७०० रु. पगार असलेल्या मास्तरला १५ मिनटात १५ एकर जागा मिळाली, अन् MIT चं साम्राज्य उभारलं

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली.

डॉ. विश्वनाथ कराड हे पुण्यातील ख्यातनाम सरकारी इंजिनियरिंग कॉलेज सीओईपी कॉलेजमध्ये एक लोकप्रिय प्रोफेसर होते. शिक्षकांच्या घरी बऱ्याचदा विद्यार्थ्यांचे पालक आमच्या मुलाला समजवा असं सांगायला येत असतात त्या प्रमाणे एकजण त्यांना भेटायला आला.

नुकतीच त्या मुलाची बारावी झाली होती मात्र काही मार्कांत त्याचा नंबर सीओईपीच्या मेरिट लिस्ट मधून हुकला होता. त्या मुलाने लहानपणापासून पाहिलेलं इंजिनियर व्हायचं स्वप्न भंग पावलं होतं आणि आत त्याच्या डोक्यात आत्महत्या करण्याचे विचार डोकावत होते.

कराड सरांनी कसबस त्याला समजावून सांगितलं.

पण त्यांना या घटनेमुळे एक गोष्ट छळू लागली होती. पुणे हे विद्येचे माहेर घर मानलं जातं मात्र या शहरात १८५४ साली सुरू झालेल्या सीओईपीनंतर एकही इंजिनियरिंग कॉलेज का सुरू झालं नाही? स्वातंत्र्यानंतर लगेच सुरू झालेल्या आयआयटी आणि काही इतर गव्हर्नमेंट कॉलेज सोडले तर खाजगी कॉलेजला का मान्यता मिळत नाही?

याच विषयाला धरून प्रो. विश्वनाथ कराड यांनी १४ एप्रिल १९८१ रोजी तेव्हाच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये एक लेख लिहिला.

यात त्यांनी राज्यात कमीतकमी ७-८ खाजगी अभियांत्रिकी कॉलेजची कशी आवश्यकता आहे हे पटवून सांगितलं.

तेव्हाचे एक आमदार कमल किशोर कदम हे देखील आयआयटी मधून पासआउट झालेले इंजिनियर होते. त्यांनी विश्वनाथ कराड यांच्या सोबत मिळून या विषयाला वाचा फोडली. 

एका महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमावेळी तेव्हाचे तंत्रशिक्षण मंत्री सुधाकरराव नाईक पुण्यात मराठा मित्रमंडळ येथे आले होते. कराडांनी त्यांची भेट घेतली. त्यांना आपली भूमिका समजावून सांगितली.

नाईक यांना ही गोष्ट पटली त्यांनी मुख्यमंत्र्यांशी या बद्दल चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

तेव्हाचे मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील. दादांचे लौकिक अर्थाने शिक्षण जास्त झालं नव्हतं. ते स्वतःला सातवी नापास म्हणायचे मात्र त्यांचं व्यवहार ज्ञान प्रचंड मोठं होतं. माणसांना ओळखायची आणि त्यांना जिंकून घेण्याची जबरदस्त ताकद त्यांच्याजवळ होती.

या सातवी नापास माणसाने इंजिनियरिंग शिक्षणाचे महत्व ओळखले. एका फटक्यात ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण खुलं केलं.

वसंतदादानी विनाअनुदानित इंजिनियरिंग कॉलेजला मान्यता देण्याचे धोरण मान्य केले मात्र त्याला काही अटी घातल्या.

ज्या संस्थांना स्वतःचे इंजिनियरिंग कॉलेज सुरू करायचे आहे त्यांच्या जवळ कमीतकमी २० एकर जमीन हवी आणि त्यांनी ३० लाख रुपये पाच वर्षांसाठी फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ठेवले पाहिजे.

डॉ.कराड यांना देखील स्वतःच इंजिनियरिंग कॉलेज सुरू करण्याची महत्वाकांक्षा होती. मात्र त्यावेळी सीओईपी कॉलेजमध्ये त्यांचा पगार अवघा ७०० रुपये इतका होता. १०×१०च्या दोन खोल्यांची रूम भाड्याने घेण्यासाठी त्यांना दोन वर्षे लागली होती.

अशावेळी एवढी मोठी रक्कम उभी करणे त्यांच्या स्वप्नांच्याही बाहेरची गोष्ट होती. तरीही त्यांनी धडपड सुरू केली.

