नरसिंह रावांना उद्घाटनाला बोलावून विखे पाटलांना पश्चाताप झाला.

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. परदेशात शिकून आलेले तरुण राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनले होते. त्यांना टेक्नॉलॉजीची प्रचंड आवड होती. त्यांनीच प्रयत्न केल्यामुळे भारतात संगणकाचे युग सुरु झाले. टेलिकम्युनिकेशन क्रांती झाली.
भारताच्या प्रत्येक व्यक्तीला कॉम्प्युटर हाताळता यायला पाहिजे हे राजीव गांधींचे स्वप्न होते. याची सुरवात प्रशासनापासून त्यांनी केली होती. प्रत्येक कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याने इतकेच काय मंत्र्यांनी देखील संगणक शिकून घ्यावा असा त्यांचा आग्रह होता.
या वयात संगणक शिकावे लागत असल्यामुळे कित्येकजण नाराज असायचे. अनेकांनी फक्त औपचारिकता म्हणून या शिकवण्या लावल्या होत्या. फक्त एक माणूस होता जो वयाच्या साठीतही उत्साहाने कॉम्प्युटर शिकण्याच्या मागे लागला होता.
ते होते भारताचे तत्कालीन मानव संसाधन मंत्री पी.व्ही.नरसिंहराव
स्वातंत्र्यलढ्यापासून राजकारणात असलेले नरसिंहराव हे काँग्रेसचे बृहस्पती म्हणून ओळखले जायचे. त्यांचा परराष्ट्र धोरण, आर्थिक नियोजन, राज्यशास्त्राचा अभ्यास दांडगा होताच, पण ते तेलगू, हिंदी, कन्नड , मराठी इंग्रजी सोबतच फ्रेंच व इतर युरोपियन भाषांचे जाणकार होते. नाविन्याची त्यांना आवड होती.
येणारे नवे सहस्त्रक हे संगणकाचे असणार आहे आणि आपल्याला तरुणांच्या स्पर्धेत मागे राहायचे नाही हे रावांनी मनाशी पक्के ठरवले होते. त्यांनी म्हणूनच कॉम्प्युटर कसा असतो हे शिकून घेतलं आणि त्याचा वापर देखील सुरु केला.
अनेक वर्ष त्यांचे सचिव राहिलेल्या राम खांडेकर यांनी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.
१९८६ साली देशाचे शैक्षणिक धोरण ठरवायचे होते. पी.व्ही.नरसिंहराव यांनी मोठमोठे कुलगुरू शिक्षण तज्ज्ञ यांच्याशी बोलून एक आराखडा बनवण्यास सुरवात केली होती. अगदी खाजगी शिक्षणसंस्थेत लोकांची मते देखील ते विचारात घेत होते.
त्यावर्षीच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने एकदा त्यांनी दिल्लीतील पत्रकार व काही प्रतिष्ठित व्यक्तींना घरी जेवण्यास बोलवले. घरासमोरच्या लॉन वर हे जेवणाची पंगत सुरु होती. मात्र दर थोड्यावेळाने नरसिंहराव उठून आपल्या घरात जाऊन काही तरी पाहून येत होते. कोणी तरी त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले,
“नवीन एज्युकेशन पॉलिसी माझ्या कॉम्प्युटरवर आहे, ती प्रिंट करण्यासाठी लावली आहे. ते कुठवर आलय पाहतोय.”
त्याकाळचे प्रिंटर बरेच लहान होते. त्यामुळे या प्रिंटिंग साठी वेळ लागत होता. पत्रकारांना आश्चर्याचा धक्का बसला. मंत्रीमहोदय स्वतः आपल्या कम्प्युटर वर टाईप करून प्रिंट आउट घेतात हे दृश्य आजही दिसले तर कोणाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. विशेष म्हणजे नरसिंह राव यांच्याकडे त्याकाळी लॅपटॉप होता. त्यांचा संगणकाचा अभ्यास एखाद्या तज्ज्ञ व्यक्ती पेक्षाही जास्त होता.
असं म्हणतात की बहुभाषिक असणाऱ्या नरसिंहराव यांनी संगणकाच्या देखील तीन भाषा शिकून घेतल्या होत्या.
याचा अनुभव बाळासाहेब विखे पाटलांना चांगलाच आला.
विखे पाटील तेव्हा काँग्रेसचे मोठे नेते होते. त्यांनी सलग चारपाच वेळा खासदारकी जिंकली होती. त्यांचे राजकारणात चांगलेच वजन होते. प्रवरानगर इथे विठ्ठलराव विखेंच्या काळापासून सहकार रुजवला होता व या भागात विकासाची गंगा देखील पोहचवली होती.
फक्त सहकाराच्या क्षेत्रातच नाही तर शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठं कार्य केलं होतं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उंचच शिक्षणाच्या संधी मिळाव्या म्हणून त्यांनी प्रवरेत इंजिनियरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज सुरु केलं होतं.
अशातच महिला तंत्रनिकेतनच्या उदघाटनासाठी त्यांनी नरसिंह राव यांना बोलावले होते.
केंद्रीय मंत्री येत आहेत म्ह्टल्यावर जोरात कार्यक्रम आयोजित केला होता. इतर कार्यक्रमांसोबत प्रवरा नगरच्याच एका महाविद्यालयातील संगणक विभागाचेही उद्घाटन नरसिंह रावांनी केले. या समारंभानंतर त्यांना तिथले कॉम्प्युटर डिपार्टमेंट व व्यवस्थित मांडून ठेवलेली पुस्तके दाखवली गेली.
नरसिंह राव नुकतेच संगणक शिकले असल्यामुळे त्यांनी तिथल्या शिक्षकांना सहज काही प्रश्ने विचारली. हे शिक्षक देखील ग्रामीण भागातीलच होते. खुद्द मंत्री प्रश्न विचारत आहेत म्हटल्यावर त्यांना दडपण आलं. त्यामुळे काही प्रश्नांची नीट उत्तरे तेथील शिक्षक देऊ शकले नाहीत.
नरसिंह रावांनी टेबलावरची दोन-तीन पुस्तके उचलून त्यांना अभ्यास करण्यास सुचवले. त्यांचं हे बोलणं चाललं होतं तेव्हा अखेर विखे-पाटील त्यांना थांबवत गंमतीने म्हणाले,
‘‘आम्ही तुम्हाला उगीचच बोलावले!’’
हे ही वाच भिडू.