पंकजा मुंडे यांचं नाव देखील भाजपच्या निवडणूक चिन्हावरून ठेवण्यात आलं होतं

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाराष्ट्रातून जी तीन नावे मंत्रिपदासाठी गेली त्यात मुंडे समर्थक भागवत कराड यांचं नाव होतं. प्रीतम मुंडे यांचा या यादीत समावेश नसल्यामुळे  पंकजा मुंडे नाराज आहेत, त्या पक्ष सोडण्याची शक्यता आहे अशा चर्चा राज्यभरात रंगल्या होत्या. अनेक मुंडे समर्थक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले.

आज पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण पक्ष सोडणार नाही हे जाहीर केलं.  मात्र बोलण्यातून नाराजी व्यक्त करण्यासही त्या कचरल्या नाहीत. त्या म्हणाल्या,

मी कुणाला भीत नाही, पण मी आदरही करते. निर्भय राजकारणाचे माझ्यावर संस्कार आहेत. इथे आता राम नाही, असं ज्यादिवशी वाटेल, त्यादिवशी बघू. तो पर्यंत धर्मयुद्ध टळावं अशीच माझी इच्छा आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांचा त्यांच्या परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या चुलत बंधूनी धनंजय मुंडे यांनी पराभव केला. भाजपची सत्ता देखील गेली. तेव्हापासून पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलण्याचा प्रयत्न पक्षातून केला जातोय असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. गेल्यावेळी त्यांच्या ऐवजी त्यांचे समर्थक रमेश कराड यांना विधानपरिषदेचं तिकीट देऊन या आरोपात काही प्रमाणात तथ्य आहे हेच भाजप नेतृत्वाने दाखवून दिल.

आज पंकजा मुंडे अशा टोकाला येऊन पोहचल्या आहेत जिथे त्यांच्या कडे पक्ष सोडावा किंवा राजकारण सोडावे अथवा भाजपमध्ये चिकाटीने लढाई करून आपली जागा परत निर्माण करावी अशी स्थिती निर्माण झाली आहे.

पण एक मात्र नक्की, महाराष्ट्राच्या नजीकच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या सर्वात जवळ गेलेल्या महिला नेत्या त्याच होत्या.

पण पंकजा मुंडे यांची राजकारणातील एंट्री कशी झाली होती?

पंकजा यांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळी येथे २६ जुलै १९७९ रोजी झाला. त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे तेव्हा राजकारणात पूर्णवेळ सक्रिय झाले होते. रेणापूर येथे त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली देखील होती. आणीबाणीच्या काळात कारावासात जाऊन आलेले विद्यार्थी नेते म्हणून त्यांना जनसंघाच्या राष्ट्रीय नेतृत्वामध्ये देखील ओळखलं जात होतं.

पंकजा यांचे मामा म्हणजेच प्रमोद महाजन यांच्या साथीने गोपीनाथ मुंडे यांनी संबंध महाराष्ट्र पिंजून काढला होता. बहुजन समाजातल्या अनेक कार्यकर्त्यांना नव्याने स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाशी जोडले.

याचाच परिणाम १९८० साली झालेल्या मध्यावधी विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला.

घरात एवढं राजकीय वातावरण असल्यामुळे अगदी पाळण्यात असल्यापासून पंकजा मुंडे यांच्या कानावर राजकारणाचे धडे पडत गेले. त्यांचं नाव मुळात प्रमोद महाजन यांनी  भाजपच्या निवडणूक चिन्हावरून ठेवलं आहे.

नुकताच जनसंघाच्या नेत्यांनी जनता पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षाची स्थापना केली होती. त्यांना निवडणुकीचं चिन्ह म्हणून कमळ मिळालं होतं. असं म्हणतात कि जर भाचा झाला असता तर त्याच नाव पंकज असं ठेवायचं आणि भाची झाली झाली तर पंकजा ठेवायचं असं प्रमोद महाजनांनी ठरवलेलं.

पंकजा म्हणजे कमळ

त्यांचं प्राथमिक शिक्षण परळी मध्येच झालं. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी औरंगाबाद गाठले. पण तिथे त्यांचं फार काळ मन रमल नाही त्यामुळे पुन्हा परळीमध्ये येऊन त्यांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं. 