अनेक ओळखी, अनोळखी व्यक्तींच्या भेटी घेतल्या. अशातच त्यांना कोणीतरी लक्ष्मी रोडवर नाक कान घसातज्ञ डॉ.सुरेश घैसास यांची भेट घेण्यास जायचा सल्ला दिला. विश्वनाथ कराड त्यांच्या क्लिनिकवर जाऊन पोहचले. डॉक्टर घैसास तेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये होते. लागोपाठ ऑपरेशन सुरू होते. मध्ये १५ मिनिटांचा ब्रेक घेऊन ते बाहेर आले तेव्हा त्यांची कराड यांच्याशी भेट झाली. दोघांच्यात इंजिनियरिंग कॉलेजबद्दल थोडंस बोलणं झालं.

डॉक्टर म्हणाले,

“कराड सर मी तुम्हाला ओळखत नाही किंवा तुमच्या बद्दल पूर्वी कधी ऐकलं नाही पण का कुणास ठाऊक मला तुम्हाला पाहिल्यावर तुमच्याबद्दल विश्वास वाटतोय. आमच्या कुटुंबाची कोथरूड येथे १५-१६ एकर जमीन आहे. जर तुमच्या ती उपयोगात येणार असेल तर मी या कार्यासाठी तुम्हाला देऊ इच्छितो.”

विश्वनाथ कराड यांना धक्काच बसला.त्यांच्या डोक्यावरचं डोंगराएवढं ओझं फक्त त्या १५, मिनिटात हलकं झालं. पूर्णतः अनोळखी असलेले डॉक्टर घैसास देवासारखे त्यांच्या मदतीला धावून आले होते. कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी आपली सोन्यासारखी जमीन कराड यांना देऊन टाकली होती. आता स्वप्न प्रत्यक्षात येण्याच्या आशा निर्माण झाल्या.

विश्वनाथ कराड यांनी अनेक खस्ता खाऊन, प्रसंगी अपमान पचवून सर्व अटींची पूर्तता केली. महाराष्ट्रातल्या पहिल्या विनाअनुदानित ९ अभियायांत्रिकी महाविद्यालयाच्या यादीत त्यांच्याही कॉलेजचं नाव होतं.

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.

पुण्यात १२५ वर्षांनी नवीन इंजिनियरिंग कॉलेज उभारले जाणार होते. याची कोनशीला बसवण्याचा कार्यक्रमासाठी खुद्द मुख्यमंत्री वसंतदादा पाटील पुण्याला आले. विश्वनाथ कराड यांची जिद्द आणि चिकाटी पाहून ते भारावून गेले. वेताळ टेकडीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी संस्था उभारण्याचे चालू असलेल्या कार्याचे त्यांना कौतुक वाटले. या कार्यक्रमातच मुख्यमंत्र्यांनी एमआयटीला या भागातली तब्बल ८५ एकर जमीन सरकारतर्फे देऊन टाकली.

वसंतदादा यांनी डॉ. कराड यांना वडीलधाऱ्या भावाप्रमाणे सल्ला दिला की आपली संस्था समाजाला उपयोगी पडेल, गोरगरिबांना मदतीला येईल अशी चालवा. तुमच्या घरचा वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे न्या.

५ ऑगस्ट १९८३ रोजी एमआयटीचा वैभवशाली प्रवास सुरु झाला.

विश्वनाथ कराड यांनी स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्था चालवली. आज एमआयटी देशातील सर्वात प्रतिष्ठित इंजिनियरिंग कॉलेज पैकी एक आहे. या संस्थेचा पसारा आळंदी, मांजरी असा अनेक ठिकाणी पसरला आहे. एमबीए कॉलेज पासून ते मेडिकल कॉलेज पर्यंत प्रत्येक गोष्टीच शिक्षण कराड यांच्या संस्थेत घेता येते. एमआयटीचा घुमट हीच त्यांची ओळख बनली आहे.

मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा तरुण टिपिकल सरकारी नोकरीच स्वप्न बघत बघत पुण्याला येतो काय आणि इंजिनियर बनून गावातली सर्वात मोठी शिक्षणसंस्था उभारतो काय हे आजही अनेकांना खरे वाटत नाही. ही कथा आहे विश्वनाथ कराड नावाच्या माणसाच्या जिद्दीची.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.