या ‘स्किमा’ करुन ते २,००० शोरुम्सचे मालक झाले…!

कधीकाळी सर्वसामान्य असणारी माणसं पुढे जावून अचाट श्रीमंत झालेले किस्से तुम्ही अनेकदा वाचले असतील. संजय घोडावतांपासून अविनाश भोसलेंपर्यन्त. BVG च्या हणमंत गायकवाडांपासून ते दास च्या रमेश खाडेंपर्यन्त प्रत्येकांच्या स्टोऱ्या आपल्याला सांगितल्या जातात. पण आपण कधी त्यांनी हा बिझनेस कसा उभा केला, नक्की कुठल्या गोष्टीचा फायदा घेतला. संधी कशात सापडली हे वाचण्याच्या फंद्यात पडत नाही.

संधी कशी शोधायची असते हे सांगणारी ही स्टोरी. कधीकाळी या माणसाने आपला व्यवसाय एका छोट्या गाळ्यात सुरू केला होता. आज देशभरात संगिता मोबाईल्स नावाने दोन हजारांहून अधिक शोरुम्स आहेत. मोबाईलच्या रिटेल्स बिझनेसमध्ये हा माणूस आजही किंग आहे. एकीकडे एमॅझॉन पासून ते फ्लिपकार्टपर्यन्त स्पर्धा वाढत असताना देखील त्यांनी आपला व्यवसाय कसा टिकवून ठेवला ही सांगणारी गोष्ट.

बंगलोरचे उद्योगपती म्हणून संगिता मोबाईल्सचे मालक सुभाष चंद्रा यांच नाव घेतलं जातं. स्टोरी नेहमीसारखीच. आई वारलेली. घरात फक्त वडिल कमवायचे. वडिलांनी बंगलोरमध्ये एक दूकान टाकलं ते बंद पडलं. त्यानंतर सुभाष चंद्रा दहावीत होते तेव्हा त्यांना शाळा सोडून वडिलांच्या दूकानात मदतीस याव लागलं.

मर्चंडचं दूकान बंद पडल्यानंतर वडिलांनी तिथेच दूसरा व्यवसाय सुरू केला. होम अप्लायन्स विकण्याचा तो व्यवसाय. त्याच दूकानाला या दहावीतून शाळा सोडलेल्या पोराने जॉईन केलं.

ही गोष्ट होती १९९० च्या दरम्यानची.

हळुहळु त्या पोराने बाहेरच्या गोष्टी ठेवण्यास सुरवात केली. रंगीत टिव्ही, ट्रान्झिस्टर अशा गोष्टी तो आपल्या दूकानात विक्रीसाठी ठेवू लागल्या. काही वर्ष गेली आणि भारतात आली ती मोबाईल क्रांन्ती.

मोबाईलचा सर्वाधिक फायदा कोणी घेतला असेल तर तो या माणसाने. १९९७ नंतरच्या काळात मोबाईल मार्केटमध्ये दिसू लागले. त्याचं दूकान बंगलोरच्या एमजी रोडवर होतं. या दूकानात बऱ्यापैकी उच्चवर्गीय लोक येत असतं. त्यांनी याच काळात आपल्या दूकानातून पहिल्यांदा सोनी कंपनीचा फोन विकला होता. त्यांची त्या काळात किंमत ३५ हजार होती. या फोनसाठी त्यांनी जे सीम विकलं होतं त्यांची किंमत होती साडे चार हजार. त्यात गंम्मत अशी होती की साडेचार हजार रुपयांच्या या सिममागे त्यांच कमिशन होतं ३००० हजार रुपये.

