एका दिवसात ९ लाख तरुणांनी मोदींना रोजगार मागितला आहे..

रोजगाराचा मुद्दा सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रेंडला आला आहे. ट्विटरपासून युट्युब पर्यंत सगळीकडेच तरुणांनी थेट देशाच्या पंतप्रधानांचा रोजगार मागायला सुरुवात केलं आहे. जवळपास ९ लाख जणांनी #modi_rojgar_दो या हॅशटॅगचा वापर करत रोजगार देण्याची मागणी तर केलीच आहे पण त्या सोबतच भाजप २ कोटी नोकऱ्या देणार होते, त्या आश्वासनाचे काय झालं? असा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे.

काय आहे नक्की विषय?

भारतात दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीमधील विविध पदांसाठी एक परीक्षा होती. SSC म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून कम्बाईन ग्रॅज्युएट लेव्हल एगझामिनेशन (CGL) हि परीक्षा घेतली जाते. दरवर्षी लाखोंच्या संख्येनं मुलं यात उतरतात.

२ वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये दुसऱ्या श्रेणीसाठीच्या परीक्षांची घोषणा झाली. नोव्हेंबर २०२० मध्ये १५, १६ आणि १७ अशा तारखांना तीन टप्प्यात ही परीक्षा झाली. या परीक्षेचा निकाल लागला यावर्षी १९ फेब्रुवारीला. हा निकाल जाहीर झाल्या नंतरच ‘#modi_rojgar_दो’ या हॅशटॅगला सुरुवात झाली.

या परीक्षार्थ्यांच म्हणणं आहे की,

१८ नोव्हेंबरचा पेपर सोपा होता आणि मुलांनी त्यात चांगले मार्क मिळवले. काहींनी तर २०० पैकी २०० मार्क्स् पण मिळाले, पण जेव्हा निकाल आला तेव्हा ज्यांना चांगले मार्क्स मिळाले होते अशा बऱ्याच मुलांची निवड झालेली नाही. सोबतच विद्यार्थ्यांचा आरोप आहे की,

१८ नोव्हेंबरला घोषित झालेल्या कट ऑफ मधून १०० मार्क्स कापले आहेत. त्याच वेळी १५ आणि १६ नोव्हेंबरला ज्या मुलांनी परीक्षा दिली, त्यातील अनेकांचे ७० ते ८० मार्क्स वाढवले आहेत.  

स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, एसएससी मागच्या काही वर्षांपासून सातत्याने जागा कमी करत आहे आणि वेटिंग लिस्ट देखील काढत नाही. याआधी निवड झालेल्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त एक वेटिंग लिस्ट निघत होती. जर निवड झालेला विद्यार्थी काही कारणांनी जॉईन करू शकला नाही तर ती जागा वेटिंग लिस्ट मधील उमेदवाराला दिली जायची.

पण या परीक्षेत असं बघायला मिळालेलं नाही आणि विद्यार्थ्यांच्या नाराजीचे हे देखील एक कारण आहे. 

सरकारच्या या जागा कमी करण्याच्या धोरणामुळेच तरुण मुलं बेरोजगार राहण्याचं प्रमाण वाढलं आहे, आणि त्यातूनच #modi_rojgar_दो हे हॅशटॅग ट्रेंडिग मध्ये आहे, आणि तरुणांच्या हाताला काम देण्याची मागणी होतं आहे, असं देखील या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे.

CMIE प्रायव्हेट लिमिटेडच्या महेश व्यास यांच्या आकडेवारीनुसार,

कोरोना संकटापूर्वी २०१९ – २० या आर्थिक वर्षात भारतात ३.५ कोटी लोक बेरोजगार होते. पण कोरोना काळात या संकटाने गंभीर स्वरूप धारण केलं. मागच्या १ वर्षात ज्यांच्याकडे काम होतं त्यांनी देखील ते गमावलं. अनलॉक झाल्यानंतर काही लोकांना काम मिळाले पण तरीही परिस्थिती गंभीरच आहे.

ज्यांच्या जवळ नोकरी आहे अशांच्या संख्येत २०१६ पासून सातत्याने घट होत आहे. २०१६-१७ मध्ये नोकरी असलेल्यांचं आकडा ४०.७३ कोटी होता, २०१७ – १८ मध्ये त्यात घट होतं ४०. ५९ कोटींवर आला. तर २०१८-१९ या आर्थिक वर्षात हा आकडा ४०.०९ कोटी पर्यंत आला.

सध्याच्या परिस्थिती बेरोजगार असलेले आणि नोकरी गमावलेले अशा सगळ्यांचा आकडा ४.५ कोटी पर्यंत गेला आहे. 

भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने बघितलं तर दरवर्षी २ कोटी लोक १५-५९ वर्किंग पॉप्युलेशनच्या ग्रुपमध्ये येतात, पण सगळ्यांच्याच हाताला काम मिळतं असं होतं नाही. यात अनेक जण काम न मिळाल्यामुळे शांत बसतात, शेतात कामाला जातात. तर महिलांना सामाजिक निर्बंध, कायदा आणि सुव्यवस्था यामुळे घरी थांबवलं जातं.

CMIE प्रायव्हेट लिमिटेडच्या महेश व्यास यांच्या म्हणण्यानुसार,

जर हे सगळे काम शोधायला मार्केटमध्ये आले तर बेरोजगारीची संख्या आणखी वाढेल. जवळपास १.५ कोटी लोकांची नवीन फौज समोर येऊन उभी राहील.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.