अटकपूर्व जामीनाचा मार्ग नितेश राणे यांच्यासाठी बंद झाला. काय काय घडलंय या प्रकरणात ?

संतोष परब मारहाण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यासोबतच १० दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर राहण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे येत्या १० दिवसांत नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर हजर रहावं लागेल. त्यामुळे अटकपूर्व जामीनाचा मार्ग नितेश राणे यांच्यासाठी बंद झालाय.

नेमकं प्रकरण आहे तरी काय ?

तर सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. पुढं त्याने चौकशीदरम्यान नितेश राणे यांचं नाव घेतलं. दरम्यान संतोष परब शिवसैनिक असल्याने शिवसेना आक्रमक झाली.

यात संतोष परब यांनी राणेंवर आरोप करताना घटनाक्रम सांगितला. ते सांगतात की,

बाईकवर असताना मला जोरात एका गाडीने धडक दिली. ती धडक इतकी जोरात होती की त्यामुळे मी रस्त्याच्या बाजूने फरफटत गेलो. माझ्या हाताला जखम झाली. फरफटत जाऊन मी एका बाजूला पडलो होतो आणि माझी बाईक माझ्या पायावर होती. ती एक सिल्व्हर रंगाची इनोव्हा होती. पुढे जाऊन २०-२५ फुटांवर जाऊन थांबली. त्यातील एक व्यक्ती माझ्याजवळ आला आणि जाताना गोट्या सावंत, नितेश राणे यांना कळवलं पाहिजे असं म्हणत खिशातून मोबाईल काढला.

परबांच्या या आरोपींवर या प्रकरणात नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून चौकशीदेखील करण्यात आली. यावर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी प्रेस घेत राणेंवर आरोप केले की,

मतदारांवर दबाव आणण्यासाठी १८ तारखेला महाविकास आघाडीच्या प्रचारप्रमुखावर हल्ला झाला. त्या हल्ल्यात फिर्यादीने नितेश राणेंचं नाव घेतलं होतं. पोलीस तपासात नितेश राणे दोषी आढळल्याचं प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे. दोषी असतील तर त्यांना अटक होईल. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे आपल्या मंत्रीपदाचा फायदा घेत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

या प्रकरणात विधिमंडळाच अधिवेशन सुद्धा चांगलंच तापलं होत.

शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी बाजू मांडली. ते म्हंटले की, या प्रकरणात सहा आरोपी सापडले आणि बाकीचे आरोपी सापडलेले नाहीत. या सभागृहाचे सदस्य त्या विभागाचे आमदार वैभव नाईक आज कणकवली पोलीस ठाण्यात निवेदन घेऊन गेले आहेत की, या सगळ्या परिस्थितीत सहा आरोपी सापडले उर्वरीत आरोपी का सापडले नाहीत? प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली.

प्रभूंच्या या मागणीवर गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी देखील सरकारची भूमिका स्पष्ट करत, ‘ज्याचा या प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असेल त्याला सोडलं जाणार नाही’ असं स्पष्ट केलं होत.

यावर नितेश राणेंनी सुद्धा आपली बाजू मंडळी होती. ते म्हंटले होते, 

कणकवलीबद्दल बोलायचं गेल्यास मी पोलिसांकडे जबाब दिला असून सहकार्य केलं आहे. या केसशी माझा दूरपर्यंत काही संबंध नाही. फक्त शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे या सगळ्या गोष्टी सुरु आहेत. एका बाजूला अनिल परब आणि रामदास कदम आणि आमच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत आणि विनायक राऊत यांच्यातील जो संघर्ष आहे त्यातून झालेला हा वाद आहे. यात कोणीतरी हवं आहे म्हणून माझ्यावर टाकलं आहे. पोलिसांनी जी माहिती हवी होती ती मी वकिलामार्फत दिली आहे. 

या प्रकरणात आमदार नितेश राणे यांनी अटकेपासून संरक्षण मिळावं म्हणून अटक पूर्व जामीनासाठी सिंधुदुर्गातील न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अखेर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 

या अर्जावर आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास १० दिवसांची मुभा दिली आणि तोपर्यंत नितेश राणे यांना अटक करता येणार नाहीये. त्यामुळे अटकपूर्व जामीनाचा मार्ग नितेश राणे यांच्यासाठी बंद झालाय.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.