भारद्वाजने पदार्पणातच हवा केली पण त्याच्या क्रिकेट करियरला एक ग्रहण लागलं

क्रिकेटला स्थापन व्हायला बराच काळ लागला असेल पण काही खेळाडू असे होते ज्यांनी पहिल्याच मॅचला आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय, बॅटिंग-बॉलिंग पण टॉप, एकदम कडक….हा डायलॉग परफेक्ट फिट बसतो तो विजय भारद्वाज या भारतीय क्रिकेटपटूला. पहिल्याच सीरिजला हवा केल्यानंतर विजय भारद्वाज मात्र पुढे अचानक गायब झाला.

विजय भारद्वाजला क्रिकेट रुचलं पण भविष्यात ते टिकवता आलं नाही. अगोदर विजय भारद्वाजच्या सुरवातीच्या काळातील क्रिकेटबद्दल जाणून घेऊया आणि मग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धडाकेबाज पदार्पण आणि पुढे त्याच्या क्रिकेट करियरचा झालेला दुःखद अंत असा त्याचा प्रवास बघूया. 

कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये १५ ऑगस्ट १९७५ साली विजय भारद्वाजचा जन्म झाला. लहानपणापासूनच विजय भारद्वाजला क्रिकेटचा विशेष नाद होता. क्रिकेटबद्दलचं प्रेम त्याला भारतीय क्रिकेटमध्ये घेऊन गेलं. रणजी क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढून आपल्या आगमनाची झलक त्याने निवड समितीला दाखवून दिली होती.

१९९४ साली रणजी स्पर्धेत कर्नाटकाकडून खेळताना त्याने आपल्या क्रिकेटचा क्लास दाखवून दिला. बोलींगमध्ये कधीही गोलंदाजी दिल्यावर तो विकेट मिळवून द्यायचा. बॅटिंगच्या वेळी ऐन मोक्याच्या क्षणी तो उत्तम फटकेबाजी करून धावा जमवायचा. कर्णधाराच्या विश्वासाचा हुकुमी एक्का म्हणून तो प्रसिद्ध होता.

आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये ५५३३ धावा आणि ५९ विकेट मिळवून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दरवाजा त्याने आपल्या खेळीने वाजवला होता. १९९८-९९च्या स्थानिक क्रिकेटच्या एका सिझनमध्ये १४६३ धावा आणि २१ विकेट मिळवून सगळीकडे आपली हवा विजय भारद्वाजने निर्माण केली होती. या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर त्याची भारतीय संघात निवड झाली.

१९९९च्या वर्ल्डकपवेळी भारत सुरवातीलाच बाहेर फेकला गेला. त्यानंतर एलजी कप खेळवला गेला. ज्यात एकूण चार संघानी सहभाग घेतला होता त्यात भारत, साऊथ आफ्रिका, केनिया आणि झिम्बाब्वे हे संघ होते. सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन या संघात नव्हते आणि कर्णधार म्हणून अजय जडेजाची निवड करण्यात आली होती.

याच सिरीजमध्ये विजय भारद्वाजने आपलं क्रिकेट कौशल्य दाखवलं होतं. साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विजयला इंडियन कॅप मिळाली. पहिल्या सामन्यात विजयने बॉलींगमध्ये १० ओव्हरमध्ये १६ धावा देऊन १ विकेट मिळवली. बॅटिंगमध्ये नाबाद १८ धावा करून भारताला विजय मिळवून दिला. त्यांचा हा खेळ पुढच्या तीन लीग सामन्यांमध्ये सुरूच राहिला.

केनिया विरुद्धच्या सामन्यात ४१ धावा आणि ३ विकेट घेऊन विजय भारद्वाजने आपली दावेदारी सिद्ध केली. शेवटच्या क्षणी चांगली फटकेबाजी करून तीन लीग मॅच जिंकवून देऊन भारताला एलजी कपच्या फायनलमध्ये नेलं. फायनलमध्ये भलेही भारत हारला पण विजय भारद्वाजने २४ धावा आणि तीन विकेट मिळवल्या होत्या.

या सिरीजमध्ये १० विकेट आणि ८९ धावांच्या जोरावर पदार्पणातच विजय भारद्वाजला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला.

एका नवीन क्रिकेटरसाठी यापेक्षा मोठी गोष्ट दुसरी असूच शकत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी या सीरिजच्या माध्यमातून आपला क्रिकेट क्लास दाखवून दिला होता. या हिऱ्याची चमक प्रखर होती आणि जगालाही ती दिसली होती.

पण या सीरिजनंतर विजय भारद्वाजच्या करियरला ग्रहण लागलं. २००० साली स्लिप डिस्कचा त्रास हा त्यांच्या क्रिकेट करिअरचा शाप म्हणून पुढे आला. या आजारामुळे विजय भारद्वाजला भारतीय संघातील जागा गमवावी लागली. पुढे चष्मा हटवण्यासाठी त्यांनी ऑपरेशनही केलं पण दृष्टी कमी झाल्याने त्याचा क्रिकेटवर परिणाम झाला.

स्थानिक क्रिकेट खेळत त्याने आपली क्षमता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला पण २००२ साली झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यानंतर त्यांना क्रिकेट कायमचं सोडावं लागलं. भारतीय संघात पुनरागमन न होऊ शकल्याने विजय भारद्वाजने २००६ साली क्रिकेटला राम राम ठोकला. पुढे स्थानिक खेळाडूंना कोचिंग तो करत राहिला.

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाच्या सहायक प्रशिक्षकपदी विजय भारद्वाज होता. क्रिकेट कॉमेंट्री सुद्धा त्याने बऱ्याच सामन्यांसाठी केली. ३ टेस्ट आणि १० वनडे मॅचेस इतक्यावरच विजयचं क्रिकेट संपलं. 

पहिल्याच सिरीजमध्ये मन ऑफ द सिरीजचा किताब मिळवणारा विजय भारद्वाज पुढे विशेष चमक दाखवू शकला नाही. वन सिरीज वंडरचा फॉर्म त्याला पुढे टिकवता आला नाही इतकंच त्याचं दुर्दैव होतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.