पोराबद्दल प्रश्न विचारला म्हणून, केंद्रीय मंत्र्यानं डायरेक्ट पत्रकाराची कॉलर पकडली

गेल्या वर्षभरापासून देशात सगळ्यात जास्त चर्चा कुठल्या गोष्टीची असेल, तर ती म्हणजे शेतकरी आंदोलन. सप्टेंबर २०२० मध्ये मोदी सरकारनं संसदेत कृषी कायदे मंजूर केले. त्यानंतर पंजाब आणि हरियाणामधल्या शेतकऱ्यांनी या विरोधात आवाज उठवला. त्यांनी चेतवलेली ठिणगी सगळ्या भारतात पसरली आणि देशातले अनेक शेतकरी एकत्र आले. दिल्लीच्या सीमेवर ऐतिहासिक असं आंदोलन पार पडलं.

हे आंदोलन शांततेच्या मार्गानं सुरू होतं. २६ जानेवारी २०२१ रोजी म्हणजेच देशाच्या प्रजासत्ताक दिनादिवशी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. फक्त भारतातच नाही तर जगभरातल्या माध्यमांमध्ये या प्रकाराची चर्चा झाली. बरीचशी लोकं शेतकऱ्यांना पाठिंबा देऊ लागली. या सगळ्यानंतरही आंदोलन पुन्हा शांतता मार्गानं सुरू राहिलं. यात अपवाद होता तो लखीमपूर खेरी इथं घडलेल्या प्रकाराचा.

हे प्रकरण सध्या का तापलंय?

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना एका पत्रकारानं लखीमपूर खेरी प्रकरणात एसआयटी चौकशीचं काय झालं? या बाबत प्रश्न विचारला. आता उत्तर द्यायचं सोडून, मंत्री महोदय चांगलेच चिडले. त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला शिवीगाळ केली. त्याची गचांडीही धरली आणि मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिथं उपस्थित असणाऱ्या आणखी एका पत्रकारानं मंत्रीमहोदयांनी आपला मोबाईल जप्त केल्याचं सांगितलं. या सगळ्या प्रकरणाचा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेनं ट्विट केला आहे.

 

या घटनेमुळं विरोधकांनी मिश्रा यांच्यावर निशाणा साधला-

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी अजय मिश्रा टेनी यांच्यावर जबरदस्त टीका केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मिश्रा यांच्या आजच्या कृतीमुळं पत्रकारांनीही त्यांच्यावर कारवाई होण्याची मागणी केली आहे.

लखीमपूरमध्ये नक्की काय घडलं होतं…

लखीमपूरच्या संपूर्णानगरमध्ये एक शेतकरी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं, त्यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी उपस्थित होते. त्याआधी काही दिवसांपूर्वी काही शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते. टेनी यांनी संमेलनात बोलताना शेतकऱ्यांना इशारा दिला, “मी फक्त मंत्री किंवा खासदार नाही. मी आमदार आणि खासदार होण्याच्या आधीपासून जे लोक मला ओळखतात, त्यांना माहिती आहे, की मी कोणतंही आव्हान स्विकारायला घाबरत नाही. ज्या दिवशी मी आव्हान स्वीकारेल त्या दिवशी फक्त पलिया नाही, तर लखीमपूरही सोडून जावं लागेल हे लक्षात ठेवा.” त्यांच्या या इशाऱ्यानंतर, शेतकरी चांगलेच चिडले. त्यांनी २९ सप्टेंबरला लखीमपूरच्या खेरटिया गावात मिश्रा यांना विरोध करण्याची प्रतिज्ञा केली.

ठरल्याप्रमाणं शेतकऱ्यांनी मिश्रा यांना विरोध केला, त्यांची निदर्शनं सुरू असताना अचानक गर्दीमध्ये फोर व्हीलर घुसली आणि त्या भरधाव गाडीनं शेतकऱ्यांना चिरडलं. या गोष्टीमुळं हिंसाचार उफाळला आणि त्यात आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेसाठी अजय मिश्रा टेनी यांचे पुत्र आशिष मिश्रा यांना जबाबदार ठरवण्यात आलं.

कोर्टानं आशिष यांच्यावर प्लॅनिंग करुन हिंसा केल्याचा आणि शस्त्रास्त्रांचा गैरवापर केल्याचा आरोप ठेवला आहे. त्यामुळं आता अजय मिश्रा टेनी यांना राजीनामा द्यावा लागणार का? आणि संसदेत या घटनेचे पडसाद उमटणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात असेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.