सुभाष एस. यांच्या लक्षात आलं की मोबाईलचं मार्केट आपणाला चंद्रावर घेवून जावू शकतं. याच मार्केटमध्ये त्यांना संधी दिसली. मोबाईल विकायचे आणि सिम विकायचे हा धंदा सेट होवू लागला. त्या काळात इनकमिंग आणि आऊटगोईंग कॉलचा दर सोडा रुपये प्रति मिनीट असायचा. आपल्या दूकान एखादा माणूस टिव्ही, फ्रिज घेण्यासाठी आला की त्याला ते सिमकार्डबद्दल माहिती द्यायचे. मोबाईलबद्दल सांगायचे. एक एक करत त्यांनी दिवसाला एक सिम विकण्यास सुरवात केली. थोडक्यात दिवसाला तीन हजारांच कमीशन.

दरम्यानच्या काळात मोबाईल भारतात येवू लागले. बऱ्यापैकी उच्चवर्गीय माणसं मोबाईल वापरायला लागली होती. सिम कार्ड विकत होते पण त्या तुलनेत मोबाईल विक्री होत नव्हती. त्याच कारण होतं ते ब्लॅक मार्केट. भारतात सुरवातीच्या काळात खुले आर्थिक धोरण नसल्याने बाहेरच्या गोष्टींवर मोठ्ठा टॅक्स असायचा. त्यामुळे प्रत्येक मोठ्या शहरात आखाती देशातून स्वस्त:त आणलेल्या इलेक्ट्रानिक्स गोष्टींचा काळाबाजार सुरूच होता. यामध्येच मोबाईलची भर पडली. आकडेवारीत सांगायचं तर तेव्हा मोबाईलसारख्या गोष्टींवर सरकारने साठ टक्यांपर्यन्त टॅक्स ठेवला होता.

त्यांना सगळ्यात मोठ्ठ आव्हान होतं ते ब्लॅक मार्केटचं.

त्यानंतर या माणसाने एक आयडिया काढली. मोबाईल आणि सिमकार्ड एकत्रित द्यायचे. त्यात सिमकार्ड माणसांच्या जन्मतारखेनुसार द्यायचे. एखाद्याला फॅन्सी नंबर हवा असेल तर तो द्यायचा. ही पद्धत त्या काळात नवीन होती. तरिही ब्लॅक मार्केटचा दबदबा कायम होता. मग त्यांनी बिल आणि वॉरंटी द्यायला सुरवात केली. आश्चर्य वाटेल पण त्या काळात कंपन्या बिल आणि वॉरंटी द्यायला टाळाटाळ करायच्या. आपल्या दूकानामार्फत आपल्या जबाबदारीवर त्यांनी ही रिस्क घेतली व तिथे खरा ब्लॅक मार्केटला धक्का बसू लागला. त्यांच्या संगिता मोबाईल्समध्ये मोबाईल घेण्यासाठी हळुहळु का होईना गर्दी होवू लागली.

त्याच काळात मोबाईलच्या चोऱ्यांच प्रस्थ वाढलं.

सुरवातीच्या काळात पोलीसांकडे देखील सायबर सेल सारखी स्वतंत्र शाखा नव्हती. मोबाईल ट्रॅक करणे, चोरीचा मोबाईल शोधून काढणे यासाठी कुठलीच सिस्टीम नव्हती. एकदा मोबाईल चोरीला गेला की तो गेलाच म्हणून समजलं जातं. त्यावरचा उपाय म्हणून आपल्या दूकानातून त्यांनी इन्शोरन्स द्यायला सुरवात केली. भारतात मोबाईलवर इन्शोरन्स देण्याची पहिली आयडिया देखील त्यांनीच अंमलात आणली. एकामागून एक डोकं लावून ते व्यापार करु लागले. साहजिक दोनाचे चार आणि चाराची आठ दूकाने होवू लागली. एकीकडे दुकानाच्या संख्येत वाढ होत होती तर दूसरीकडे माणसांचा विश्वास वाढत होता.

आत्ता मार्केटमध्ये त्यांनी नवीन स्किम आणली. 

