडू
- ममता बॅनर्जींच्या विजयाची वाट भाजपनेच सोपी केली होती…
- भविष्याचा विचार करून अदानी समूह ममतांसोबत भेटीगाठी वाढवतंय
- ममता दीदींचा राजकीय इतिहास पाहता, दीदींसाठी ‘दिल्ली अभि भी बहोत दूर है’