ते म्हणाले, “फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करणे ही मोहिते पाटलांची परंपरा नाही..”

राजकारणातील एकमेव सत्य म्हणजे ते दरदिवशी बदलत असतं. सत्तेची खुर्ची आपलं रंग बदलत असते.  आज तुम्ही प्रगतीच्या शिखरावर असता तर काही वेळातच तुम्हाला जमिनीवर आदळून कोणी तरी तुमची जागा घेतलेला असतो हा अनुभव प्रत्येक नेत्याने घेतला असतो. या सगळ्या चढ उताराला पुरून उरणारे काही नेते असतात जे राजकरणात अजातशत्रू म्हणून आपली छाप पाडतात.

अशाच एका अजातशत्रू नेत्याचा किस्सा

गोष्ट होती १९७५ सालची. वसंतराव नाईकांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरची विक्रमी ११ वर्षे पूर्ण झाली होती.

फक्त राज्यपातळीवरच नाही तर राष्ट्रीय स्तरावर देखील वसंतराव नाईकांचा दबदबा निर्माण झाला होता. धान्य उत्पादनात महाराष्ट्राला स्वयंपूर्ण बनवण्याचे त्यांचे प्रयत्न हे तर सर्वमान्य झाले आहेत. ७२ च्या दुष्काळात तर अन्नधान्याची अभूतपूर्व अशी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी त्यांनी ५० लाख लोकांना टंचाई निवारणाच्या केंद्रावरती काम दिले होते. या कल्पक योजनेमुळे ते देशभर प्रसिद्ध पावले. 

त्यांची रोजगार हमी योजना ही तर भारतातील ग्रामीण भागाच्या उत्कर्षाची वाटचाल करणारी ठरली होती.

पण पुढे वसंतराव नाईक आणि केंद्रातील नेतृत्व यामध्ये अंतर पडू लागलं. नाईकांच्या बद्दल पंतप्रधान इंदिरा गांधींच्या मनात एक अढी निर्माण करून देण्यात आली. पक्षांतर्गत विरोधकांच्या पद्धतशीर प्रयत्नामुळे नाईकांचं वजन कमीकमी होत गेलं.

अचानक एक दिवस पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतलं आणि राजीनामा द्यायला लावला. त्यांना राज्यपालपदी जाण्याची ऑफर दिली पण वसंतराव नाईकांनी ती ऑफर नम्रपणे नाकारली आणि मुख्यमंत्रीपदाची सूत्रे खाली ठेवून मुंबईला परतले. त्यांच्या जागी मराठवाड्यातल्या शंकरराव चव्हाणांना मुख्यमंत्री करण्यात आलं.

तब्बल १२ वर्षांनी वसंतराव नाईकांनी वर्ष बंगला सोडला तेव्हा त्यांची राजकीय कारकीर्द कायमची संपुष्ठात आली हे स्वच्छ होतं. नाईक हे विरोधी पक्षात जाण्याची शक्यता नव्हती. काँग्रेस विरोधात जाऊन राजकारण करण्याची महत्वाकांक्षा देखील नव्हती. राजकरणात भरभरून मिळालं म्हणून ते समाधानी होते.

पण जशी सत्ता गेली तशी वसंतराव नाईकांच्या अवतीभोवती असलेल्या माणसांची गर्दी कमी होऊ लागली. वसंतराव नाईकांचा दबदबा कमी झालाय हेच चित्र दिसू लागलं. एरव्ही मुख्यमंत्री असताना त्यांना कार्यक्रमाची अनेक निमंत्रणे यायची. पण खुर्ची सोडल्यावर त्यातली अनेक निमंत्रणे रद्द करण्यात आली.

