निवडणुका नगरपंचायतींच्या पण भविष्य टांगणीला लागलंय बड्या नेत्यांच !

राज्यात डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या ३९, तर पंचायत समितीच्या ७९ निर्वाचक गणांसाठी मतदान होत झालं होतं. या निवडणुकीत एकूण ७ लाख ६८ हजार ८६६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. १३२२ मतदान केंद्रावर मतदान करण्याची प्रक्रिया पार पडली.

यात २१ डिसेंबर २०२१ रोजी ३२ जिल्ह्यातील काही नगरपंचायतीं साठी मतदान झालं होत तर उर्वरित मतदान आज १८ जानेवारी २०२२ रोजी झालं आहे. एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडली होती. उद्या या निवडणुकांचे निकाल आहेत. मात्र या निकालावर काही राजकीय नेत्यांची गणित आणि भविष्य अशा दोन्ही गोष्टी अवलंबून आहेत.

यात महाराष्ट्रात काही ठिकाणी हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाणार आहे. 

पाहिलं बघू पश्चिम महाराष्ट्रातला सातरा जिल्हा.

सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायतसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये तालुक्यातील दोन नगरपंचायती सध्या चर्चेचा विषय ठरल्या. त्यातील एक पाटण. इथे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर असा संघर्ष पहायला मिळत आहे.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू आहेत. तर राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र आहेत.

सत्यजितसिंह पाटणकर हे सन २००७ मध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत ते पहिल्यांदा निवडून आले. सभापतीपद भूषवले. या काळात त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये नावलौकिक प्राप्त केला. सन २०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा शंभूराज देसाई यांच्याकडून पराभव झाला होता. आत्ताच्या झालेल्या सातरा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पाटणकर निवडून आले तर शंभूराज देसाई यांचा धक्कादायक पराभव झाला, त्यामुळे आत्ताची निवडणूक पाटण खोऱ्यात गाजणार आहे.

त्याचबरोबर कोरेगाव तालुक्यातील मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा गट आणि आमदार महेश शिंदे यांचा गट आमने-सामने ठाकले आहेत.

नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष उतरले होते. परंतु त्यावेळी खरी लढत काँग्रेस व राष्ट्रवादीमध्येच झाली होती. राष्ट्रवादीसाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी नगरपंचायतीची पहिली निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यावेळी १७ पैकी नऊ जागा मिळवून राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली होती. पहिल्या टर्ममध्ये राष्ट्रवादीने राजाभाऊ बर्गे यांना नगराध्यक्षपदी, तर जयवंत पवार यांना उपाध्यक्षपदी संधी दिली. वर्ष-दोन वर्षे आलबेल होत.

परंतु त्यानंतर मात्र कोणता नगरसेवक कोणत्या बाजूला आहे हे समजण्यापलीकडची स्थिती निर्माण झाली. नंतरच्या टर्ममध्ये आघाडीचा प्रयोग झाला आणि नगराध्यक्षपदी काँग्रेसला संधी मिळाली. उपाध्यक्षपदी काही काळ राष्ट्रवादीला संधी मिळाली.

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे व महेश शिंदे यांचा सामना झाला आणि महेश शिंदे आमदार झाले. या निवडणुकीतच शहरातील राजकीय समीकरणे बदलल्याने राष्ट्रवादी व काँग्रेस या दोन्ही पक्षांमधील काही नगरसेवक महेश शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले. दरम्यान, नगरपंचायतीमध्ये काँग्रेसच्या नगराध्यक्षा व राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा असतानाही पहिल्या टर्मच्या तुलनेत दुसऱ्या टर्ममध्ये आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे दिसू लागली. त्यानिमित्ताने आमदार महेश शिंदे यांनीही राजाभाऊ बर्गे, महेश बर्गे, राहुल बर्गे, सुनील बर्गे आदींच्या साथीने शहरात जनसंपर्क प्रस्थापित केला. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी झाली आणि कोरेगावात पक्ष राहिले बाजूला शशिकांत शिंदे विरुद्ध महेश शिंदे असा ड्रामा रंगला.

सोलापूर जिल्ह्यातील १९ नगरपंचायत जागांसाठी आज मतदान झालं. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, नातेपुते , श्रीपूर महाळुंग , माढा आणि वैराग या पाच नगरपंचायत मधील १९ जागांसाठी आज सकाळीपासून मोठ्या उत्साहाने मतदानास सुरुवात झाली .

