मोदींच्या भविष्यवाणी वरून कळेल, इंग्लिश बिंग्लिश काय नसतंय… काम महत्वाचं

७ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात बदल आणि विस्तार केला. आता त्या बातम्या पेपरचे कॉलम भ-भरून आल्या. इतक्या की, अनेक मंत्र्यांकडून राजीनामा घेण्यात आले, मंत्रिमंडळात नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला, वगैरे वगैरे.

पण यातले एक मंत्री असे आहेत ज्यांना राज्यमंत्री पद मिळाल्या मिळाल्या सोशल मीडियावर  ट्रोल केलं जातंय.

हे ट्रोल होणारे राज्यमंत्री आहेत मनसुख मंडाविया…

आता हे ट्रोल का होत आहेत ? तर यातलं पहिलं कारण म्हणजे

पहिल्यांदा तर, मोदी सरकारने मांडवीय यांच्यावर आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यासाठी डॉक्टर हर्षवर्धन यांना काढून टाकलं. आणि दुसरं कारण म्हणजे मनसुख मंडाविया यांचे काही जुने ट्वीट. आणि विशेष म्हणजे मंडाविया यांनी हे ट्विट आपल्या ट्विटरवरुन डिलीट केलेत.

या ट्वीटवरुन मनसुख मंडावियांची बेक्कार खिल्ली उडविली जात आहे. त्यांना खरं तर त्यांच्या कच्च्या इंग्लिशमुळे ट्रोल केलं जातंय. गुरुवारी ८ जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मनसुख मांडवीयांना त्यांच्या जुन्या ट्वीटबद्दल प्रश्न ही विचारण्यात आला. मंडाविया हसले आणि त्यांनी प्रश्न टाळला.

पण हे मंडाविया खरोखरचं काबिलेतारिफ आहेत, आणि या बद्दलची भविष्यवाणी केली होती दस्तुरखुद्द नरेंद्र मोदींनी. आणि ते ही नऊ वर्षांपूर्वी. 

कोरोनाच्या काळात खराब कामगिरी केल्याने हर्षवर्धन यांच्या ठिकाणी मनसुख भाई मंडावीया यांना आरोग्यमंत्री पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. आता मनसुख भाईंच्या खांद्यावर कोरोनाची तिसरी लाट थांबवणे आणि परिस्थितीत दुसऱ्या लाटेप्रमाणे बिघडू नये याची जबाबदारी आहे.

मनसुख भाई मोदी सरकार मधल्या सात मंत्र्यांपैकी एक आहेत ज्यांना प्रमोट करण्यात आलंय. सुमारे ९ वर्षांपूर्वी मनसुख मंडावीय यांच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांनी एक भविष्यवाणी केली होती, ती अगदी बरोबर असल्याचं आता सिद्ध झालयं.

वास्तविक, मनसुख मंडावियांना २०१२ मध्ये प्रथमच राज्यसभेवर पाठविण्यात आले होते. त्यानंतर सूरत येथे त्यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले होते की,

मनसुख भाईंमध्ये मला बरीच क्षमता दिसते. त्यांच भविष्य उज्ज्वल आहे.

रवी गिर नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. मोदींच्या या भविष्यवाणीची क्लिप सगळीकडंच व्हायरल होते आहे. त्यात मोदी गुजराती भाषेत बोलताना दिसत आहेत. त्यात ते म्हणतात,

‘आपको शायद लग रहा होगा,अपने मनसुख भाई राज्यसभा में गए, सम्मान है, चलिए हो आए। मित्रो यह घटना इतनी छोटी नहीं है,आज की तारीख और 9:35 को मैं यह बोल रहा हूं जिसको डायरी में लिखना हो वह लिख ले। मित्रो मैं स्पष्ट देख रहा हूं मनसुख भाई का भविष्य कितना उज्ज्वल है,वह मुझे साफ दिख रहा है। उनमें रही शक्तियां आनेवाले कल को कैसे संवारने वाली है उसका मुझे पूरा भरोसा है दोस्तों। मुझे विश्वास है मैं सच्चा साबित होऊंगा।’

मंडावियांची वाढती राजकीय उंची

मनसुख भाईंचा जन्म गुजरातमधील पलिताना जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात झाला. भावनगर विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य बनून ते तरुण वयातच राजकारणात सक्रिय झाले.

मनसुख भाई मंडावीय २००२ मध्ये पहिल्यांदाच आमदार झाले. त्यावेळी ते फक्त २८ वर्षांचे होते आणि ते सर्वात तरुण आमदार झाले होते. २०१२ मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले. २०१८ मध्ये, त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठविण्यात आले. २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांना त्यांच्या मंत्रीमंडळात समाविष्ट केले.

त्यांना बंदर व जलवाहतूक परिवहन मंत्रालय तसेच रसायनं व खत मंत्रालयातील राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी त्यांनी आपल्या कामाने मोदींवर एक वेगळी छाप पाडली. विशेषत: रसायन आणि खत मंत्री असताना कोरोनाच्या दुसर्‍या लाटे दरम्यान जीवनरक्षक औषधांची उपलब्धता वाढवली.

यासाठी त्यांना हे बक्षीस मिळालं आणि आता त्यांची पदोन्नती राज्यमंत्र्यांपासून कॅबिनेट मंत्रीपदी झाली आहे. इतकच नाही तर कोरोना संकटाच्या या काळात पंतप्रधानांनी मनसुख भाईंवर विश्वास व्यक्त करत आरोग्य मंत्रालयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.

त्यामुळं ट्रोल करताना मोदींनी मनसुख भाईंविषयी केलेली भविष्यवाणी लोकांनी बघितली तर त्यांना समजेल, इंग्लिश बिंग्लिश काय नसतंय… काम महत्वाचं 

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.