सुरवातीला मात्र त्यांचा राजकारणात येण्याचा कोणताही विचार नव्हता. त्यांचा राजकारणापेक्षा आपला स्वतःचा व्यवसाय असावा असं स्वप्न होतं. म्हणूनच त्यांनी एमबीए साठी देखील ऍडमिशन घेतलं होतं. मात्र त्याच्याही आधी वयाच्या अठराव्या वर्षीच त्यांनी स्वतःची एक कॉम्प्युटर कंपनी सुरु केली होती.

तो काळ भारतात सुरु असलेल्या कंप्यूटर क्रांतीचा होता. आयटीच बूम आलं होतं. घराघरात कॉम्प्युटरचा प्रवेश होत होता. येणार काळ हा टेक्नॉलॉजीचा आहे हे ओळखलेल्या पंकजा मुंडे यांनी स्वतःची एक छोटी कंप्यूटर कंपनी सुरु केली होती.

त्याच्या उदघाटनाचा एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पंकजा यांनी कॉम्प्युटरचं महत्व सांगणारं छोटेखानी भाषण केलं. भावी काळात मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातील तरुणाईने देखील कॉम्प्युटरला आपलंस करावं याबद्दल त्या बोलल्या.

या कार्यक्रमासाठी गोपीनाथ मुंडे हजर नव्हते मात्र त्यांचे एक मित्र भगवानराव लोमटे त्या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांनी गोपीनाथरावांना खास भेटून सांगितलं की,

पंकजामध्ये खूप चांगल्या क्षमता आहेत. तिच्यामध्ये तुमची गादी चालविण्याची क्षमता आहे.

पंकजा यांनी वडिलांप्रमाणे कॉलेजच्या स्टुडंट्‌स कौन्सिल आणि सेक्रेटरी-प्रेसिडेंटच्या निवडणुकीत सहभाग घेतला पण त्या राजकारणात रमल्या नाहीत. १९९९ साली पंकजा मुंडे यांचं डॉ चारुदत्त उर्फ अमित पालवे यांच्याशी लग्न झाले. त्यांचे कुटुंबीय मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असले तरी ते पुढे पुण्यात स्थायिक झालेले होते.लग्न करून सासरी संसारात रमलेल्या पंकजा राजकारणात येणार नाहीत अशीच सगळ्यांना शक्यता वाटत होती.

गोपीनाथ मुंडे यांच्या मोठ्या भावाचे सुपुत्र धनंजय मुंडे हेच त्यांची गादी चालवणार असं वाटत होतं. जिल्हापरिषदेच्या राजकारणापासून धनंजय मुंडे यांनी आपला जम बसवला होता. 

मधल्या काळात अनेक घडामोडी घडत गेल्या. गोपीनाथ मुंडे यांचे जिवाभावाचे साथीदार त्यांच्या पत्नीचे बंधू प्रमोद महाजन यांची हत्या झाली. महाजनांच्या हत्येचा मोठा सेटबॅक मुंडेंना बसला. त्यांच्या पक्षातल्या विरोधकांना नवे बळ मिळाले. आधीच मुंडे महाजनांचे पंख कापण्याचं काम दिल्लीमधून सुरु होतं. मुंडे  भाजपमध्ये नाराज असून काँग्रेस मध्ये जाणार अशी चर्चा सुरु झाली.

गोपीनाथ मुंडे यांना आपली राजकीय ताकद दाखवणे आवश्यक होते. त्यांनी २००९ साली बीड लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल केली. राज्याच्या राजकारणातून दिल्लीकडे जाण्याची त्यांची तयारी सुरु होती. काहीही करून हि निवडणूक मोठ्या फरकाने जिंकायची असं त्यांनी ठरवलेलं. 

या निवडणुकीवेळी त्यांनी आपली कन्या पंकजा मुंडे यांना प्रचारात उतरवलं. मुंडे सांगतात

पंकजाने अठराव्या वर्षी केलेल्या भाषणामुळे तिच्यातील आत्मविश्वास मला जाणवला होता. म्हणूनच तिला माझ्या प्रचारात भाषण करण्यासाठी उतरवलं.

बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पंकजा मुंडे यांनी प्रचार केला. गावोगावी त्यांचं नाव झालं. त्यावेळी त्यांनी केलेला प्रचार, त्यांची भाषणे बघून मुंडेंनी ठरवलं आपला उत्तराधिकारी पंकजा मुंडे यांना करायचं. त्यांच्या खाली झालेल्या विधानसभेच्या जागेवर पंकजा मुंडे यांची वर्णी लागली आणि त्या राजकारणात आल्या.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.