आरेसाठी प्रयत्न केले तसे नाशिकमधील २ लाख झाड वाचवण्यासाठी प्रयत्न करणार का?

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील आरेचं जंगल वाचवण्यासाठी किती प्रयत्न केले हे सर्वश्रुत आहे. यात मग सेव्ह आरे मोहिमेपासून ते मेट्रो कारशेडची जागा बदलून ती कांजूरमार्गला हलवण्यासाठीच्या निर्णयांचा समावेश दिसून आला. त्यातुनच एकूणच आदित्य ठाकरे आणि ठाकरे सरकारचं पर्यावरणप्रेम दिसून आलं होतं.

मात्र आता त्यांच्याच सरकारचं नाशिकमधील २ लाख वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होतं असल्याचं दिसून येत आहे. कारण ठाकरे सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पुढाकारातून नाशिक मधील चुंचाळेतील इथं एक नवशहर वसवण्यात येणार आहे. याच शहरासाठी आता २ लाख झाडांची कत्तल करण्यात येणार आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

नाशिक पंचवटी पांजरपोळ ट्रस्टच्या १२०० ते १३०० एकर जागेत सिडकोकडून जगातील सर्वात अत्याधुनिक नवशहराची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सिडकोचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना जागा उपलब्ध करून देण्याच्या सुचना दिल्या होत्या.

त्यानुसार, पंचवटी पाजरपोळची जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

आता त्या जागेवरचं सिडकोचे नवशहर वसवण्याच नियोजन आहे. यात समाजातील सर्वच घटकांसाठी घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. सोबतच विकसित भूखंड योजना, आयटी पार्क, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ‘रामायण’वर आधारित ‘थीमपार्क’, शाळा, दवाखाने, उद्याने, क्रीडांगण या सगळ्या गोष्टींची नियोजनपुर्वक उभारणी करण्यात येणार आहे.

सिडकोने यापुर्वी नवी मुंबई, नवीन औरंगाबाद, नाशिकमधील सिडको, नवीन नांदेड, वाळूज महानगर या प्लॅन्ड शहरांची निर्मिती केलेली आहे. सद्यःस्थितीत नाशिकच्या वाढत्या शहरीकरणाला लक्षात घेवून पुढच्या २५ वर्षांसाठी नवशहराचं नियोजन केलं जाणार आहे.

मात्र जागा देण्यासाठी स्थानिकांचा विरोध…

सरकारचं जरी नवशहर निर्मीतीच नियोजन असलं तरी हा १ हजार एकरातील २ लाखांहून अधिक झाडे, वन्यप्राणी आणि जैवविविधतेने बहरलेला हा परिसर नाशिककरांचा ‘ऑक्सिजन प्लँट’ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आता हि झाड तोडण्यासाठी तर विरोध होतं आहेचं, शिवाय इथल्या वन्यप्राण्याचं काय करणार असा देखील प्रश्न विचारला जात आहे.

सोबतचं ही जागा देण्यासाठी श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ ट्रस्टने विरोध दर्शवला आहे. या जमिनी खासगी मालकांकडून खरेदी केल्याचा दावा संस्थेने केला आहे. त्यामुळे सिडकोच्या नवशहर निर्मिती प्रकल्पाला ट्रस्टने जमिन देण्यास विरोध केला आहे.

संस्थेकडे साधारण १ हजार ३०० गायी आहेत. त्यापैकी ३०० गायी दुध देतात. एक हजार गायी दुध देत नाहीत. शेतकऱ्यांना परवडत नसल्याने या गायी संस्था सांभाळत आहे. जर या जागेवर नवशहर उभ राहिले तर या गायी कुठे जातील असा सुद्धा प्रश्न उभा राहिला आहे?

मात्र एकीकडे आरे वाचवण्यासाठी धडपड केली जात असतानाच, दुर्मिळ झाडे वाचवण्यासाठी ५० वर्षांपेक्षा जास्त जुन्या वृक्षांना राज्यातील शहरी भागात वारसाचा दर्जा देण्यात येणार अशी घोषणा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. पण त्याचं वेळी दुसरीकडे समृद्ध जैवविविधता असणाऱ्या जंगलावर कुऱ्हाड चालवण्यात येणार असल्याने पर्यावरण प्रेमी याला कडाडून विरोध करत आहे.

यातुनच सेव्ह पांजरपोळ मोहीम उभी राहिली…

आता निसर्गप्रेमींनी सिडकोच्या या प्रकल्पाबाबत आक्षेप नोंदवण्यास सुरुवात केली आहे. हे जंगल वाचवण्यासाठी ‘सेव्ह पांजरपोळ’ मोहिमेला ऑनलाइन पिटीशनच्या माध्यमातून बळ देण्यास नाशिकरांनी सुरुवात केली आहे. चेंज ओराजी या वेबसाइटवरील http://chng.it/hc7h6Nv6Qr या लिंकवर आतापर्यंत दोन हजार पेक्षा जास्त जणांनी सिडकोच्या या प्रयत्नावर आक्षेप नोंदवला आहे.

हि वृक्षसंपदा वाचवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा असेही आवाहनही सोशल मीडियावर केले जात आहे. सोबतचं पर्यावरण मंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

नाशिक शहारातील पर्यावरण प्रेमी रोहन देशपांडे यांनी बोल भिडूशी बोलतांना सांगितले की,

राज्य सरकारने नवशहर तयार करण्यासाठी पांजरपोळ ही जागा का निवडली याचे उत्तर पहिल्यांदा द्यायला हवे. नवीन शहर वासवायचे असेल तर नाशिक शहरात अनेक जागा आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे. याचा विचार सरकारने करायला हवा. ज्या प्रमाणे आरे वाचवण्यासाठी जनआंदोलन झाले त्याच धर्तीवर नाशिक मध्ये जनआंदोलन उभे करण्यात येईल.

तर नाशिकमधीलच दुसरे पर्यावरणप्रेमी महेश सावंत यांनी ‘बोल भिडू’शी बोलताना आदित्य ठाकरे यांनीच हे जंगल वाचवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली आहे. ते म्हणतात, 

जेव्हा पर्यावरण वाचवण्याचा पर्याय असेल आणि विशेषतः असा शहरातला झाडांनी भरलेला परिसर जिथे बिबटे आणि इतर प्राणी मुक्तपणे संचार करतात, सरकारनं त्याचं रक्षण करायला हवे. असे पर्यावण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘आरे’ वाचविण्यासाठी पाठिंबा देताना म्हटले होते. हेच तत्व नाशिकलाही लागू होत असल्याने चुंचाळेतील जंगल वाचवण्यासाठी त्यांनीच प्रयत्न करावे.

हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हे जंगल नाशिकची इको सिस्टिम असून ती जपण्याची गरज आहे. वन्यजीव, झाडांचे असंख्य प्रकार येथे पहायला आहे. हे नष्ट झालं तर असमतोल निर्माण होईल. असे जंगल शहरात असल्याने अल्हाददायीपणाला ते हातभार लावत आहे, हे विसरून चालणार नाही. पांजरपोळचे जंगल वाचयलाच हवे असे मत पर्यावरण तज्ञ व्यक्त करत आहेत.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.