एकदा वसंतराव नाईक आपल्या गावाकडच्या घरी विश्रांती घेत बसले होते. समोरच्या टेबलावर एक निमंत्रण पत्रिका त्यांचं लक्ष वेधून घेत होती. त्यांनी ते पाहिलं. अकलूज येथे भव्य कृषी औद्योगिक प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी आपल्याभागातील  भागातील शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन भरवलं होतं आणि मुख्यमंत्री म्हणून वसन्तराव नाईकांना आमंत्रण पाठवलं होतं.

राजीनामा देऊन दोन चारच दिवस झाले होते. वसंतरावांनी अकलूजला फोन लावला आणि आता येणे शक्य नसल्याचं सांगितलं. पण शंकरराव मोहिते ऐकायला तयार नव्हते. त्यांनी हट्टाने वसंतराव नाईकांना अकलूजच्या प्रदर्शनात बोलवून घेतलं.        

अकलूज माळशिरस भागातील भाग्यविधाते म्हणून ओळखले जाणारे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील हे मध्यंतरी जपान दौऱ्यावर गेले होते. तिथे एक्स्पो-७० हे प्रदर्शन पाहिल्यापासूनच शंकररावांनी आपल्या भागात  शेतकऱ्यांसाठी नवनवीन संकल्पना व प्रकल्प राबविण्यास प्रचंड गती घेतली होती. 

जपान दौऱ्यानंतर त्यांनी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर २ ते १३ मार्च १९७५ या काळात प्रदर्शनाचं आयोजन केलं. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाबरोबरच इतर अनेक कंपन्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला. प्रदर्शनाचे उद्घाटक होते मुख्यमंत्री वसंतराव नाईक. उद्घाटनाच्या चार-दोन दिवस आधीच वसंतराव नाईकांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे खाली ठेवली होती. परंतु ठरल्याप्रमाणे ते उद्घाटनाला आले. 

आपल्या उद्घाटनाच्या भाषणात नाईकसाहेब म्हणाले, 

“मी शंकररावांना सांगितलं की, मी आता मुख्यमंत्री नाही तरी येऊ म्हणता? त्यावेळी हा तुमचा नेता मला म्हणाला, साहेब, मी मुख्यमंत्र्यांना बोलावलं नव्हतं. मी वसंतराव नाईकांना बोलावलं होतं. त्यातल्या ‘शेतकऱ्याला’ बोलावलं होतं.”

वसंतरावांच्या नंतर भाषणासाठी शंकरराव मोहिते पाटील उभे राहिले आणि म्हणाले,

 “मी उगवत्या सूर्याला नमस्कार करणारा माणूस नाही नाईकसाहेब! कारण त्याचं कर्तृत्व अजून सिद्ध झालेलं नाही. मी मावळत्या सूर्याला नमस्कार करतो; कारण त्याचा कार्यकाल सिद्धीला गेलेला असतो. त्याचं कार्य जगापुढं आलेलं असतं त्यानं आपल्या कारकिर्दीत जगाला प्रकाशमान केलेलं असतं. म्हणून कृतज्ञतेनं मावळत्या सूर्याला नमस्कार करणारा मी आहे!”

हे शब्द ऐकून वसंतराव नाईक कृतकृत्य झाले. त्यांच्यातल्या राजकारण्यांपेक्षा त्यांच्यातला शेतकरी प्रचंड सुखावला. 

हे प्रदर्शन संपूर्ण देशभरात गाजले. त्यात शेतकऱ्यांना प्रेरणा देतील अशा कित्येक गोष्टी होत्या. नवनवीन यंत्रे, अवजारे, शेती पंप, पिकांचे नवीन संकरित वाण, संकरित गायी अशी दोनशे दालने उभारली होती. ज्ञानाचे भांडारच शेतकऱ्यांसाठी खुले केले होते. 

आषाढीला पंढरीत जशी वारकऱ्याची झुंबड उडते त्याप्रमाणे या प्रदर्शनासाठी जिल्हा व जिल्हाबाहेरील पाच-सहा लाख लोकांची झुंबड उडाली. आपल्या पदरात उत्कर्षाचे नवे माप घेऊन शेतकरी परतले.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.