खुद्द नरसिंहरावांनी अंतुलेंना भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता..

बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. एक वादळी नेतृत्व. त्यांच्या निर्णयाचा झपाटा इतका विलक्षण असायचा की प्रशासनाला देखील त्यांच्या वेगाशी जुळवून घेईपर्यंत नाकी नऊ यायचं. अंतुलेंनी अनेक वर्षे खोळंबून पडलेल्या कोकणातल्या फायली एका झटक्यात पास केल्या.

रायगड जिल्ह्यात अनेक पूल उभारले, रस्ते बांधले, महामार्ग मोकळा केला. अडकून पडलेला विकास मार्गी लावला. प्रसंगी त्यांच्या कार्यशैलीला हुकूमशाही म्हटलं गेलं. टीकाकारांनी सुलतान अंतुले म्हणून त्यांच्यावर आरोप केले.

पण अंतुलेंनी याची पर्वा केली नाही. असं म्हणतात की मुख्यमंत्री असताना त्यांची गाडी इतकी सुसाट सुटली होती कि त्याचा ऍक्सीडेन्ट होणे साहजिक होते. तसंच घडलं. इंदिरा प्रतिष्ठानच्या सिमेंट घोटाळ्यात अंतुलेंच नाव आलं. त्यांच्या पक्षातल्याच विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. अंतुलेंना राजीनामा द्यावा लागला.

पुढे काही काळानंतर मुख्यमंत्री बनलेल्या वसंतदादा पाटलांनी अंतुलेंच्या विरोधातली मोहीम तीव्र केली. दोघांच्यातील वाद इतका पेटला की दादांनी रायगड मतदारसंघातून अंतुलेंच तिकीट कापलं. त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. याचाच परिणाम दोघांच्या वादात शेकापचे दि.बा.पाटील निवडून आले.

वसंतदादांच्या हट्टापायी अंतुलेंना काँग्रेस सोडावी लागली.

एखादी वीज कडाडावी तसा अंतुलेंचा तो दिड वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा काळ होता. त्यांनी केलेली कामे त्यांचा झपाटा पुढे अनेक वर्षे चर्चेत राहिला पण त्यांना सत्तेत म्हणावी तशी संधी मिळाली नाही. राज्यातील नेत्यांनी त्यांना पुन्हा महाराष्ट्रात परंतु दिल नाही. अंतुलेंनी दिल्ली हेच आपलं कार्यक्षेत्र ठरवलं.

 पुढे राजीव गांधींनी त्यांना पक्षात परत आणलं. १९८९ साली त्यांना रायगड मधून लोकसभेचं तिकीट देखील दिलं. अंतुलेंनी दि.बा.पाटलांचा पराभव केला आणि जोरदार पुनरागमन केलं. पण त्यांच्या दुर्दैवाने केंद्रातील राजीव गांधींची सत्ता गेली.

अंतुले १९९१ साली रायगड लोकसभेतून पुन्हा निवडून आले. यावेळी पंतप्रधान बनलेल्या पीव्ही नरसिंह राव यांच्याशी अंतुलेंचा घनिष्ट संबंध होते. दोघांच्यात चांगला संपर्क होता. नरसिंह राव यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या शेवटच्या वर्षात अंतुलेंना आरोग्य मंत्रिपद दिलं. या एका वर्षात देखील अंतुलेंनी प्लस पोलिओची मोहीम जोरदार राबवली.       

१९९६ साली रायगड मधून अंतुले पुन्हा निवडून आले. पण काँग्रेसची सत्ता गेली होती. पुढच्या वेळी मात्र अंतुलेंचा रायगडकरांनी पराभव केला. ९९ सालच्या निवडणुकीत अंतुले औरंगाबाद मधून उभे राहिले पण तिथेही पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

केंद्रात वाजपेयी यांचं एनडीए सरकार सत्तेत आलं होतं. राज्यात युती जाऊन काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सत्तेत अली तरी तिथे अंतुलेंना संधी दिली नाही. ते राजकारणातून कालबाह्य झाले अशी चर्चा सुरु झाली. महाराष्ट्र काँग्रेसमधल्याच त्यांच्या विरोधकांनी हि चर्चा सुरु केली होती.

अशातच एक दिवस अंतुलेंच्या भेटीसाठी राम जेठमलानी आले. सिमेंट घोटाळ्यात ज्यांनी आपल्याविरोधात कोर्टात वकिली केली ते राम जेठमलानी भेटण्यासाठी आलेत हे बघितल्यावर अंतुलेंना आश्चर्य वाटलं.  जेठमलानी कोकणच्या विकासासाठी भाजपमध्ये या असा पंतप्रधान वाजपेयींचा निरोप घेऊन आले होते. 

भाजपच्या मंत्रिमंडळात एकही दिग्गज मुस्लिम नेता नव्हता. आंतरराष्ट्रीय पातळीवर तसेच मुस्लीम जगतात भारताचा प्रभाव पाडण्याकरिता मुस्लीम नेत्याची गरज होती. वाजपेयी यांनी अंतुलेंना भाजपतर्फे मंत्री होण्याचं आवाहन केलं होतं.    

अंतुले बुचकळ्यात पडले. काँग्रेसमध्ये आपलं भवितव्य अंधकारात आहे हे त्यांना दिसत होतं. पण ज्यांनी आपल्यावर इतकी वर्षे टीकेची झोड उठवली होती, आपल्या मुस्लिम असण्यावरून लसख्य केलं होत अशा भाजप बरोबर जाणे योग्य होईल का याबद्दल त्यांना साशंकता होती.  अखेर त्यांनी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांची भेट घेऊन त्यांचा सल्ला घेतला.

नरसिंह राव यांनी चक्क त्यांना ही संधी दडवू नको, असे सांगितले होते. अंतुलेंनी मंत्रीपदी जाऊन राजकीयपदाचा लाभ उठवावा असं रावांचं म्हणणं होतं.

अंतुले आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगतात,

आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहिल्यावर शेवटच्या काळात पक्ष सोडणे आपल्याला पटले नाही व तो प्रस्ताव फेटाळला.

ते काँग्रेसमध्येच राहिले. सोनिया गांधींनी २००४ साली त्यांना पुन्हा रायगड मशून लोकसभेचे तिकीट दिल. अंतुले यावेळी मंत्र निवडून आले. मनमोहन सिंग सरकारमध्ये त्यांना अल्पसंख्यांक मंत्री करण्यात आलं. क्षमता असूनही तिथे कार्यास विशेष वाव मिळाला नाही. २००९ साली ते पराभूत झाले आणि त्यांच्या राजकीय घोडदौडीला कायमचा विराम लागला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.