१ अब्जावरून २ अब्ज व्हायला १२३ वर्ष लागली, पण गेल्या ९५ वर्षात हीच लोकसंख्या ८ अब्जावर गेलीये…

२८ लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर जन्माला आलेली मानव प्रजाती आज एका ऐतिहासिक टप्यावर पोहोचली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार आज जगाची लोकसंख्या ८ अब्ज झालीय. आधुनिक माणसाच्या लोकसंख्येचा इतिहास पाहिला तर, इसवी सन पूर्व ५ हजार मध्ये पृथ्वीवर फक्त ५० लाखाच्या आसपास लोकसंख्या राहत होती.

परंतु ७ हजार वर्षात ही लोकसंख्या १ हजार ६०० पटीने वाढून ८ अब्जावर येऊन धडकली आहे. असं असलं तरी ही लोकसंख्या वाढ ७ हजार वर्षांपेक्षा अलीकडच्या दोन शतकातच जास्त वाढली आहे. 

१८०४ साली दुसऱ्या मराठा-ब्रिटिश युद्धाच्या वेळेस यशवंतराव होळकरांनी दिल्लीच्या किल्ल्याला वेढा दिला होता तेव्हा जगाची लोकसंख्या अब्जावर पोहोचली होती. काळाच्या ओघात बरेच उतार चढाव आले आणि १९२७ चं वर्ष उजाडलं.

भारतात माटेंग्यु जेम्सफोर्ड सुधारणांची तपासणी करण्यासाठी सायमन कमिशन नेमण्यात आलं होतं. या कमिशनला विरोध करण्यासाठी भारतीय सायमन गो बॅक चे नारे देत होते, तेव्हा हळूच जगाच्या लोकसंख्येने २ अब्जावर मुसंडी मारली होती.

हळूहळू भारत बदलला आणि जग सुद्धा बदललं. भारतावरचं राणीचं राज्य गेलं, काळाच्या ओघात राणी सुद्धा गेली आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात जगाची लोकसंख्या ८ अब्जावर येऊन पोहोचली. 

हे झालं जगाच्या लोकसंख्येच, पण या काळात भारताच्या लोकसंख्येत काय बदल झाले हे समजून घेणं  महत्वाचं आहे.

१९४७ मध्ये जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताची लोकसंख्या अवघी ३४ कोटी इतकी होती. त्या काळाच्या तुलनेत ही लोकसंख्या जास्त असल्यामुळे १९५२ मध्ये भारताने लोकसंख्या नियंत्रण धोरण राबवायला सुरुवात केली. या धोरणाने भारताच्या लोकसंख्येची घोडदौड जरा मंदावेल असा तज्ज्ञांचा अंदाज होता.

त्यानुसार १९५० पासून आजपर्यंत भारताचा जन्मदर कमी होत आला आहे. १९५१ मध्ये ५.९ टक्के असलेला जन्मदर २०२२ मध्ये २.१५ टक्क्यांवर आला आहे. यामुळे भारतात जन्माला येणाऱ्या लोकांची संख्या हळूहळू आटोक्यात यायला लागली, पण मुळात जास्त लोकसंख्या असल्यामुळे लोकसंख्येतील वाढ कायम आहे. 

१९७४ मध्ये जगाची लोकसंख्या २ अब्जावरून ४ अब्ज झाली होती. तेव्हा भारताची लोकसंख्या ६० कोटी ८८ लाख होती. तर २००० मध्ये भारताची लोकसंख्या १ अब्ज झाली. आज ४८ वर्षानंतर जगाची लोकसंख्या ८ अब्ज तर भारताची लोकसंख्या १ अब्ज ४१ कोटी इतकी आहे. एका वर्षानंतर २०२३ मध्ये भारत चीनला मागे टाकून जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्येचा देश होणार आहे.

पण जसा जन्मदर कमी होतोय त्यापेक्षा मृत्युदर आणखी वेगाने कमी होत आहे.

१९४७ मध्ये भारताचा मृत्युदर ४.७ होता तोच आता २०२२ मध्ये ०.९४ टक्क्यांवर आला आहे. लोकांचा मृत्यु कमी होत असल्यामुळे सरासरी आयुर्मान वाढलं आहे. १९४७ मध्ये एक भारतीय व्यक्ती सरासरी ३१ वर्ष जीवन जगत होता, पण गेल्या ७५ वर्षात त्यात वाढ झाली आहे. २०२२ च्या आकडेवारीनुसार एक भारतीय व्यक्ती सरासरी ७०.१९ वर्ष जीवन जगतो.

मेडिकल क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे हा बदल घडून आला आहे. प्लेग, पोलिओ, कावीळ, कॉलरा, डायरिया, मलेरिया या घातक आजारांवर जगासोबतच भारताने सुद्धा उपाययोजना केल्या. म्हणूनच भारताचं सरासरी आयुर्मान वाढलं आहे. १९५० मध्ये जगात सर्वाधिक आयुर्मान नॉर्वेमध्ये होतं , तिथले नागरिक सरासरी ७२.३ वर्ष जगात होते. आज ७५ वर्षानंतर भारताने त्या उद्दिष्ठापर्यंत मजल मारली आहे.

हे झालं आजवरच्या लोकसंख्या वाढीबद्दल परंतु ६० वर्षांनी जगाच्या लोकसंख्येत घसरण सुरु होईल.

आज युवक असलेली पिढी भविष्यात म्हातारी होईल. जन्मदर घटत असल्यामुळे एकदिवस ही लोकसंख्या वाढ स्थिर होईल आणि त्यानंतर लोकसंख्या घटायला लागेल. संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या अंदाजानुसार, २०८० पर्यंत जगाची लोकसंख्या १० अब्ज ४० कोटी इतकी होईल. ही जगाच्या इतिहासातील सगळ्यात मोठी मानवी लोकसंख्या असेल. त्यानंतर लोकसंख्या घटण्यास सुरुवात होईल असा अंदाज आहे.

या काळात भारताची लोकसंख्या सुद्धा वाढणार आहे, पण भारताची लोकसंख्या घट ही जगाच्या आधी सुरु होणार आहे. २०५९ मध्ये भारताची लोकसंख्या सगळ्यात जास्त उंचीवर पोहोचेल. लोकसंख्या ग्राफनुसार त्या वेळेस भारताची लोकसंख्या १ अब्ज ६५ कोटी १८ लाख इतकी असेल. त्यानंतर लोकसंख्येत घट व्हायला सुरुवात होईल.

२०४० पासून भारताची लोकसंख्या वाढ ही मंदावत जाईल

त्यानंतर २०५० पासून भारताच्या लोकसंख्या वाढीची पठारावस्था सुरु होईल. यातूनच २०६० च्या दशकानंतर भारताची लोकसंख्या घटत जाईल. २०८० मध्ये जगाची लोकसंख्या सगळ्यात जास्त असतांना भारताची लोकसंख्या १ अब्ज ५८ कोटींवर खाली आलेली असेल. तर २१०० मध्ये हीच लोकसंख्या १ अब्ज ४५ कोटींवर खाली येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आज भारतात सगळ्यात जास्त तरुण आहे. देशातले ६५ टक्के नागरिक हे ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तर निम्मे नागरिक २५ पेक्षा कमी वयाचे आहेत, पण येत्या काळात हीच पिढी म्हातारी होईल तेव्हा भारत हा जगातील सर्वाधिक म्हाताऱ्यांचा देश असणार आहे.

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.