प्रिन्स चार्ल्सच्या किसमुळे पद्मिनी कोल्हापुरेंची लोकप्रियता सातासमुद्रा पलीकडे गेली

सिनेतिहासाची पाने चाळता चाळता काही मनोरंजक घटनांची आठवण होवून आजही गंमत वाटते. आणि हि घटना जर सेन्सेशनल असेल तर त्याचे आणखी काही पदर तपासावे लागतात. १९८० साल होते. त्या वेळी इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स भारताच्या दौर्‍यावर होते.

या शाही पाहुण्यांनी देशात अनेक ठिकाणी भेट दिली. अलम दुनियेला या विलायती राजपुत्राचा अभिमान होता. त्यांचा ऑरा काही औरच होता. झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था तैनात  होती. जगभराचा मिडिया त्यांच्या सोबत होता. प्रिन्स चार्ल्स यांना भारतीय सिनेमाचे मोठे कुतूहल होते. त्यांना सिनेमाच्या क्षेत्रातील काही व्यक्तीना भेटायचे होते.

ती जबाबदारी चित्रपती व्ही शांताराम यांनी घेतली.   

मुंबईच्या राजकमल स्टुडिओत इस्माईल श्रॉफ यांच्या ‘आहिस्ता आहिस्ता’ या चित्रपटाचे शूट चालू होते. इथे शाही पाहुण्यांना निमंत्रित केले. प्रिन्सचे स्वागत स्वत: शांताराम बापूंनी केले. सर्वत्र हर्षाचे, उत्साहाचे वातावरण होते.

अभिनेत्री शशिकला यांनी भारतीय परंपरेनुसार प्रिन्सच्या भाळी कुंकुम तिलक लावून स्वागत केले. त्याच सेटवर पद्मिनी कोल्हापुरे देखील होती. प्रिन्सने तिच्या दिशेने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. जगातील सर्व तरुणीचा क्रश, सर्वात रिस्पेक्टेबल देखणा तरूण राजपुत्र आपल्या पुढे हात करतोय या भावनेने सोळा वर्षाची पद्मिनी हरखून गेली. क्षणभर तिचा विश्वासच बसेना, गोंधळली. 

पद्मिनी पुढे झाली त्याचा हात हाती घेतला आणि त्याच्या गालावर चक्क ‘किस’ केले! या घटना इतक्या वेगात आणि अनपेक्षित होत्या की सारेच जण अवाक झाले!

या वेळी  देशातील आणि परदेशातील मिडीया तिथे उपस्थित होता. छायाचित्रकारांनी हा क्षण त्यांच्या कॅमेर्‍यात कैद केला. बेचाळीस वर्षापूर्वीची हि मोठी ब्रेकींग न्यूज होती. दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रांनी हि बातमी खमंग मथळ्यासहीत छापली.

यावर उलट सुलट प्रतिक्रिया येवू लागल्या. आजच्या काळाशी तुलना करता तो काळ त्या अर्थाने खूपच ‘सोवळा’ होता. वुमन लिबर्टी मूव्हमेंटची नुकतीच कुठे सुरूवात झालेली होती. भारतीय संस्कृतीचा अवमान झाला म्हणून कुणी तरी पद्मिनीवर खटला दाखल करण्याची तयारी दाखविली होती म्हणे! 

काही जणांना तो तिचा पब्लिसिटी स्टंट वाटला, तर काहींना हा सगळाच फॅब्रीकेटेड आयटम वाटला. यातलं तसं काहीच खरं नव्हतं. पद्मिनीची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती हे मात्र कुणालाच डायजेस्ट होत नव्हतं. पण हि ‘किस’ स्टोरी मात्र कायम तिच्यासोबत चिकटली गेली. 

तिची लोकप्रियता साता समुद्रा पलीकडे पसरली. इतकी की, ती लंडनला गेल्यावर तिथल्या विमानतळावरच्या इमिग्रिशन अधिकार्‍याने तिचा पासपोर्ट बघून ’प्रिन्सला ’ किस ’ करणारी तूच का?’ असा सवाल केला! 

इकडे बॉलीवूड मध्ये १९८२ साली ती नवकेतनच्या ’स्वामीदादा’ या सिनेमात काम करीत होती. यात तिच्यावर चित्रीत ’पटाखा फुलझडी ना’ या गाण्यात गीतकार अंजान यांनी कडव्यात एक ओळ टाकली होती ’तू जो कोई प्रिन्स नही जो तुझे मै चूम लू’.

  • धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.