लोक म्हणाले संपली; पण मीराबाईने ४ वर्षांपूर्वीच सांगितलेलं ,”देशाला मेडल मिळवून देणार !”

दुर्गम असलेल्या मणिपूरमधील रहिवासी असलेली मीराबाई अगदी लहानपणापासूनच अवजड वजन उचलण्यामध्ये मास्टर आहे. तेंव्हा तिच्या मनीध्यानी देखील नसेल कि तिला भविष्यात याच खेळात आपले भविष्य आजमावयाचे आहे. करिअर म्हणून त्यांनी कधीच या खेळाचा विचार केला नव्हता.

असं संगीतलं जातं की मीराबाईंना लहानपणापासून धनुर्धारी व्हायचे होते. पण जेव्हा ती आठवीत तेंव्हा तिच्या मनात काहीतरी वेगळच चालू होतं…आणि तिच्या आयुष्याचं ध्येयच बदलले.

याला कारण होतं तिच्या इयत्ता आठवीतला एक धडा जो प्रसिद्ध वेटलिफ्टर कुंजारानी देवी यांच्यावर आधारित होता.

इंफाळमधील रहिवासी असलेल्या कुंजारानी ही भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील सर्वात महत्वाची  महिला आहे.

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर कुंजाराणीपेक्षा इतर कोणत्याही भारतीय महिला वेटलिफ्टरने इतकी जास्त पदके जिंकली नाहीत. आणि याचीच प्रेरणा घेऊन मीराबाईने इयत्ता आठवीत निर्णय घेतला की आता फक्त वजन उचलायचं…आणि अशाप्रकारे मीराबाईंची कारकिर्दीच्या प्रवासाची सुरुवात झाली.

पण हा प्रवास सोपा नव्हता… अगदी वेटलिफ्टिंग सेंटरसाठीही मीराबाईला तिच्या घरापासून 60 किमी लांब जावे लागायचे. PWD खात्यात खालच्या पदावर काम करणारे वडील आणि एक लहान दुकान चालविणारी आई, अशाप्रकारे ते दोघेही मिराबाई साठी तिच्या खेळासाठी म्हणावे तितकेही पैसे कमवू शकत नव्हते. पण या आर्थिक अडचणींमुळे मीराबाई थांबल्या असत्या तर जगाला तिच्यासारखी जिद्दी वेटलिफ्टर कशी ,मिळाली असती ? तिने तिचे प्रयत्न आणि कष्ट चालूच ठेवले.

त्यानंतर २०१४ मध्ये ग्लास्गो येथे कॉमनवेल्थ गेम्स जवळ आले होते. 

आणि याच कॉमनवेल्थ गेम्समध्ये प्रथमच लोकांना मीराबाईं  माहिती झाली. मीराबाईंनी या गेम्स मध्ये  सिल्वर मेडल जिंकले होते. विशेष म्हणजे या स्पर्धेचे गोल्ड मेडलदेखील भारताला मिळाले होते. साहजिकच अशी परिस्थिती उद्भवल्यास लोक गोल्डला अधिक महत्व देतात.

साहजिकच आहे कि हि सल मीराबाईच्या मनात राहिली. तिने हि सल तिच्या २०१६ वर्षीच्या तिच्या खेळातून व्यक्त केली. रिओ ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी ट्रायल्स चालू झाल्या आणि या ट्रायल्सच्या निरीक्षक होत्या कुंजरानी देवी.

तीच कुंजरानी देवी जिच्याकडून प्रेरित होऊन मीराबाईंनी हे करिअर निवडले होते.

मग काय मीराबाईंनी तिचं टॅलेंट दाखवलं. पटियाला येथे झालेल्या ट्रायल्समध्ये मीराबाईने राष्ट्रीय प्रशिक्षक कुंजाराणीचाही राष्ट्रीय विक्रम मोडला. १२ वर्षे जुना असलेला हा विक्रम मोडताच मीराबाई वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहचली.

