मुंडे महाजनांनीच वरुण गांधींना भाजपमध्ये आणलं होतं..

राहूल गांधींची भारत जोडो यात्रा ज्यावेळी उत्तर प्रदेशात पोहोचली होती तेव्हा वरूण गांंधी यात्रेत सहभागी होतील, येवढंच नाही तर ते काँग्रेसमध्येही प्रवेश करतील असंही बोललं जात होतं. त्यावेळी राहूल गांधींनी आम्हा दोघांची विचारधारा वेगवेगळी असल्याचं सांगितलं होतं.
त्यानंतरही या चर्चा काही थांबल्या नाहीत. आता वरूण गांधींच्या आई मेनका गांधी यांनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतलीये. आपलाच पक्ष असलेला भाजप आणि सरकारच्या विरोधात ठोसपणे भुमिका मांडणारे वरूण गांधी तेव्हापासून मात्र विरोध करताना दिसत नाहीयेत. त्यामुळं आता वरूण गांधी भाजपला राम राम देणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईलच.
मुळात प्रश्न पडतो तो म्हणजे गांधी कुटूंबाचे सुपूत्र वरूण गांधी हे भाजपच्या गळाला लागलेच कसे? नेमक्या याच प्रश्नाचं बघुया.
एकेकाळी शेठजी भटजींचा पक्ष म्हणून हिनवले जाणाऱ्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राच्या तळागाळात नेऊन पोहचवणारे राम लक्ष्मण म्हणजे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे. या जोडगोळीने फक्त राज्याच्याच नाही तर देशाच्या राजकारणात अनेक नेते घडवले. फक्त एका चौकटीत अडकलेल्या भारतीय जनता पक्षाला नवं नेतृत्व देऊन अवकाश विस्तारायचं काम या दोन्ही नेत्यांनी केलं.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षण काई मनोहर पर्रीकर हे देखील मुंडे महाजनांची फाईंड आहेत. भाजपचा मुस्लिम चेहरा शाहनवाज हुसेन,केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, खासदार हेमा मालिनी अशा नव्या नेतृत्वाला संधी त्यांनी दिली.
याच मांदियाळीत बसणारं आणखी एक नाव म्हणजे गांधी घराण्याचे वारसदार वरुण गांधी
प्रमोद महाजन हे पंतप्रधान वाजपेयी यांचे उजवे हात समजले जायचे. अंबानी प्रकरणामुळे त्यांचं मंत्रीपद जरी गेलं असलं तरी राजकीय महत्व कमी झालं नव्हतं. भाजपचे ते राष्ट्रीय सचिव होते. सगळ्या निवडणुका, त्यांचे कॅम्पेनिंग, स्ट्रॅटेजी बनवणे या सगळ्या जबाबदाऱ्या वाजपेयींनी प्रमोद महाजन यांना दिलेल्या होत्या.
साल २००४, लोकसभा निवडणुकांचं वर्ष होतं. राजीव गांधी यांचे सुपुत्र राहुल गांधी राजकारणात येणार याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. काँग्रेस पक्षाचे भावी युवराज म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं होतं. अमेरिकेतून शिकून आलेले चष्मा घालणारे राहुल गांधी सिन्सियर वाटायचे. तस बघायला गेलं तर सलग तीन चार निवडणुका हरलेली काँग्रेस आता संपली असच वाटत होत तरी तरुण राहुल गांधी पक्षात खळबळ करू शकतील याची धास्ती होतीच.
राहुल गांधींवर उतारा म्हणून प्रमोद महाजन यांनी संजय गांधी पुत्र वरुण गांधी यांना राजकारणात आणायचं ठरवलं.
एककाळ होता संजय गांधी यांनी आणीबाणीत केलेल्या अत्याचाराच्या आरोपावरून भाजप नेते आपल्या प्रचार सभा दणाणून सोडायचे. इंदिरा गांधींना धारेवर धरायचे. पण संजय गांधी यांचं निधन झालं आणि इंदिरा राजीव यांच्याशी भांडण काढत मनेका गांधी यांनी सासर सोडलं आणि काँग्रेसदेखील सोडली. पुढे अनेक वर्ष त्या जनता पक्षात होत्या. राजीव गांधींच्या विरुद्ध निवडणूक लढवली.
पुढे १९९८ साली त्या वाजपेयींच्या मंत्रिमंडळात आल्या. पण भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला नव्हता. त्या निवडणूक अपक्षच लढवायच्या. पुढे मागे कधीही काँग्रेस मध्ये परतून संजय गांधींच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष सोनियांच्या हातातून हिसकावून घेण्याच्या योजना त्यांच्या मनात होत्या.
वरुण गांधी मात्र तरुण तडफदार होते. त्यांचं वय तेव्हा अवघे २४ वर्षे असेल. त्यांच्या चालण्या बोलण्यामध्ये संजय गांधी यांची झलक दिसायची. अनेक जण त्यांना काँग्रेसमध्ये आणायचा प्रयत्न करत देखील करत होते. त्यातच एंट्री झाली मुंडे आणि महाजनांची.
प्रमोद महाजनांनी दिल्लीत मनेका गांधी आणि वरुण गांधी यांची भेट घेतली. त्यांच्याशी बोलणी केली आणि चाळीसगावच्या एका सभेत टाकला,
वरूण गांधी हे भाजपमध्ये येत आहेत.
महाजन फक्त तेवढं बोलून शांत बसले नाहीत तर वरुण गांधी यांच्या भाजप प्रवेशामुळे संजय गांधींचे जुने कार्यकर्ते देखील पक्षात येणार. निम्मी काँग्रेस फुटेल अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती.
प्रमोद महाजन यांच्या या वक्तव्यानंतर भाजपमध्येच फूट पडली. गांधी घराण्याच्या धाकट्या युवराजाला भाजपमध्ये घेणे योग्य कि अयोग्य यावरून भांडणे सुरु झाली. भारतभर चर्चेची वादळे उठली.
पुढच्या एका आठवड्या भरातच वरुण गांधी यांनी भाजप प्रवेश जाहीर केला. एवढंच नाही तर मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या सामाजिक कार्यातील २५ वर्षांच्या पूर्तते बद्दल मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते वरुण गांधी. त्यांच्या उपस्थितीमुळे अनेकांचे टवकारले होते.
वरुण गांधी यांची राजकीय एंट्री याच कार्यक्रमातून झाली. आपल्या भाषणात मुंडे आणि महाजन यांना त्यांनी धन्यवाद दिले. थेट गांधी घराण्याचा चिराग पळवला म्हणून महाजनांची कॉलर देखील ताठ झाली.
हे ही वाच भिडू.
- कोणालाच विश्वास नव्हता, तेव्हा प्रमोद महाजनांनी चॅलेंज देऊन भाजपची सत्ता आणली..
- अहो चंद्रकांत दादा, अब्दुल कलाम मोदींमुळे नव्हे तर प्रमोद महाजनांमुळे राष्ट्रपती झाले होते
- गोपीनाथ मुंडेंच्या त्या सुप्रसिद्ध संघर्षयात्रेमुळेच शरद पवारांचं सरकार पडलं
- पक्ष कोणताही असो उदयनराजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे गोपीनाथ मुंडेच होते