अस्सल भारतीय मायक्रोमॅक्स कुठे फेल गेलं?

आमिर खानचा गजनी आठवतोय? मोठा मोबाईल कंपनीचा मालक. असिन एक स्मॉल टाइम ऍक्ट्रेस असते. न कळत या श्रीमंत माणसाच्या प्रेमात पडते वगैरे वगैरे ही स्टोरी. आता हि असून खऱ्या आयुष्यात देखील एका मोबाईल टायकूनच्या प्रेमात पडली. पण अमीर खानच्या गजनीसारखा याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालाय असं नाही तर पब्लिकच्या मेमरीमधून हा खरा गजनी पर्मनन्ट डिलीट झालाय.

गोष्ट आहे मायक्रोमॅक्सच्या राहुल शर्माची.

दिल्लीच्या मिडलक्लास स्कुल टिचरचा मुलगा. शाळेत हुशार होता असं नाही पण धडपड्या नक्कीच होता. सगळे करतात त्याप्रमाणे इंजिनीरिंग स्वप्ने बघत राहिला. आयआयटीला वगैरे ऍडमिशन मिळालं नाही. नागपूरच्या तुकडोजी महाराज विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियरिंग पूर्ण केलं. पंजाबी प्रथेप्रमाणे कॅनडाला गेला. पण जास्त काळ रमला नाही.

राहुल मेकॅनिकल इंजिनियर होता पण त्याला हौस कॉम्प्युटरची होती. नव्वदच्या दशकात प्रत्येक कुटुंबाप्रमाणे त्याच्या वडिलांनी साठवून याला कम्प्युटर घेऊन दिलेला. त्यावर दिवसरात्र गेम खेळणे,  स्पेअरपार्ट ठेवणे असले त्याचे उद्योग चालायचे. नोकरी केली पण जास्त काळ टिकला नाही. वडिलांच्या हातापाया  पडून त्याने ३ लाख रुपये उधार आणले.

मग आपल्या एका रोहित पटेल नावाच्या मित्राबरोबर त्याने सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली. नाव दिलं मायक्रोमॅक्स सॉफ्टवेअर.

हा काळ जगभरातल्या डॉट कॉम बूमचा होता. भारतातसुद्धा मोबाईलची एंट्री झाली होती.  आधी २० रुपये इनकमिंग चार्जेस असणारे मोबाईल फोन आता दुनिया मुठ्ठीमे काबीज करत होते. या काळात जगावर राज्य करत होता नोकिया मोबाईल. दगडा सारखा टफ आणि टिकाऊ नोकियाने स्वस्तात मोबाईल बनवून प्रत्येकाच्या घराघरातले लँडलाईन फोनवर वाईट दिवस आणले.

मायक्रोमॅक्स नोकियाच्या पेफोन टेक्नॉलॉजीसाठी सॉफ्टवेअर बनवत होते. वर सांगितल्याप्रमाणे राहुल शर्मा खटपट्या आणि उद्योगी होता. जिथे जाईल तिथे नवीन शिकून घेण्याची त्याची ताकद जबरदस्त होती. नोकिया वाले हे पेफोन दुर्गम ठिकाणी बसवत होते. तिथल्या कनेक्टीव्हीटीसाठी त्यांना ते बरं पडत होतं.

पुढे नोकिया यातून बाहेर पडली पण राहुल शर्मा टिकून राहिले. मायक्रोमॅक्सने यातून चांगलाच पैसे कमवला. अगदी वैष्णोदेवी येथे देखील त्यांचेच पेफोन चालायचे. वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्यांबरोबर करार करत एकदम करोडोंची कोटींची बनली.

राहुल शर्माला एकदा कामाच्या व्हिजिट साठी म्हणून बांगलादेश बॉर्डरवरच्या बिलासपूर भागात गेला.

तिथे एक गाव होत जिथे हे वायरलेस फोन बसवले होते. याच वैशिष्ट्य म्हणजे त्या गावात अजून वीज पोहचली नव्हती. राहुल शर्माला आश्चर्य वाटलं की वीज नाही तर मग फोनच चहरजिंग कस करतात. त्याने चौकशी केल्यावर कळलं की त्या पीसीओचा मालक रोज आपल्या सायकलवरून एका ट्र्कची बॅटरी ११ किलोमीटर लांब असलेल्या शहरात नेतो आणि तिथे चार्जिंग करून परत आणतो.

त्याची ती जिद्द आणि चिकाटी बघून राहुल शर्माच्या डोक्यात वेगळीच कल्पना चमकली. जास्तीतजास्त वेळ टिकणारी बॅटरी असणारे मोबाईल बनवले तर?

कंपनीत परत आल्यावर त्याने आपल्या पार्टनरला सांगितलं, आज पासून आपण मोबाईल बनवायचे आणि तेही १ महिना टिकेल एवढी लॉन्ग बॅटरी बॅक अप असणारे.

सुरवातीला सगळ्यांना वाटलं हा शर्मा वेडा झाला आहे. पण तो सिरीयस होता. खरोखर त्यांनी मायक्रोमॅक्स ब्रँड खाली द-एक्सट्रीम नावाचा मोबाईल बनवला. त्याचे दहा हजार हँडसेट फक्त दहा दिवसात खपले. ते वर्ष होतं २००८.

जगाला धडकी भरवणाऱ्या मायक्रोमॅक्स नावाच्या ब्रँडचा उदय झाला होता. दहा कोटींची मार्केट व्हॅल्यू असणारी ही कंपनी रातोरात १०० कोटींची बनली.

