नागोजी मानेच्या बायकोमुळेच संताजींना दगाफटका झाला होता.

माने म्हटले की म्हसवड डोळ्यांसमोर येते. आणि ओघानं नागोजी माने सुद्धा. आणि नागोजी मानेंना इतिहास लक्षात ठेवतो ते संताजी घोरपडेंचा दग्याने घात करण्यासाठी. आज ही बऱ्याच लोकांना त्यांचा इतिहास माहीतच नाही.

तर माने घराण्याची कारकीर्द सुरू होते ती रतोजी मानेंपासून. रतोजी माने हे आदिलशहाचे बडे सरदार होते. आदिलशहाकडून रतोजींना दहा गावच वतन मिळालं होत. यात कण्हेर, दहिगाव, अकलूज, भाळवणी, कासेगाव, ब्रम्हापूरी, सांगोला, आटपाडी, नाझरे, वेळापूर ही सातारा सांगली पट्ट्यातील गाव होती. मिर्झा जयसिंगाने जेव्हा विजापूरची स्वारी केली तेव्हा रतोजी मानेंनी दरबाराची सेवा केली होती. याच कारणामुळे १६६६ साली ही गावं रतोजीस आदिलशहाने दिली होती.

रतोजींचा पराक्रम जगजाहीर तर होताच पण त्यांचा पुत्र नागोजी ही पराक्रमी होता.

साबाजी निंबाळकर हे शिवरायांचे सावञ मेहूणे दहिगावात स्थायिक झाले होते. साबाजी हे मोगलांचे वतनदार होते. त्यांनी शहाजीराजे यांची साथ सोडून मोगलशाही पत्कारली होती. साबाजी यांना रंभाजी व तुकाराम असे दोन पुञ होते.

यातील तुकाराम नाईक निंबाळकर यांचे पुञ अमृतराव निंबाळकर, जानोजी, पिराजी व राधाबाई असे कुटूंब. यातल्या धाकट्या राधाबाईंचं लग्न नागोजी बरोबर झालं. अमृतराव हे नागोजीचे मेहूणे झाले. पुढं नागोजी हे ही आदिलशाहीत वडीलोपार्जीत वतनावर दरबारी चाकरी करायला लागले. पुढं जेव्हा आदिलशाही संपुष्टात आली तेव्हा नागोजी यांनी आपला इमान बदलून मोगलांकडे चाकरी करायला सुरुवात केली.

त्यावेळी मराठा साम्राज्यात शिवछञपतींनंतर संभाजी महाराज यांचा अतिशय क्रुरपणे झालेल्या मृत्यूने मराठा सरदार खवळले होते. संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज गादिवर आले. आणि मोगलांपासून बचावार्थ जिंजीस गेले. पण जिंजीस ही वेढा पडला होता. त्या वेढ्यातून काही मराठा सरदार स्वराज्यात आले त्यात नागोजी होते.

१६९३ मध्ये संताजी आणि धनाजी हे दोघेही जिंजीच्या रक्षणार्थ दक्षिणेत उतरले होते. तेव्हा झुल्फीकारखान जिंजीच्या वेढ्यात होता आणि संताजी व धनाजी आल्यावर कचाट्यात सापडला होता. त्याने राजाराम महाराजांकडे तहाची बोलणी लावली. यावेळी संताजींचं मत मोंगलांना जाऊ देऊ नये, कापून काढावं असं होतं. पण राजाराम महाराजांनी किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून मोंगलांना वेढा उठवून जायला सांगितलं. राजाराम महाराजांच्या या निर्णयामुळे संताजी त्यांच्यावर नाराज होते.

संताजी आणि धनाजी यांमध्येही भांडण सुरू झाली होती. संताजी हे शिस्तीचे कडक होते तर धनाजी हे वेळप्रसंगी पाहून माणसं आपल्या बाजूला घेण्याच्या दृष्टीचे होते. अनेक कनिष्ठ सरदार हे संताजींच्या शिस्तीला कंटाळून धनाजींची बाजू घेत यामुळे या भांडणात आणखी ठिणग्या पडल्या. यामध्येच संताजींनी अमृतराव निंबाळकर या धनाजींच्या बाजूने असलेल्या सरदाराला हत्तीच्या पायी दिले होते.

हा अमृतराव निंबाळकर राजाराम महाराजांच्या जावयाचा चुलत भाऊ होता. आणि याची सखी बहीण नागोजी मानेची बायको होती.

१६९५ मध्ये मोगली फौजांनी संताजी आणि धनाजी यांच्या फौजांचा स्वतंत्ररित्या पराभव केला होता. यानंतर संताजी आणि धनाजीची या दोघांनीही राजाराम महाराजांच्या समोर एकमेकांविषयीचे चुकांचे पाढे वाचले. राजाराम महाराजांनी संताजींना सेनापती पदावरून दूर केले होते.

यानंतर संताजींनी उघडपणे बंड पुकारले असले तरी त्यांना राजाराम महाराजांशी थेट लढण्याची ताकद नसावी असं दिसतं. जे सरदार पूर्वी मोगलांकडून स्वराज्यात आले होते ते संताजींना सेनापती पदावरून काढल्यामुळे पुन्हा मोगलाईत गेले. या सरदारांमध्ये नागोजी माने होते.

हे तेच नागोजी ज्यांची बायको म्हणजे संताजींनी ज्याला हत्तीच्या पायी दिलं त्या अमृतराव निंबाळकरांची सख्खी बहीण. मार्च १६९७ च्या सुमारास धनाजी जाधवांची मोठी फौज संताजींच्या मागे धावू लागली. अखेर संताजी कर्नाटकातून महाराष्ट्रात आले. आणि याचदरम्यान म्हसवडच्या आसपास संताजींचा मुक्काम असताना नागोजी माने याने संताजींना दग्याने मारले.

अस म्हणतात की, अमृतरावांच्या मृत्यूचा नागोजीच्या पत्नी राधाबाईने सुड उगवण्यासाठी पतीचे (नागोजीचे) कान फुकले असावे.

नागोजीने संताजींचं मस्तक कापून ते ब्रह्मपुरीला नेऊन बादशहाला भेट केलं. पूर्वी आपण बादशहाला सोडून गेलो आणि आता पुन्हा रुजू झालो याची खात्री पटवण्यासाठी नागोजीने या गोष्टीचा फायदा घेतल्याचं दिसतं.

नागोजीच्या पराक्रमाबरोबर त्याची गद्दारी ही मनाला खिळवून जाते.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. समाधान खोचरे says

    अकलुजचे मोहिते पाटिल घराणे हे म्हसवड कर माने घराण्या शी संबंधित आहेत. वेळापुरचे माने पाटील हे मोहिते पाटिल घराण्याचे मूळ घराणे होय.

Leave A Reply

Your email address will not be published.