पण माळशिरस तालुक्यातील माळशिरस, नातेपुते, श्रीपूर महाळुंग या तीन नगरपंचायत निवडणुकीत मोहिते पाटील गटाचे वर्चस्व पणाला लागलय. नातेपुते आणि श्रीपूर या दोन नगरपंचायतीमध्ये मोहिते पाटील यांच्यातील वेगवेगळ्या गटात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. याशिवाय मोहिते पाटील यांच्याशिवाय लढणाऱ्या राष्ट्रवादीची ताकद देखील यावेळी समजणार असल्याने या सर्वच ठिकाणी अतिशय चुरशीच्या लढती होत आहेत. माढा नगरपंचायत निवडणुकीत भाजपाला उमेदवार मिळविण्यासाठी केविलवाणी धडपड करावी लागली होती. दादा साठे विरुद्ध राष्ट्रवादी अशी प्रमुख लढत दिसत आहे.

पुण्यात एकमेव देहू नगरपंचायतीची निवडणूक आज पार पडली.

ग्रामपंचायतीतून नगरपंचायतीत निर्मिती झाल्यानंतर इथं पहिल्यांदाच निवडणूक पार पडत आहे. त्यामुळं राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके विरुद्ध भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सध्या देहूची लोकसंख्या ४० हजारापेक्षा जास्त आहे.त्यामुळे देहूचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्यात आले. ग्रामपंचायतीमध्ये पूर्वी सतरा सदस्य होते. नव्याने नगरपंचयातमध्ये १७ सदस्यच संख्या निश्चित झाली आहे. यात अनुसुचित जातीसाठी ३ जागा, अनुसुचित जमातीसाठी १ जागा, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ५ जागा आणि महिलांसाठी ९ जागा राखीव आहेत. महिलांच्या ९ राखीव जागापैकी दोन जागा अनुसुचित जातीसाठी, तीन जागा नागरिकांच्या मागार प्रवर्गासाठी आणि चार जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत.

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगर पंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. सतरा जागांपैकी उर्वरित चार जागांसाठी आज मतदान झालं असून पंधरा उमेदवार रिंगणात आहे.

राज्यात आघाडी सरकार असले तरी या निवडणुकीत प्रत्येक पक्ष हा स्वतंत्रपणे लढत आहे. एकनाथ खडसे यांच्या मतदार संघातील ही निवडणूक होत असल्याने एकनाथ खडसे, गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटील आणि मंत्री गुलाबराव पाटील या नेत्यांच्या प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली असल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार या कडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.

दापोली मंडणगड मतदारसंघात नगरपंचायत निवडणूक उर्वरित चार जागांसाठी आज मतदान झाले आहे. अवघ्या राज्याच लक्ष या निवडणूकीकडे लागले आहे. माजी मंत्री शिवसेना रामदास कदम आणि सध्याचे परीवहन मंत्री शिवसेना अनिल परब यांची प्राणप्रतिष्ठा पणाला लागली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील रिसॉर्टप्रकरणी केलेल्या पाठपुराव्याचा मोठा फटका पालकमंत्री अनिल परब यांना सहन करावा लागला. या साऱ्या प्रकरणात परब यांच्यावर शिंतोडे उडाले. सोमय्या यांना या रिसॉर्टबाबत माहिती पुरवण्यात शिवसेना नेते रामदास कदम यांचाच मोठा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला आणि त्यासाठी काही ऑडिओ क्लिपही सादर केल्या. त्यामुळे साहजिकच अनिल परब आणि रामदास कदम यांच्यामध्ये वितुष्ट आले.

या प्रकरणात अनिल परब किंवा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणतीही बाजू मांडली नसली तरी या साऱ्यामध्ये शिवसेनेकडून रामदास कदम यांना दोषी मानण्यात येत असल्याचे दिसलं. त्यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकांमधून रामदास कदम यांचा पत्ता कट करण्यात आला. केवळ त्यांच्या आमदारकीला ब्रेक लावून न थांबता अनिल परब यांनी आता दापोली, मंडणगड नगरपंचायतीची मुख्य सूत्रे सूर्यकांत दळवी यांच्याकडे सोपवून पुढील चाल खेळल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

२०१४ विधानसभेत पराभूत झाल्यानंतर दळवी यांनी आपल्या पराभवाला रामदास कदम यांनाच जबाबदार धरले होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकांमध्ये या जागी योगेश कदम यांची वर्णी लागली. त्यामुळे दळवी आणि रामदास कदम, तसेच दळवी आणि योगेश कदम यांच्यामध्ये सख्य नाही. शत्रूच्या शत्रूला मित्र मानण्याचा सिद्धांत इथं लागू झाला. कदम यांच्यावर मात करण्यासाठी परब यांनी सूर्यकांत दळवी यांना जवळ केल्याचं दिसत.

परब यांची ही चाल यशस्वी झाली असली तरी त्याने शिवसेनेचेच अनेक जण नाराजही झाले आहेत. अशा नाराजांची मोट बांधून योगेश कदम या निवडणुकीत आपले वजन दाखवतायत. आता ही लढाई दळवी विरुद्ध कदम, अशी प्रतिष्ठेची होणार असली तरी मुळात ही लढाई परब विरुद्ध कदम, अशीच आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.