दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर काम करणाऱ्या आईबापाचा लेक ऑलिम्पिक गाजवायला निघालाय

टोकियो ऑलम्पिक मध्ये धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात फलटण तालुक्यातील सरडे गावातील प्रवीण  जाधव या तरुणाला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्याबाबत प्रवीणचे सर्वत्र कौतुक होत आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन कि बात’ मधून प्रवीणच्या कामगिरी प्रकाश टाकला आहे.

प्रवीणच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून आई-वडील इतरांच्या शेतात रोजंदारीचे काम करतात. या परिस्थितीचा सामना करत प्रवीणने आपल्या शिक्षणाबरोबरच धनुर्विद्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली होती. वेळोवेळी या स्पर्धांमध्ये प्रवीणला यश मिळत गेले. यानंतर पहिल्यांदा प्रवीणची निवड पुणे आणि त्यानंतर दिल्ली येथील क्रीडा प्रबोधनी येथे झाली. आता त्यानंतर टोकियो येथे होणाऱ्या ऑलम्पिक पथकात प्रवीण जाधव यांची निवड झाली आहे.

प्रवीणचा टोकियो पर्यंतचा  प्रवास सोपा नव्हता. त्याच्या रस्त्यात अनेक अडचणी आल्या.  त्यावर मात करत प्रवीणने आपले लक्ष साध्य केले आहे. मागली १२ वर्ष केलेल्या मेहतीचे फळ प्रवीणला मिळाले आहे.

 प्रवीण जाधव हा तालुका, जिल्हा स्थरावरील धावण्याचा स्पर्धेत चांगलेच नाव कमाविले होते. मात्र पुणे येथे स्पर्धे दरम्यान त्याच्यातील नेमबाजी, धनुर्विद्याची चुणूक दिसून आली. मात्र धनुर्विद्याचे पुढे प्रशिक्षण घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. धनुर्विद्या प्रकारात प्रवीण पुढे जाऊन काही तरी करू शकतो हा असा विश्वास त्यांचे शालेय शिक्षक विकास भुजबळ यांना वाटला होता. 

विकास भुजबळ यांनी प्रवीणला पुण्यावरून परत सरडे गावात आणले आणि त्यानंतर धनुर्विद्या बाबत त्याला गावातच बेसिक प्रशिक्षण दिले. त्याला आपल्या घरी ठेवून त्याच्या जेवणाची व्यवस्था केली. प्रवीणवर मुख्य लक्ष ठेवून त्याला पुढच्या स्पर्धेसाठी तयार केले. अमरावती, प्रवरानगर, पुणे आणि त्यानंतर दिल्ली असा प्रवीणचा प्रवास आहे.

अंडर १६ धनुर्विद्या स्पर्धेत सुद्धा प्रवीणने भारताचे प्रतिनिधित्व करत गोल्ड मेडल मिळवून दिले आहे.

प्रवीण बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बोल भिडूने त्याचे शालेय प्रशिक्षक विकास भुजबळ यांच्याशी  संपर्क साधला.

त्यावेळी त्यांनी सांगितले की,

सरडे गावात नियुक्ती असतांना शाळेतील १५० मुलांपैकी प्रवीण वेगळा वाटायचा. तालुका, जिल्हा स्थरावर त्याने धावण्याच्या स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. मात्र, घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्याच्या शरीराची म्हणावी तशी सोय होत नव्हती. धावपटूसाठी लागणारी त्याच्या शरीराची रचना नव्हती. मात्र त्याने आपल्या मेहनतीवर बरीच मजल मारली होती.

पुढे पुणे येथे शालेय स्पर्धे दरम्यान नेमबाजी आणि धनुर्विद्या सुद्धा आजमावून पहिली. त्यात प्रवीणची कामगिरी वाखाण्याजोगी होती. त्याच्या घरची परिस्थिती पाहता त्याला माझ्या घरी ठेवून जेवणाची आणि प्रशिक्षणाची  व्यवस्था केली. त्याला खरे तर धावपटू व्हायचे होते.  

त्यांच्याकडून दररोज १०-१० तास सराव करून घेतला. पुढे, प्रवरा नगर, अमरावती, पुणे आणि दिल्ली येथे त्याला चांगले प्रशिक्षक मिळत गेले त्यामुळे प्रवीण आज टोकियो ऑलम्पिक पर्यंत पोहचू शकला आहे. प्रवीण सध्या  फ्रांस येथे प्रशिक्षण घेत आहे. आणि तिथूनच तो टोकियो येथे भारतीय पथकात सामील होणार असल्याचे विकास भुजबळ यांनी सांगितले.

धनुर्विद्या मधील त्याची कामगिरी पाहून त्याला भारतीय लष्करात हवालदार पदी निवड झाली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

प्रवीण जाधवच्या या संघर्षाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेत ‘मन कि बात’ या कार्यक्रमातून त्याच्या कामगिरीवर प्रकाश टाकला.

यावेळी मोदी म्हणाले, सातारा जिल्ह्यातील सरडे येथील प्रवीण जाधव यांची टोकियो ऑलिंपिक मध्ये झालेली निवड ही देशाची पर्यायाने राज्यासाठी कौतुकाची बाब आहे.

बुद्धिमत्ता, समर्पण, निश्चय आणि खेळाडूवृत्ती एकत्र येते त्यावेळी खेळाडू घडतात.

आपल्या देशातील बहुतांश खेळाडू हे लहान गाव, छोट्या शहरातून आलेले आहेत. टोकियो ऑलम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या या पथकामध्ये अशा अनेक प्रेरणादायी खेळाडूंचा समावेश आहे. इथ पर्यंत पोहोचण्यासाठी प्रविनाने अनेक अडचणींचा सामना केला आहे. तो धनुर्विद्यात फार चांगली कामगिरी करतोय. त्यांचे आई-वडील उदरनिर्वाहसाठी शेतात रोजंदारीवर काम करत आहेत. आणि त्यांचा मुलगा टोकियो मधील ऑलिंपिकमध्ये खेळतोय. ही गोष्ट त्यांच्यासाठी नव्हे, तर आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.       

Leave A Reply

Your email address will not be published.