दोन मोठ्या नेत्यांच्यात वादात पडायचं नाही म्हणून चक्क खासदारकीचं तिकीट नाकारलं…

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले-इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ. कृष्णा पंचगंगेच्या पाण्याने सुपीक झालेला, साखर कारखानदारीच्या जीवावर समृद्ध झालेला भाग. सहकारी चळवळीतून विकास कसा करायचा असतो याचं उदाहरण म्हणून या भागाकडे पाहिलं जातं.

याच सहकारी चळवळीचे प्रणेते आणि इचलकरंजीचे माजी खासदार म्हणजे दत्ताजीराव कदम.

कोल्हापूर जिल्हा हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला होता. छत्रपती शाहू महाराजांचे संस्कार असल्यामुळे इथे बहुजन समाजाला शिक्षणाचं महत्व लवकर कळालं. स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासून राजकीय सक्रियता आली. रत्नाप्पा कुंभार,बाबासाहेब खंजीरे यांच्या सारख्या क्रांतिकारकांनी शिरोळ हातकणंगले परिसर गाजवला.

पुढे हे सगळे नेते काँग्रेसमध्ये आले. अनेक राजकीय विचारांचे प्रवाह, दिग्गज नेते एकत्र आल्यामुळे काँग्रेसमध्ये गटबाजी होणे साहजिक होते. विशेषतः रत्नाप्पा कुंभार हे सुरवातीपासून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार समजले जायचे. त्यामुळेच त्यांच्या विरुद्ध सहकार सम्राटांची माळच लावण्यात आली होती. या गटबाजीमुळे उलट शिरोळ हातकणंगले इचलकरंजी भागाचा विकासच झाला. 

पण याचा परिणाम इथल्या लोकसभेवर व्हायचा. १९६७ साली थेट इंदिरा गांधी ज्यांना संरक्षण मंत्री  करणार होत्या त्या जनरल थोरात यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराला देखील पराभव स्वीकारावा लागला होता. एरव्ही काँग्रेसच्या तिकिटासाठी भांडणारे नेते लोकसभेच्या खासदारकीला मात्र घाबरू लागले.

अशा परिस्थितीत दत्ताजीराव कदम या सहकारात काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला या मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळाली.

दत्ताजीराव कदम स्वातंत्र्यलढ्याचा भाग नव्हते मात्र  इचलकरंजीच्या यंत्रमाग व्यवसायातून त्यांनी सुरवात केली होती. पुढे काँग्रेस पक्षातून त्यांनी सहकार क्षेत्रात उडी घेतली. अगदी तळागाळातल्या नेत्यांपासून ते थेट यशवंतराव चव्हाणांपर्यंत त्यांचा अगदी जिव्हाळ्याचा संपर्क होता. इचलकरंजी परिसरात सहकारी सूतगिरणी, सहकारी बँका, पतसंस्था, साखर कारखाने इत्यादी उभे करण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला.

दत्ताजीराव कदम हे गटातटाच्या पलीकडे जाणारे नेते होते. सर्व नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. इचलकरंजी हातकणंगले परिसरात त्यांच्या उमेदवारीवर कोणाचा आक्षेप असण्याचं काही कारण नव्हतं. पण पार शाहूवाडी कोकणापर्यंत पसरलेल्या या मतदारसंघात प्रचार करणे हे कदम अण्णा यांच्यासाठी मोठे आव्हान होते.

त्यांच्या विरुद्ध विरोधकांनी शेकापचे जेष्ठ नेते त्र्यंबक कारखानीस यांना तिकीट दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात कारखानीस यांना एक स्वच्छ चारित्र्याचे निस्पृह ऋषितुल्य नेतृत्व म्हणून ओळखलं जायचं. त्यांच्याशी टक्कर देणे हे खरंच जिकिरीचं काम होतं. पण दत्ताजीराव कदमांनी ते धाडस केलं.

त्यांनी घडवलेल्या कल्लाप्पा आवाडे, अनंतराव भिडे अशा अनेक कार्यकर्त्यांनी झाडून प्रचार केला. अखेर प्रयत्न फळाला आले. शेकापला लाखभर मतांनी हरवून दत्ताजीराव कदमांनी  मिळवला. त्यांचा हा विजय कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेससाठी ऐतिहासिक मानला गेला.

त्याकाळात दक्षिण महाराष्ट्राचे नेतेपद सांगलीच्या वसंतदादा पाटलांकडे होतं. स्वतः वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाणांना आपला नेता मानायचे. पण तत्कालीन मुख्यमंत्री शंकराव चव्हाण यांच्या बरोबर वाद झाल्यामुळे दादांचे मंत्रिपद गेलं. त्यांनी कृष्णेच्या पुलावर राजकीय वस्त्रे फेकून दिली आणि थेट राजकारणातून संन्यास घेतला.

 वसंतदादा पाटील आणि काँग्रेस नेतृत्वाच्या दुराव्याचे पडसाद गाव पातळीवरच्या नेत्यांवर देखील पडले. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते कार्यकर्ते संभ्रमात पडले. कोणाची बाजू योग्य याचा निर्णय होत नव्हता.

अशातच १९७७ सालच्या लोकसभा निवडणुका आल्या. दत्ताजीराव कदमांना काँग्रेसने तिकीट दिलं. पण दत्ताजीराव कदमांनी यावेळी चक्क तिकीट नाकारलं. वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाण या भांडणात कोणाचीही बाजू घेणे त्यांना पटत नव्हते. वसंतदादा पाटलांच्या स्वाभिमानासाठी त्यांनी आपल्या खासदारकीवर पाणी सोडलं. 

१९७७ साली त्यांच्या ऐवजी इचलकरंजी मधून बाळासाहेब माने उभे राहिले आणि प्रचंड मोठ्या मतांनी निवडून आले. तिथून पुढे इचलकरंजी हातकणंगले मतदारसंघ बाळासाहेब माने घराण्याचा आपला हक्काचा बनला. मनाचा मोठेपणा दाखवणारे दत्ताजीराव कदम राजकारणातून काहीसे मागे पडत गेले. 

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.