त्यानंतर राहुल शर्माने धडाकाच सुरु केला. ड्युएल सिम, ट्रिपल सिम कार्डचे फोन आणले. आधी असले फोन फक्त महागड्या सेगमेंटमध्ये असायचे.  खिशात नोकियाचे दोन दोन फोन घेऊन फिरण्यापेक्षा मायक्रोमॅक्सचा एकच फोन बरा असं अनेकांना वाटायला लागलं.

जे बाकीच्यांना अशक्य वाटायचं ते मायक्रोमॅक्स सहज शक्य करून दाखवत होता.

सॅमसंग,नोकिया, मोटोरोला, सोनी, एलजी यांच्यापेक्षा कितीतरी पटीने स्वस्त आणि तेव्हाच्या चायना मोबाईलपेक्षा टिकाऊ असलेला मायक्रोमॅक्स भारतीयांचा लाडका बनला होता. क्वार्टी किपॅडवरून आपण अँड्रॉइड वाल्या स्मार्टफोनवर शिफ्ट झालो ते मायक्रोमॅक्सच्या साथीनेच.

काळानुसार स्वतःमध्ये बदल करणे हे राहुल शर्माने मायक्रोमॅक्सच्या अंगवळणी पाडले होते. फोर्ब्स पर्सन ऑफ द इयर वगैरेचे त्याला पुरस्कार मिळाले. जगातल्या तरुण श्रीमंत माणसांच्या यादीत त्याचा समावेश होत होता.

२०१४ साली एकवेळ अशी आली कि भारतातला सर्वात जास्त खपणारा स्मार्टफोन म्हणून मायक्रोमॅक्सने सॅमसंगला मागे पाडलं होतं. फक्त भारतातच नाही तर रशिया आणि बऱ्याच देशात मायक्रोमॅक्सचे फोन निर्यात केले जात होते.

मायक्रोमॅक्सच्या फ्लॅगशिप समजल्या जात असणाऱ्या कॅनव्हास सीरिजच्या जाहिराती अक्षय कुमार करत होता. एवढंच नाही तर एका ऍडसाठी शर्माने थेट एक्स मेनच्या वोल्व्होरीन ह्यू जॅकमनला भारतात आणले. पहिल्यांदाच एक हॉलिवूड स्टार भारतीय ब्रॅण्डची जाहिरात करत होता.

एक मध्यमवर्गीय मुलगा आपल्या वडिलांच्याकडून ३ लाखांचं कर्ज घेऊन सुरु केलेली कंपनी हजारो कोटींची बनवतो. अच्छे दिन अच्छे म्हणतात ते हेच असं आपल्याला वाटलं.

सगळं एकदम छान सुरु होतं. २०१५ साली असिन बरोबर धडाक्यात लग्न देखील केलं. एंगेजमेंटला म्हणे त्याने बेल्जीयममधून बनवलेली खास सहा कोटींची अंगठी तिच्या बोटात घातली होती. एकूण काय तर राहुल शर्माची पाचही बोटे तुपात होती.

asin akshay

आणि मग मग एंट्री झाली शिओमीची.

२०१५ साली चीनवरून आलेल्या रेडमी या फोनने क्रांतीच आणली. बघता बघता त्यांनी आणि त्यांचीच भावंडे असणाऱ्या ओप्पो विवो वन प्लस या चायना फोननी लो बजेट फोनच मार्केट जिंकलं. दिसायला महागड्या फोनसारखी फिनिश असणारे, थेट ऍपलचा इंटरफेस कॉपी करणाऱ्या या ब्रॅण्डच्या झंझावतात मायक्रोमॅक्स आणि इतर भारतीय फोन पालपोचोळ्यासारखे उडून गेले.

फक्त १५ ऑगस्ट,२६ जानेवारीच्या दिवशी देशप्रेमाच्या गप्पा मारणारे आपण मायक्रोमॅक्सच्या पाठीशी उभे राहिलो नाही. सरकारने देखील चायना फोनशी स्पर्धा करण्यासाठी मायक्रोमॅक्सला मदत केली नाही. उलट मेक इन इंडिया म्हणत शिओमीला वगैरे भारतात येण्याच्या पायघड्या अंथरल्या.

अशातच जिओ ४जीचे आगमन सुद्धा मायक्रोमॅक्ससाठी शापच ठरले. मुख्यतः २जी आणि ३ जी वर चालणारे मायक्रोमॅक्सचे फोन ४जी एवढ्या स्वस्त होईल आणि प्रत्येक भारतीयांच्या हातात पोहचेल हे स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं.

एलईडी टीव्ही, इलेक्ट्क्ट्रिक बाईक वगैरे बनवायला सुरु केलेले राहुल शर्मा यशाच्या शिखरावरून दणकरून खाली आपटले. नोकिया, सोनी, मोटोरोला वगैरे मोठ्या कंपन्यांचं जे झालं तसंच मायक्रोमॅक्सच झालं.

मागच्यावर्षी कोरोनाकाळात मोदीजींनी आत्मनिर्भर भारतची घोषणा केली. राहुल शर्मा यांनी त्यातून प्रेरणा घेत कमबॅक केलं होतं. ५०० कोटींचं भांडवल गुंतवत ‘इन’ नावाचा नवीन ब्रँड त्यांनी लॉन्च केला. नव्यानेच सुरु झालेल्या चीन विरुद्धच्या असंतोषाच्या लाटेत आपले मोबाईल पुन्हा भारतीयांच्या खिशात जातील असं त्यांना वाटत होतं. पण अजून तरी तस काही दिसत नाहीय.

मोबाईल फोन कंपनीच आयुष्य चायना मॉडेल प्रमाणे क्षणभंगुर बनलंय. काळानुसार अपडेट झाला नाही तर ग्राहक तुम्हाला क्रूरपणे इतिहासजमा करेल यात शंका नाही.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.