तिच्याकडूनच आता रिओमधील मेडलची सर्वात मोठी आशा असल्याचे म्हटले जात होतं. पण रिओमध्ये वेगळंच काही घडलं होतं. मेडल जिंकण्यापासून मीराबाई तिच्या तिन्ही क्लीन एंड जर्क च्या प्रयत्नांमध्ये अपयशी ठरली. ती वजनच उचलू शकली नाही पण हे मिळालेले अपयश म्हणजे मीराबाईंची ओळख नव्हती.

तर तिची एक खास ओळख होती…

रिओ ऑलिम्पिकमधील मीराबाई हे केवळ दुसरी महिला वेटलिफ्टर होती जी वजन न उचलताच खेळाच्या बाहेर गेली. परिणाम व्हायचा तोच झाला तिच्यावर टीकेची फेरी सुरू झाली. लोकं मीराबाईला, तिचे प्रशिक्षक आणि फेडरेशनला बरं- वाईट म्हणायला लागले. अशा लोकांना उत्तर देताना मीराबाई म्हणाल्या,

२०१६ च्या दरम्यान ती डिप्रेशनमध्ये गेली होती त्यामुळे तिला मानसिक तज्ज्ञांकडून उपचार देखील  घ्यावे लागले होते.

“ऑलिम्पिकपूर्वी कोणीही मला साथ दिली नाही आणि जेव्हा मी ऑलिम्पिकमध्ये माझे पदक गमावले तेव्हा सर्वजण फेडरेशनला आणि माझ्या प्रशिक्षक विजय शर्मा यांना दोष देत सुटलेत. मात्र त्यांच्यामुळेच मी येथे पोहचले आहे त्यात मी अजून परिपूर्ण झाली नाही. आगामी खेळात मी माझा रिजल्ट देईन.

ती संपली नाही तर अजून मजबूत झाली. या पराभवानंतर तिने सातत्याने मोठ्या स्पर्धांमध्ये पदके जिंकली आणि आपलं विशेष असण्याचं स्थान अबाधित ठेवलं.

मीराबाईंनी जी बोलली ते तिने खरं करून दाखवलं

२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकनंतर २०१७ ची जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप आली. या वेळीही मीराबाई दडपणाखाली येतील असे टीकाकारांना वाटत होतं. पण तसे झाले नाही. मीराबाईंनी इतिहास रचला. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी कर्णम मल्लेश्वरीनंतर मीराबाई दुसरी भारतीय महिला वेटलिफ्टर ठरली. यानंतर, पुढच्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने मागील पदकांचे रेकॉर्ड बदलले.

२०१४ कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या मीराबाईने २०१८ कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले. गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या या कॉमनवेल्थ गेम्समध्ये मीराबाईंनी एकूण १९६ किलो वजन उचलले. स्नॅचमध्ये ८६ तर क्लीन अँड जर्कमध्ये ११० किलो. हे त्यांचे वैयक्तिक पर्सनल बेस्ट रेकॉर्ड   होते. एप्रिल २०२१ च्या महिन्यात मीराबाईंनी ताश्कंदमध्ये झालेल्या आशियाई चँपियनशिप २०२० चे  कांस्यपदक जिंकले.  दुखापतीमुळे मीराबाई आशियाई खेळात भाग घेऊ शकली नव्हती.

मीराबाईने रँकिंगच्या आधारे टोकियो २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळविली . सध्या ती जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. आणि तिच्यापासून भारताला इतिहास रचण्याची अपेक्षा होतीच…..

आणि खरंच आता तिने इतिहास रचला आहे !!!!!

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये वेटलिफ्टर मीराबाईने रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं आणि २०१६ च्या दरम्यान तिने जाहीरपणे बोललं ते खरं करून दाखवलं. महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅच प्रकारात ८७ तर क्लिन अँड जर्क प्रकारात ११५ किलो वजन उचललं.

पण ऑलिम्पिकच्या दबावाखाली खेळाडू अनेकदा चुका करतात.  मात्र मीराबाईच्या खेळामुळे टीम इंडियाचे मनोबल वाढले आहे. ती नेहेमीच म्हणत असते,

“चांगलं खेळणं किंव्हा खेळात भाग घेणं च पुरेसं नाही तर मला या क्षेत्रात महान परिपूर्ण व्हायचं आहे, आणि त्याबाबतीत मी कसलीही तडजोड करत नाही…!”

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.