शिवरायांच्या अस्सल चित्रांचा ससंदर्भ घेतलेला मागोवा म्हणजे ‘मऱ्हाटा पातशाह’..

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं मर्दानी दैवत.. शिवराय दिसतात कसे, शिवरायांचे राहणीमान कसे होते याविषयी आजही मराठी मातीतल्या प्रत्येकाला आकर्षण आहेच. शिवकाळात तयार झालेल्या सभासद बखर, शिवभारत, जेधे शकावली, आज्ञापत्र यांमधून शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाचे, त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू आपल्याला वाचायला मिळतात. पण शिवाजी महाराजांना समकालीन असलेले डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज यांनी मात्र शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पोवाडे गायले.. विश्वास नाही बसत ना?

स्टीफन उस्टिक, हेन्री ओक्झेंडन, हर्बर्ट डी यागर, फ्रांस्वा मार्टिन, कॉस्मा दी गार्डा, अबे कॅरे, मॉंटगोमेरी, निकोलाओ मनूची यांसारख्या कितीतरी परकीय लोकांनी शिवरायांच्या शरीरयष्टीचे, शिवरायांच्या बोलण्याचे, त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करून ठेवले आहे. कितीतरी डच लोकांनी शिवरायांच्या तेजस्वी रूपावर मोहित होऊन त्यांची चित्रे काढून घेतली.

या सर्व गोष्टींना एकत्रित करून शिवरायांच्या इतिहासाची अपरिचित बाजू समोर आणणारे पुस्तक म्हणजे ‘मऱ्हाटा पातशाह’

हर्बर्ट डी यागर. गोवळकोंडा येथे नियुक्त असलेला डच राजदूत. हा 6 ऑगस्ट 1677 रोजी शिवाजी महाराजांना ‘वलीकंडापुरम’ (तामिळनाडू) येथे भेटण्यासाठी आला होता. या भेटीचे वर्णन मोठ्या खुबीने त्याने केले आहे. तो लिहीतो,

“आम्ही शामियान्यात जाऊन पोहोचलो. तो शामियाना अतिशय महागड्या कपड्याने तयार केलेला होता. त्यावर कोणत्याही प्रकारची कलाकुसर नसली तरीही तो श्रीमंत वाटत होता. शामियान्याच्या मधोमध राजाची गादी व्यवस्थित रचून ठेवलेली होती. त्यावर मखमलीचे कापड अंथरले होते. लोडतक्क्यांवर मोठ्या प्रमाणात सोन्याचे काम केलेले. तेवढ्यात आपल्या दोन मंत्र्यांना घेऊन ‘तो’ आला. त्याच्या पायात सुवर्णजडीत मोजडी होती. अंगावर महागडी वस्त्रे आणि त्यावर सोन्याच्या तारांचे काम. डोक्यावर जिरेटोप सुद्धा सोन्याच्या कलाकुसरीने नटलेला. हातात सोन्याची मूठ असलेली आणि विविध रत्नांनी रंगवलेली तलवार, म्यानेवर सोन्याचे काम.

असा तो सर्वार्थाने श्रीमंत, सुलक्षणी पराक्रमी ‘शिवाजीराजा’ आमच्या समोर येऊन उभा होता.. त्याच्या तेजाने आम्ही दिपून गेलो..”

‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ अशा स्वरूपात शिवरायांचे चित्रण आजवर आपल्यासमोर करण्यात आले. पण हा डच राजदूत मात्र शिवरायांना सर्वशक्तिमान, सार्वभौम सम्राट आणि श्रीमंत छत्रपती या भूमिकेत रंगवतो. शिवरायांचे हे तेजस्वी रूप पाहून हर्बर्ट एवढा प्रभावित झाला, की त्याने शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटले.

शिवाजी महाराज हयात असताना मराठी चित्रकारांनी तयार केलेलं एकही चित्र आज अस्तित्वात नाही. प्रचंड धामधुमीच्या काळात या चित्रांचे नुकसान झालेले असावे. पण परकीय व्यक्तींनी काढलेली चित्रे मात्र आज जगभरात असणाऱ्या संग्रहालयात अगदी सुरक्षित आहेत. फ्रांस, नेदरलँड, जर्मनी, रशिया, इंग्लंड यांसारख्या देशांमध्ये शिवाजी महाराजांची अस्सल आणि समकालीन चित्रे आपल्याला पाहायला मिळतात.

इयत्ता चौथीच्या पुस्तकात आपण पाहिलेलं आणि निकोलाओ मनूची याच्या संग्रहात असलेलं अश्वारूढ शिवाजी महाराजांचे चित्र ‘मीर महंमद’ नामक चित्रकाराने काढल्याचे आजवर आपण वाचत आलो आहोत. पण मुळात ते चित्र काढणारा मीर महंमद नावाचा व्यक्ती नव्हताच, तर हैद्राबाद येथील स्थानिक चित्रकार होते. हे संशोधन पहिल्यांदाच ‘मऱ्हाटा पातशाह’ या पुस्तकात प्रकाशित होत आहे. या नवीन संशोधनामुळे शिवरायांच्या इतिहास संशोधनात मोलाची भर पडली आहे.

जगभर विखुरलेल्या सर्व अस्सल चित्रांनी आणि त्यामागे असलेल्या इतिहासाने हे पुस्तक सजलेल आहे. शिवरायांसोबतच छत्रपती संभाजी महाराज आणि शंभूपुत्र थोरले शाहू छत्रपती यांच्याही चित्रमागे असलेला सत्य इतिहास पुस्तकातून समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

जर्मनी आणि रशिया या दोन देशांचा भारताशी व्यापार, युद्ध अथवा इतर कोणत्याही दृष्टीने मध्ययुगात संबंध आला नव्हता. तरीसुद्धा या दोन देशांमध्ये शिवाजी महाराजांची 2 अस्सल चित्रे आहेत. त्यामागची कहाणी सुद्धा रोचक आहे. दुसऱ्या महायुद्धात जेव्हा जर्मनीने युरोपावर आक्रमन केले, तेव्हा त्यांनी काही मौल्यवान वस्तू लुटून आपल्या देशात नेल्या. त्या मौल्यवान वस्तूंमध्ये शिवरायांच्या एका चित्राचा सुद्धा समावेश होता. तर रशियाने फ्रान्सवर जेव्हा मध्ययुगात आक्रमण केले, तेव्हा काही अमूल्य चित्रांचा बस्ता त्यांच्या हाती लागला. त्यामध्ये शिवाजी महाराजांचे चित्र सुद्धा होते. आज हे चित्र लेनिनग्राड येथील राष्ट्रीय ग्रंथागारात आहे.

शिवरायांच्या खऱ्या चित्रांना पाहणे, त्यांचा अभ्यास करणे, इतिहास वाचणे आणि त्यांना आपल्या संग्रही ठेवणे.. या सर्व गोष्टी करायच्या असतील तर ‘मऱ्हाटा पातशाह’ हे एकमेव पुस्तक आजच्या घडीला उपलब्ध आहे. शिवरायांच्या खऱ्या चित्रांचा, त्यांच्या राजयोगी व्यक्तिमत्त्वाचा आणि शिवरायांच्या अपरिचित इतिहासाचा संग्रह म्हणजेच ‘मऱ्हाटा पातशाह’….

‘मऱ्हाटा पातशाह’ लेखक- केतन कैलास पुरी 

पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क-

सिद्धार्थ शेलार: 9921982828

अमॅझॉन वरही उपलब्ध

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.