जगातल्या फक्त एकाच माणसाला गॅरंटी होती कि शक्ती कपूर स्टार होणार.

शक्ती कपूरला कुठल्याही भूमिकेत पहा कधी खलनायकी  तर कधी विनोदी सगळ्या सीनचं मार्केट तो एकटा खाऊन जायचा. त्याने जवळपास सगळेच रोल केले आहेत आणि आपल्या अभिनयाचा दर्जा दाखवून दिला आहे.

पण सोशल मिडियावर त्याला बेवडा म्हणून जरी लोकं ट्रोल करत असले तरी तो दारू आणि अभिनय यांचा ताळमेळ ठेवूनच काम करतो. त्याच्या नावापासून ते त्याच्या चित्रपट क्षेत्रात येण्याचे बरेच किस्से आहेत. 

शक्ती कपूरचं मूळ नाव सुनील कपूर. त्याच्या वडिलांना सुनील दत्त प्रचंड आवडायचे त्यावरून त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव सुनील ठेवलं पण हे शक्ती कपूर पण डेंजर होतं पुढे चित्रपट क्षेत्रात हे नाव चालणार नाही म्हणून त्याने सुनील कपूर वरून शक्ती कपूर असं नाव पुढे रूढ केलं.

दिल्लीमध्ये वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय होता. साहजिकच वडिलांची इच्छा होती कि त्याने पुढे आपला व्यवसाय वाढवून तो मोठा करावा. शाळेमध्येच शक्ती कपूरचे कारनामे दिसून आले आणि त्याच्या वडिलांनी डोक्यावर हात मारला.

केवळ एका शाळेतूनच नव्हे तर तब्ब्ल तीन शाळेतून त्याला हाकलून देण्यात आलं होतं. शाळेतल्या कुठल्याही हाणामारीत त्याचा हात असायचा आणि दरवेळी नेमका तोच पकडला जायचा.

त्याच्या या वागणुकीवरून वडिलांनी त्याला आपल्या व्यवसायात मदत करायला सांगितलं पण शक्ती कपूरचं डोकं स्वतःची ट्रॅव्हल कंपनी काढायच्या विचारात होतं. वडिलांसोबत त्याचे भांडणं सुरु झाले पण दोघांनाही त्यावेळी माहिती नव्हतं कि शक्ती कपूर हा द शक्ती कपूर बनणार आहे म्हणून. पुढे महाविद्यालयीन शिक्षण त्याने दिल्लीच्या प्रतिष्ठित करोडीमल कॉलेजमधून पूर्ण केलं.

क्रिकेटचा नाद असल्याकारणाने आणि केवळ क्रिकेट उत्तम खेळतो म्हणून त्याला कॉलेजने ऍडमिशन दिलं होतं.

पण बोट लावील तिथं गुदगुल्या स्वभाव असलेल्या शक्ती कपूरने तिथंही खतरनाक कांड केलं. डायरेक्ट क्रिकेट टीमच्या कॅप्टनच्या गर्लफ्रेंडलाच त्याने पटवलं. यावरून मोठा राडा त्यावेळी झाला आणि तेव्हापासून शक्ती कपूरने क्रिकेट आणि मुलीचा नाद सोडला.

नंतर मित्रांच्या सल्ल्याने आणि आयुष्यात आतातरी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्याने मॉडेलिंग सुरु केली. थोडे फार पैसे मिळू लागले, ते चैनीत तो उडवू लागला.

करोल बागमध्ये विष्णू नावाच्या व्यक्तीची एक पानटपरी होती. त्याने तेव्हा शक्ती कपूरचा स्ट्रगल बघितला होता. त्याला का कुणास ठाऊक हा तरुण फार आवडायचा. शक्ती कपूरचा गप्पिष्ट स्वभाव, त्याच्या उचापत्या तो नेहमी बघायचा. एकदा विष्णूने शक्तीला सांगितलं कि

तू खरंच ऍक्टर बन. तुझ्यात सगळे नाटकी हावभाव आहेत. भविष्यात तू भारी सुपरस्टार बनशील.

फक्त बोलून गप्प बसला नाही तर त्यावेळी त्याने शक्ती कपूरकडे असलेलं मॉडेलिंगचं एक पोस्टर स्वतःच्या टपरीवर मोठ्या झोकात छापलं. बाकीची मित्रमंडळी तो फोटो बघून खुदुखुदू हसायची. शक्ती कपूरने देखील  त्यावेळी त्या पानटपरीवाल्याचं म्हणणं सिरियसली घेतलं नाही.

रोज संध्याकाळी तो आणि त्याचे टपोरी मित्र त्या पानटपरी वाल्याकडे उनाडक्या करायला जायचे. तो पानटपरीवाला माणूस शक्तीकडून सिगरेटचे कधी पैसे घ्यायचा नाही. तो त्याला रोज तो फोटो दाखवायचा आणि म्हणायचा,

“भाई तू स्टार है. कहा इन लोगोंके साथ सड रहा है. बॉम्बे जा, उधर तेरी किस्मत चमकेगी.”

पुढे त्याने शक्तीला एवढं फुगवला की शक्तीने आणि त्याच्या मित्रांनी फिल्म अँड टेलीव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे मध्ये फॉर्म भरला. पुढे मित्रांनाही निवड झाली नाही , नशीब जोरावर असल्याने शक्ती कपूरची निवड झाली.

एफटीआयआय मधून पास आउट झाल्यावर शक्तीला मुंबईत छोटे मोठे मॉडेलिंग असाइनमेंट मिळू लागले, तो जाहिराती मध्ये झळकू लागला.

जस जसा काळ बदलत राहिला तस तसा शक्ती कपूरही छोटे मोठे रोल करू लागला. स्ट्रगल त्याचा सुरूच होता. चांगला नट असूनही त्याला चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका मिळत नव्हती. छोट्या छोट्या भूमिकेसाठीही त्याला ऑडिशन द्यावी लागायची.

पण शक्ती कपूर जशा भूमिका मिळत गेल्या तसा तो या क्षेत्रात स्थिरावत गेला. पुढे त्याचा निगेटिव्ह रोल मध्ये जम बसला. त्याच्या कॉमेडी भूमिकादेखील चांगल्याच गाजल्या, लोकांकडून भरपूर प्रेम आणि समीक्षकांकडून कौतुक झालं.

नंतर एके दिवशी स्टार झालेल्या शक्ती कपूरने त्या पानटपरीवाल्या विष्णूला भेट दिली. आता त्याची पानटपरी उरली नव्हती, त्याने आपलं दुकान सुरु केलं होतं. तिथं गेल्यावर शक्तीच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं, कारण या नवीन दुकानातही त्याने शक्तीचा फोटो लावला होता.

पानपट्टी वाला विष्णू हा जगात एकटाच माणूस होता कि ज्याला शक्ती कपूर हा स्टार होणारआहे असं वाटत होतं, आणि ते खरं देखील ठरलं. 

शक्ती कपूरने त्याचे आभार मानले , त्याच शक्ती कपूर स्टाईलने आदरातिथ्य केलं वगैरे. त्यावेळी रियल मध्ये खलनायक बनण्याकडे वाटचाल करणारा शक्ती कपूर रीलमधला खलनायक झाला आणि प्रचंड गाजला.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.