मराठीतुन इंजिनीअरींग शिकवलं जाणार, हे जवढं फायद्याचं तेवढचं धोक्याचं देखील…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्तच्या कार्यक्रमाला संबोधित केलं. यात बोलताना त्यांनी इंजिनिअरिंग बाबतच्या एका अत्यंत महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली.

ही स्टोरी व्हिडीओ मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या युट्युब लिंकवर क्लिक करा.

हा निर्णय म्हणजे नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत देशातील ८ राज्यातील १४ महाविद्यालयात ५ भारतीय भाषांमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण देण्यात येणार आहे. यात हिंदी, तमिळ, तेलगू, मराठी आणि बांगला या ५ भाषांचा समावेश असणार आहे. सोबतच कन्नड, गुजराती, मल्याळम, आसामी, पंजाबी अशा देशातील प्रमुख ११ भाषांमध्ये इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम भाषांतरीत करण्यात येणार आहे.

देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या निर्णयाबाबत मागच्या आठवाड्यात माहिती दिली होती. ते म्हणाले होते,

AICTE ने ११ स्थानिक भाषांमधील इंजिनीरिंगच्या अभ्यासक्रमास मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रांतिक भाषेमध्ये तरुणांना शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहेत. राष्ट्रीय शिक्षण नितीनुसार विविध भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सशक्त करण्यासाठी या महत्त्वाच्या मुद्द्यावर जोर देण्यात आला आहे.

देशाचे उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सोबतच त्यांनी या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण घेता येईल ज्याचा त्यांना फायदा होईल असं देखील म्हंटलं होतं.

मात्र आता या निर्णयामुळे विद्यार्थांना नेमका कसा फायदा होईल? सोबतच मराठीत इंजिनिअरिंग केल्यानंतर जॉब ला प्राधान्य मिळेल का याबाबत सध्या विद्यार्थ्यांच्या मध्ये सध्या चर्चा सुरू आहे. याचबाबत आपण लेखामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

१४ महाविद्यालयांच्या यादीत पुण्यातील २ महाविद्यालयांचा समावेश..

१४ महाविद्यालयांच्या नावात मराठीमधून शिक्षण देणाऱ्या यादीत महाराष्ट्रातील २ महाविद्यालयांचा समावेश असणार आहे. यात पिंपरी चिंचवड मधील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचा समावेश आहे. या कॉलेजमध्ये कॉम्पुटर सायन्स हा अभ्यासक्रम मराठीमधून शिकवण्यात येणार आहे.

सोबतच पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये देखील आता मराठीमध्ये इंजिनीरिंग सुरु होणार आहे. इथे इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे अभ्यासक्रम मराठीमधून शिकवायला सुरुवात होणार आहे.

Image

मुंबई विद्यापीठामध्ये लवकरच मराठीतून अभ्यासक्रम सुरु होणार

मुंबई विद्यापीठातर्फे लवकरच मराठी भाषेमध्ये इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम सुरु होणार आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषदेत या प्रस्तावाला नुकतीच मंजूरी देण्यात आली आहे. मागच्या आठवड्यात AICTE निर्देश दिल्यानंतर विद्यापीठात मराठी भाषेतून अभ्यासक्रमासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. याला मंजूरी देण्यात आली आहे.

आता मुद्दा म्हणजे मराठी इंजिनिअरिंगचा फायदा काय होईल?

१. मराठी इंजिनिअरिंगचा पहिला आणि थेट फायदा होणार आहे तो इंग्रजीची भीती असणाऱ्यांना :

महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान घेण्याची इच्छा असते. मात्र इंग्लिशचा आणि ३६ चा आकडा असल्यामुळे यात अडचणी येतात. इंजिनिअरिंगला ऍडमीशन घेतल्यानंतर इंग्लिशमुळे ते समजून घेताना बराच त्रास होतो. याच त्रासामुळे अनेक तरुण इंजिनिअरिंगचा नाद सोडून देतात किंवा मध्येच शिक्षण सोडून देतात. पण आता या निर्णयाचा अशा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

२. जॉब मिळवताना देखील मराठी मुलांना प्राध्यान मिळण्याची शक्यता आहे. 