मोबाईल विकत घेताना EMI मध्ये पैसे देण्याची सोय त्यांनी सुरू केली. ही स्कीम देखील भारतात सुरू करण्याचं श्रेय त्यांनाच देण्यात येतं. त्यासाठी त्यांनी स्टॅण्डर्ड बॅंकेसोबत करार केला. लोकांना हप्त्यामध्ये पैसै देता येत असल्यामुळे संगिता मोबाईलच्या दूकानात गर्दी होवू लागली. या EMI बद्दल सांगतात ते म्हणतात की तेव्हा मोबाईलच्या दूकानाच्या बाहेर रांग लागलेली असायची.

१९९७ ते २००२ या काळात संगीता मोबाईल्सने बंगलोरच्या ७० टक्याहून अधिक मोबाईल क्षेत्रावर एकहाती कब्जा मिळवला. 

त्यानंतरच्या काळात CDMA कार्ड आली. पुढे चायना फोन आणि त्यानंतर मायक्रोमॅक्स नावाची कंपनी आली. या माणसाने डायरेक्ट कंपनीसोबत व्यवहार केला आणि मायक्रोमॅक्स भारतात विकण्यासाठी डिस्ट्रुब्युटर म्हणून काम करण्याची मक्तेदारी मिळवली. हा व्यवहार एक कोटी रुपयांचा होता. दरम्यानच्या काळात हैद्राबात ते चैन्नई संपुर्ण दक्षिण भारतावर संगिता मोबाईल्सने कब्जा मिळवला. लोकांना इन्शोरन्स दिलाच पण तो तो क्लेम ७२ तासात कव्हर करुन हातात पैसे देण्याची सुविघा निर्माण केली. त्यासाठी लंडनच्या EPI.com कंपनीसोबत व्यवहार केला. फोन पाण्यात पडला काय किंवा हातातून पडला काय ते ग्राहकाचे पैसे परत करु लागले. यामुळेच मोबाईल फक्त संगिता मोबाईल्समधूनच घ्यावा अस सार्वत्रिक मत लोकांच होवू लागलं.

आत्ता त्यांना टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये एमेझॉन आणि प्लिपकार्टसारख्या कंपन्या दाखल झाल्या. 

इ- कॉमर्सने मोठ्या प्रमाणात मार्केट काबीज केलं. विशेषत:२०१४ ते २०१६ या सालात सर्वाधिक फोन यासारख्या माध्यमातून विकले गेले. त्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे कमी किंमतीत फोन मिळणं. आत्ता या कंपन्यासोबत स्पर्धा करणं अवघड गोष्ट होती. तरिही संगिता मोबाईल्स ने एक स्किम काढली. प्राईज ड्राप प्रोटेक्शन. इथं स्कीम काय केलेली तर तुम्ही आमच्याकडून दहा हजारला फोन घेतला आणि समजा एका महिन्यात तो त्याहून कमी किंमतीत एखाद्या साईटवर नऊ हजारला मिळू लागला तर आम्ही एक हजार रुपये तुम्हाला परत करणार. एमेझॉन, फ्लिपकार्ट पेक्षा कमी किंमतीत तर फोन देतच होते पण कमी किंमतीची गॅरेंटी ती एक महिना लिहून देवू लागले. साहजिक पुन्हा लोकं संगिता मोबाईलमध्ये गर्दी करु लागले.

आज संगिता मोबाईल्समध्ये एकूण ४००० हजार कर्मचारी काम करतात. दिवसाला ७ हजाराच्या सरासरीने ते फोन विकतात. येत्या वर्षात ३००० कोटींचा टर्नओव्हर पुर्ण करण्याची त्यांची इच्छा आहे.गरिबीतून येवून ते श्रीमंत झालेच पण त्यांनी १०० वेगवेगळे धंदे न करता एकच धंदा प्रामाणिकपणे केला. बरीच आव्हाने आली पण त्याला स्किमा काढून उत्तर दिलं. त्यामुळेच ते आजही टिकून राहिले. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.