अन् क्रूरकर्मा बाबरने गुरू नानकांची माफी मागितली..

भारताच्या जडणघडणीत मुघल शासकांचे देखील योगदान आहे. भारतातील बहूतेक राज्यांवर मुघलांनी अनेक वर्षे राज्य केले आणि भारतीय इतिहासात आपलं स्थान निर्माण केल.

इतिहासात नमूद केल्याप्रमाणं भारतात मुघल साम्राज्य स्थापन होण्यात बाबर उर्फ ​​झहिरुद्दीन मुहम्मदचा मोठा वाटा होता. बाबरचा जन्म उझबेकिस्तानचा. त्याने काबूल आणि कंधहारवर विजय मिळवून बादशहाची पदवी मिळवली होती. दिल्लीत मुघल साम्राज्याची पायाभरणी करण्यापूर्वी ‘बाबर’ने भारतावर पाच वेळा हल्ला केला होता.

सत्ता मिळवण्यासाठी त्याने कित्येक गावं उध्वस्त केली, लुटमार केली.

बाबरचा हा इतिहास सर्वांनाच माहितेय, पण फार कमी लोकांना माहित असेल की, बाबरच्या इतिहासाची काही पाने शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्याशीही संबंधित आहेत.

 बाबरने गुरु नानक यांना कैद केले होते

दिल्लीत मुघल साम्राज्याच्या स्थापनेपूर्वी दिल्ली इब्राहिम लोदीच्या ताब्यात होती. बाबरने 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या युद्धात इब्राहिम लोदीचा पराभव करून दिल्ली सल्तनत काबीज केले. यानंतरच त्यानी इथं मुघल साम्राज्य स्थापन केलं.

असे म्हटले जाते की, शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक 1469 ते 1539 पर्यंत पृथ्वीवर राहिले. जेव्हा बाबरचे सैनिक इमानाबाद नावाच्या ठिकाणी अत्याचार करत होते.

गुरू नानक शीख धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध ठिकाणी जात. तेव्हा गुरु नानक त्यांच्या प्रवासादरम्यान काही काळ तेथे होते.

बाबरचे सैनिक एमानाबादच्या लोकांवर अमानुषपणे अत्याचार करत होते. सैनिकांनी लोकांना फक्त लुटलेले नाही तर घोड्यांच्या पायदळी देखील तुडवले. गुरू नानक यांनी हे सगळंं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले.

एमानाबादमध्ये लूटमार केल्यानंतर बाबरचे सैनिक सामान वाहून नेण्यासाठी लोकांना पकडत होते. दरम्यान, सैनिकांची नजर गुरु नानक यांच्यावर पडली.

असे म्हटले जाते की, गुरू नानक हे उंच आणि मजबूत बांध्याचे होते. त्यांना पाहून सैनिकांनी त्यांना सामान घेऊन जाण्यास सांगितले, पण त्यांनी नकार दिला. गुरु नानक यांच्या तोंडून न ऐकल्यावर सैनिकांनी त्यांना बंदी बनवले.

बाबरच्या सैनिकांनी गुरु नानक यांना पकडून तुरुंगात बंद केले. त्यांना तुरुंगात पाहून बाकीचे लोक नतमस्तक झाल्याचे सांगितले जाते. या सगळ्या गोष्टी बाबरपर्यंतही पोहचल्या, म्हणून तो गुरु नानकांना पाहायला आला.

असे म्हटले जाते की, बाबर गुरु नानक यांच्याकडे पोहोचताच त्यांच्या चेहऱ्यावरील चमक पाहून तो स्तब्ध झाला. त्याचवेळी, गुरू नानक यांचे प्रभावी आणि सुंदर शब्द ऐकून बाबरनेही त्यांच्यासमोर डोके टेकवले आणि त्यांना सोडून दिले.

बाबरने म्हंटले की, माझ्या सैनिकांनी केलेल्या या चुकीबद्दल मी तुमची माफी मागतो. या प्रकरणावर, गुरु नानक यांनी बाबरला सांगितले की, माफी माझ्याकडून नाही तर अल्लाहकडून माग. ज्यांच्यावर तुम्ही अन्याय केलाय त्यांच्याकडून माफी मागावी.

बाबरगाथेतही गुरू नानकांचा उल्लेख

बाबरगाथेत गुरु नानक देव यांच्या चार रचना आहेत. रचनांच्या पहिल्या रचनेत गुरु नानक यांनी बाबरच्या सैनिकांनी महिलांवर केलेल्या अत्याचाराचे वर्णन केले आहे. दुसऱ्या रचनेत, गुरु नानक यांनी बाबरच्या हल्ल्यांचे वर्णन भारताला आगीत टाकल्यासारखं म्हंटलं आहे.

तर तिसऱ्या रचनेत राजघराण्यातील महिलांचा उल्लेख आहे. त्याच वेळी, चौथ्या चरणात, गुरु नानक यांनी परमेश्वराचे स्मरण केलेय.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.