याबाबत बोलताना सेक्टो स्पिंडल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ राजेश मंडलिक ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,

नक्कीच दिलं जाईल. म्हणजे मराठीतून इंजिनिअरिंग केलेला उमेदवार जर जॉबसाठी आला तर मी तरी त्याला नक्कीच प्राध्यान देईन. कारण माझा ग्राहक हा जसा शहरी भागातील आहे तसा ग्रामीण भागातील देखील आहे. त्यामुळे तिथं संवाद साधण्यासाठी मला मराठीतुन शिकलेला इंजिनिअर कधीही चांगला ठरेल.

सोबतच मी सध्या देखील महाराष्ट्रातील ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी व्हाट्सअप आणि ईमेल वरून मराठीमधून सुरुवात केली आहे. फ्रान्स, जर्मनी या देशांमध्ये याआधीच मातृभाषेतून शिक्षण दिलं जात आहे.

मराठी इंजिनिअरिंगमळे नुकसान देखील संभवत…

एका बाजूला जसे फायदे आहेत तसेच दुसऱ्या बाजूला या निर्णयामुळे काही धोके देखील संभवतात. यातील मुख्य धोका म्हणजे भाषेच्या मर्यादा : 

कारण मुलांना डिग्री झाल्यानंतर कुठे जॉब लागेल हे सांगता येत नाही. कॅम्पसमधून लागला तर अनेक नामांकित कंपन्या असतात ज्या बाहेरील राज्यातील देखील असतात. यात दिल्लीपासून अगदी चेन्नई पर्यंतच्या कंपन्यांचा समावेश असतो.

अशावेळी मराठी मधील इंजिनिअरिंगच्या शिक्षणामुळे मुलांवर बऱ्याच मर्यादा येण्याच्या शक्यता आहे. उत्तर भारतामध्ये हिंदी भाषेमुळे या अडचणी कदाचित जाणवणार नाहीत. मात्र साऊथच्या राज्यांमध्ये तर हि गोष्ट बरीच जाणवून येते.

याच मुद्द्यावर बोलण्यासाठी ‘बोल भिडू’ने शिक्षण तज्ञ भाऊसाहेब चास्कर यांच्याशी संपर्क केला. ते म्हणाले,

विज्ञान व तंत्रज्ञान या सारख्या आधुनिक विषयांचे शिक्षण प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध नसल्याने आजवर बरेच मोठे नुकसान झाले आहे. शालेय शिक्षणात इंग्रजी माध्यमाचे स्तोम वाढण्यासाठी सुद्धा विज्ञान शाखेचे शिक्षण इंग्रजीत असणे हे एक महत्त्वाचे कारण आहे.

एके काळी ज्ञान मिळवाय म्हणजे संस्कृत यायलाच आज त्याजागी इंग्रजी आलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यामुळे आधुनिक विषयांचे ज्ञान सर्व समान्यांपासून लांब राहिले आहे. या बाबींचा विचार करता तत्वतः सरकारच धोरण स्वागतार्ह आहे.

मात्र ते प्रत्यक्षात आणताना काही धोके ही संभवतात.

यात एक तर मराठीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भाषांतरित केलेल्या पुस्तकांवर आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करावे लागले तर त्याची गुणवत्ता काय राहील हे सांगायला नको. त्यामुळे हा निर्णय टिकायला हवा असेल तर इंग्रजीतील अनेक संसाधने मराठीत आणावी लागतील त्या साठी खर्च करावा लागेल.

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठी माध्यमातून केवळ अभियांत्रिकी पदवी उपलब्ध करून भागणार नाही तर ११ वी १२ वी, नैसर्गिक विज्ञाने हे सर्व अभ्यासक्रम शिकवण्याची सोय ही तातडीने करावी लागेल.

सोबतच या निर्णयामुळे संभावणारा सर्वात मोठा धोका म्हणजे प्रादेशिक भाषेच्या माध्यमातून इंजिनिअर झालेल्या मुलांना इंडस्ट्रीत शिरल्यावर दुय्यम दर्जाची वागणूक मिळणे. असे घडले तर या अभ्यासक्रमांकडे मुलेच पाठ फिरवतील.

हा धोका टाळण्यासाठी या विद्यार्थ्यांना पदवीचा अभ्यास करताना विषय-विशिष्ट इंग्रजी शिक्षणाची सोय करून द्यायला हवी (अशी सोय जर्मनसाठी मॅक्स म्युलर भवन साराख्या संस्थांनी केली आहे)

त्यामुळेच आता मराठी इंजिनिअरिंगला विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो हे बघणं आणि त्यातून विद्यार्थ्यांना कसा लाभ होतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.