मोदींचा ताफा अडवल्यानंतर, त्यांच्या सुरक्षेच्या जबाबदारीवरुन राडा सुरू झालाय

सध्या देशात निवडणूकांचं वारं वाहतंय. पंजाब, गोवा आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचा प्रचार प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या सुरूही झालाय. त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असल्यानं ते तिकडं काय बोलणार? कुठली घोषणा करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं.

मात्र झालं भलतंच, पंजाब दौऱ्यावर असलेले मोदी हुसैनीवाला इथल्या राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देणार होते. मात्र पावसाला सुरुवात झाली आणि खराब दृश्यमानतेमुळे त्यांनी रस्ते मार्गाने स्मारकाला भेट देण्याचा निर्णय घेतला. या दोन तासांच्या प्रवासासाठी डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पूर्तता झाल्याचा ग्रीन सिग्नल मिळाला आणि प्रवासाला सुरुवात झाली.

मात्र पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला, तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवला. मोदींना १५ ते २० मिनिटांसाठी फ्लायओव्हरवर अडकून रहावं लागलं. पंतप्रधानांच्या सुरक्षेतली ही मोठी चूक होती, असं गृहमंत्रालयतर्फे सांगण्यात आलं. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ताफा पुढे सरकवणं उचित ठरणार नाही, असं सांगत मोदींचा ताफा मागे फिरवण्यात आला आणि भाषण ही रद्द झालं.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाला काँग्रेस जबाबदार असल्याची टीका केली. 

 

तर मोदींनी, ‘मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचलो यासाठी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा.’ अशी प्रतिक्रिया दिल्याचं ट्विट एएनआय वृत्तसंस्थेनं केलं आहे.

 

या सगळ्या घटनाक्रमानंतर, मोदींची सुरक्षा आणि त्याची जबाबदारी असणारा एसपीजी ग्रुप चांगलाच चर्चेत आला आहे. याआधीही एसपीजी ग्रुपची जोरदार चर्चा झाली होती, त्या निमित्तानं या एसपीजीबद्दल जाणून घेऊयात.

एसपीजी म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. भारताचे पंतप्रधान आणि त्यांचं कुटुंबीय यांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीकडे असते. पंतप्रधान चालत असताना त्यांच्या आजूबाजूला हे जवान आपल्याला दिसतात, पंतप्रधान गाडीतून लोकांना अभिवादन करत असतील तर हे जवान गाडीच्या दरवाजांवर तैनात असतात. कधी सफारीत, तर कधी जेम्स बॉंडला लाजवेल अशा सूटमध्ये, कडक गॉगल आणि हातात गन असलेले हे जवान आपल्याला कायम दिसतात.

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना झाली, एप्रिल १९८५ मध्ये. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच सुरक्षारक्षकांनी हत्या केल्यानंतर, पंतप्रधानांची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा ऐरणीवर आला आणि पंतप्रधान व त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा पाहण्यासाठी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना झाली. आधुनिक शस्त्रास्त्रं आणि खडतर प्रशिक्षणानं सज्ज असलेले ३००० जवान सध्या एसपीजीच्या ताफ्यात आहेत.

एसपीजी जवानांची निवड सैन्यदलातल्या बेस्ट जवानांमधून केली जाते. कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरं जायची सज्जता या जवानांकडे असते. पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या २४ तास सुरक्षेची जबाबदारी एसपीजी कमांडो पार पाडतात. पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या आजूबाजूलाही जवळपास ५०० कमांडो तैनात असतात.

एसपीजी जवानांसोबतच दिल्ली पोलिसांवरही पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. जर पंतप्रधान एखाद्या सभेला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहणार असतील, तर दिल्ली पोलिस आदल्या दिवशी त्या स्थळाची पूर्ण तपासणी करतात. सभेच्या दिवशीची जबाबदारी मात्र एसपीजी कमांडोजकडे असते. स्थानिक कार्यक्रमांना एसपीजीचे प्रमुख जातीनं हजर असतात.

पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत निर्णय घेण्याचे अधिकारही एसपीजीलाच असतात. नुकतीच पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यात मर्सिडीज मेबॅक ही गाडी सामील झाली. हा निर्णयही एसपीजीकडूनच घेण्यात आला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधान मोदी पुण्यात प्रचाराला आले होते. त्यावेळी एसपीजी कमांडोजनी स्थानिक पोलिसांच्या मदतीनं आजूबाजूच्या इमारतींची तपासणी केली होती. त्याचीही चांगलीच चर्चा झाली होती.

माजी पंतप्रधानांच्या आणि त्यांच्या कुटुंबाची जबाबदारीही एसपीजीकडेच असते. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना २०१९ पर्यंत एसपीजी सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही सुरक्षा काढून घेण्यात आली व गांधी कुटुंबियांना झेड प्लस सिक्युरिटीचा दर्जा देण्यात आला.

आता मोदींच्या सुरक्षेबाबत झालेल्या राड्यामुळं पंजाबच्या निवडणुकांमध्ये काय फरक पडणार आणि राजकारण पेटणार का याची जोरदार चर्चा सुरु आहे.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.