ममतादीदी सुद्धा वापरतात त्या पॅरागॉन स्लीपरचा रेकॉर्ड आजतागायत कायम आहे….

मागच्या ३०-३५ वर्षांपूर्वी आजच्यासारखे चपलांचे विविध ब्रँड नव्हते. आज बाटा, आदिदास, नायके, वूडलँड या चपला बुटांच्या ब्रॅण्डची धुमधाम आहे पण एक असा चपलांचा ब्रँड होता आणि अजूनही आहे ज्यावर पिढ्या पोसल्या. गावात एखाद्याच घरात टीव्ही असायचा तसाच एकवेळ संपूर्ण भारतभर स्लीपर चप्पल म्हणून हा एकच ब्रँड अस्तित्वात होता. निळ्या आणि पांढऱ्या रंगाची हि पॅरागॉन स्लीपर चप्पल प्रत्येक घराबाहेर हमखास असायचीच. आज या ब्रॅण्डची यशोगाथा जाणून घेऊया.

जुन्या काळात या चपलेची लोकं इतकी काळजी घेत असायचे कि वापरून झाल्यावर तिला परत कागदाच्या कपट्यात बांधून ठेवायचे जेणेकरून धूळ बसू नये, तिची झीज होऊ नये म्हणून. त्या काळातल्या काही लोकांना आठवड्यातून एकदाच चप्पल घालायला मिळायची आणि ती पॅरागॉन ब्रॅण्डची होती.

स्लीपर चप्पल म्हणल्यावर सगळ्यात आधी डोळ्यासमोर येणारा ब्रँड म्हणजे पॅरागॉन. गावखेड्यात शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते गावातल्या गावकऱ्यांकडे फक्त आणि फक्त पॅरागॉन चप्पल दिसायची. याच पॅरागॉन चपलेने अनेक लोकांच्या पायाची काळजी घेतली आणि अनेक लोकांनी घरच्यांकडून या चपलेने मार सुद्धा खाल्ला आहे. तर हा पॅरागॉन ब्रँड नक्की कसा सुरु झाला ?

पॅरागॉनची सुरवात झाली ती १९७५ साली. पी.व्ही.अब्राहम, के.यु. थॉमस आणि के.यु.स्कारिया या तिघांनी एका गॅरेजमधून या ब्रॅण्डची सुरवात केली.

भारताच्या केरळ राज्यातल्या कोट्टायम या शहरातून पॅरागॉन हळूहळू भारतभर पसरत गेला. त्याकाळात दिवसाला १५०० स्लीपर चप्पलचे जोड बनवले जायचे.

१९८२ च्या सुमारास पॅरागॉनने साऊथकडून भारतीय मुख्य बाजारपेठांमध्ये प्रवेश केला. कारण केरळमध्ये चालायला सहजसोपी असणारी हि चप्पल अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. बाजारपेठांमधून वाढलेली मागणी भारतभरात लोकप्रिय होण्यासाठी कारणीभूत ठरली.

संपूर्ण देशामध्ये स्लीपर चप्पल विक्री करणारा त्याकाळात पॅरागॉन हा एकमेव ब्रँड होता. आजसुद्धा पॅरागॉन हा ब्रँड माहिती नाही असा एकही माणूस नसेल. अगदी म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांनासुद्धा हा ब्रँड माहिती झाला होता. रबरापासून तयार झालेली हि स्लीपर चप्पल पॅरागॉनने तयार केली आणि चांगली गुणवत्ता आणि दीर्घकाळ चालणारी चप्पल म्हणून बाजारपेठेत उतरवली. 

जशी जशी पॅरागॉनची लोकप्रियता वाढू लागली त्याप्रमाणे या ब्रँण्डने टीव्ही जाहिराती वर भर देऊन सर्वदूर आपली कीर्ती पोहचवण्याची सुरवात केली. प्रिंट, टीव्ही, रेडिओ यांसारख्या पारंपरिक माध्यमांवरील जाहिरातीतून पॅरागॉनची माहिती द्यायला सुरवात केली. टिकाऊपणा आणि सामान्य लोकांना परवडणारा ब्रँड म्हणजे पॅरागॉन असं समीकरण तयार झालं.

कंपनीने सुरवातीला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पॅरागॉन पेहनके चलो आणि चलता रहे अशा टॅगलाईन सुरु केल्या ज्या चांगल्या मोठ्या प्रमाणावर चालल्या. जाहिरातींमधून विनोदी मांडणी, हंगामी आणि पुरुष स्त्री वर्गाच्या चपलांची व्यवस्थित माहिती यामुळे हा ब्रँड अधिकच लोकप्रिय होत गेला.

ऑफिसवाली चप्पल पासून ते स्कुल के बूट्स आणि मान्सून कि सॅन्डल असा मोठा प्रवास जाहिरातींमधून दाखवण्यात आला. आजसुद्धा पॅरागॉनची एकूण उत्पादन क्षमता दिवसाला ४ लाख आहे आणि भारतभरात एकूण १७ मुख्य सेंटर आहेत.

मागच्या ४०-४५ वर्षांपासून पॅरागॉन आपलं वेगळेपण जपून आहे. खेड्यापाड्यापासून ते शहरी लोकांपर्यंत या ब्रॅण्डची क्रेझ आजही टिकून आहे. पॅरागॉन ब्रॅण्डच्या अंडर २० पेक्षा अधिक ब्रँड आहेत. त्यापैकी सोलीया, पॅरागॉन मॅक्स, स्टिम्युलस, प्यारालाईट, फेंडर, एस्कुट, वॉकी, व्हर्टेक्स, स्कुल शूज, फ्लॅट लाईट, राजकुमारी, सोनार, कॅज्युअल, डोली आणि मेरीवा या सगळ्यात जास्त चालणाऱ्या व्हरायटी आहेत.

राजकीय नेते सुद्धा पॅरागॉनची चप्पल आवडीने घालतात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि इतर नेतेसुद्धा पॅरागॉनची चप्पल वापरतात इतका जुना हा ब्रँड आहे. ८०च्या दशकात विक्रमी सेल पॅरागॉनने केला होता. 

अस्सल स्वदेशी ब्रँड म्हणून पॅरागॉन चप्पल परिचित आहे. चपलांच्या सगळ्यात जुन्या ब्रॅण्डपैकी एक म्हणजे पॅरागॉन टॉपला आहे. वेगवेगळ्या व्हरायटी आणि जाहिरातींमधून तेही विशेषतः साऊथचा सुपरस्टार महेशबाबू आणि ह्रितिक रोशन या स्टायलिश आयकॉन लोकांना सोबत घेऊन पॅरागॉनने आपली हवा बाजारपेठेत कायम राखली आहे. 

आजसुद्धा अनेक लोकांच्या आठवणी पॅरागॉन ब्रॅण्डसोबत जोडलेल्या आहेत. ज्या पद्धतीने कंपनी गॅरेजमधून सुरु झाली आज तीच कंपनी इतर कंपन्यांशी स्पर्धा न करताही आपली खासियत जपून आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.