बॉलिवूडच्या ‘संस्कारी माँ’ ला तिच्या गावाने वाळीत टाकलं होतं

अमिताभ संवादफेकीत एकदम फॉर्मात असतो. शशी कपूर शांतपणे बच्चनचा डायलॉग पूर्ण व्हायची वाट बघत असतात. ‘तुम्हारे पास क्या है?’ असं म्हणत अमिताभ शशी कपूर कडून येणाऱ्या उत्तराची वाट बघत असतो. ‘मेरे पास माॅं है!’ या एकाच डायलॉगने शशी कपूर अख्खा सिन खिशात टाकतात.

क्रिकेटमध्ये जसं मॅच हरतोय असं वाटत असताना धोनी मॅच विनिंग बाऊंड्री मारून सगळा गेम भारताच्या बाजूने झुकवतो. दीवार मधला अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या अभिनयाची जुगलबंदी सुद्धा अगदी तशीच काहीशी.

हा सीन ज्या आई भोवती रचला गेला आहे, ती म्हणजे निरुपा रॉय.

निरुपा रॉय यांना निरुपमा रॉय असं सुद्धा म्हटलं जातं. बॉलिवुडमध्ये आईची भूमिका साकारणाऱ्या
अभिनेत्री म्हणजे रीमा लागू, सुलोचना, राखी.. सिनेमात आई या संकल्पनेला ग्लॅमर कोणी मिळवून दिलं
असेल तर निरुपा रॉय यांनी. दीवार मध्ये अमिताभ आणि शशी कपूर हे अभिनयाचे दोन महामेरू
असताना त्यांच्यासमोर ताकदीने उभी राहिलेली ही अभिनेत्री.

बॉलिवुड गाजवणाऱ्या निरुपा रॉय यांना त्यांच्या गावाने मात्र सिनेमात अभिनय करते म्हणून बहिष्कृत केलं होतं.

निरुपा रॉय यांचा जन्म ४ जानेवारी १९३१ रोजी झाला. कुटुंब गुजराती होतं. कोकिला किशोरचंद्र बुलसारा
हे त्यांचं मूळ नाव. १९५० च्या आधीचा काळ होता. कोकिलाचं परंपरावादी घराणं होतं. त्यामुळे तिच्या
घरच्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी तिचं लग्न लावून दिलं. पती कमल रॉय सोबत कोकिला मुंबईत दाखल
झाली. मुंबईत काळबादेवी भागात चाळीतल्या एका छोट्याश्या खोलीत दोघांनी संसार मांडला.

लग्न झाल्यावर कोकीलाची निरुपा रॉय झाली.

कमल रॉय यांना सिनेमात काम करण्याची खूप हौस होती. ते कुठे ना कुठे ऑडिशनला जात असत. पती
सोबत निरुपा रॉय सुद्धा जायच्या. अडचण ही होती की, कमल रॉय उंचीने जरा ठेंगणे होते. त्यामुळे
त्यांची निवड व्हायची नाही. ही गोष्ट १९४६ सालची. कमल आणि निरुपा यांनी एका गुजराती पेपरमध्ये जाहिरात बघितली.

‘आगामी सिनेमासाठी कलाकार हवे आहेत,’ अशी ती जाहिरात होती.

कमल रॉय यांनी यावेळी पत्नीला ही जाहिरात गांभीर्याने घ्यायला सांगितली. गुजरात मधील छोटाश्या गावात वाढलेल्या निरुपा रॉय यांना सिनेमाविषयी अजिबात ज्ञान नव्हतं. कमल रॉय यांनी सूचना केल्या. नवऱ्याने केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे निरुपा रॉय यांना पहिला सिनेमा मिळाला. सिनेमाचं नाव ‘रनकदेवी’. विशेष गोष्ट म्हणजे, पत्नी सिनेमात अभिनय करणार हे कळल्यावर कमल रॉय यांना प्रचंड आनंद झाला.

कमल आणि निरुपा रॉय यांच्या सुखी आयुष्यात एक मोठा ट्विस्ट आला.

निरुपा सिनेमात अभिनय करतेय ही खबर त्यांच्या गावी पोहोचली. निरुपा रॉय ज्या समाजाच्या होत्या त्यांनी पंचायत भरवली. पतीसोबत निरुपा गावी गेल्या. त्यांचे आई – वडील सुद्धा पंचायतीला हजर होते.

“सिनेमात काम करणं म्हणजे आपल्या समाजाला कलंक लावण्यासारखं आहे. त्यामुळे तू सिनेमात काम केलंस तर आम्ही तुमच्या कुटुंबाला बहिष्कृत करू”,

असं पंचायती कडून सांगण्यात आलं. निरुपा रॉय यांचे वडील सुद्धा सर्वांसमोर मुलीला कडक शब्दात म्हणाले,

एकतर सिनेमा तरी सोड नाहीतर आमच्याशी संबंध तरी सोड.

निरुपा रॉय यांचं वय त्यावेळी १८ – १९ वर्ष असावं. या वयात त्यांना नक्की कोणता निर्णय घ्यावा कळत
नव्हतं. शेवटी निरुपा रॉय यांनी ठामपणे त्यांचा निर्णय सर्वांना सांगितला.

“माझ्या पतीने मला हा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे यापुढे मी त्यांच्या इच्छेनुसार वागेन.”

असं त्या म्हणाल्या. कमल रॉय यांचा पत्नीला उघड पाठिंबा आहे हे सर्वांना ठाऊक होतं. मुलीचा निर्णय ऐकून वडील तिथून उठले. खाली मान घालून ते घराकडे निघाले. ही बाप – लेकीची शेवटची भेट होती. सिनेमात काम करण्यासाठी निरुपा रॉय यांना इतकी मोठी किंमत चुकवावी लागली होती.

हे सर्व झाल्यानंतर पतीसोबत निरुपा रॉय पुन्हा मुंबईत आल्या. परंतु समाजाची माणसं मुंबईतील घरावर
दगडफेक करायचे. घाणेरड्या शिव्या द्यायचे. अशावेळी कमल रॉय कुठे बाहेर जायचं असल्यास, निरुपाला घरी एकटं सोडून तिच्या सुरक्षिततेसाठी बाहेरून कडी लावायचे.

कमल रॉय येईपर्यंत त्या एकट्याच घरी असायच्या. त्यांचा जीव कासावीस व्हायचा. पण त्याला काही इलाज नव्हता.

हळूहळू निरुपा रॉय सिनेमात मशहूर झाल्या. एक अभिनेत्री म्हणून त्यांना भरपूर लोकप्रियता मिळाली. जो समाज त्यांना वाळीत टाकायला निघाला होता, पुढे त्याच समाजाने तोंड भरून निरुपा रॉय यांचं कौतुक केलं.

निरुपा रॉय यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांचे पती कमल रॉय यांची भक्कम साथ होती. तो काळ कर्मठ
विचारांचा असला तरीही कमल रॉय पत्नीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. म्हणूनच निरुपा रॉय यांना
मुक्तपणे सिनेमात काम करता आले.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.