पेशव्यांच्या मेहुण्यांनी लाच खाल्ली नसती तर गोव्यावर मराठ्यांचं राज्य असलं असतं..

थोरले शाहू छत्रपती यांचं शासन म्हणजे मराठा साम्राज्याचा सुवर्णकाळ. संपूर्ण भारतात मराठ्यांची तुफान घोडदौड सुरू होती. महाराजांच्या पराक्रमाने साऱ्या दिशा दणाणून गेल्या होत्या. तंजावर ते पेशावर भारताच्या विविध भागावर मराठ्यांनी आपला अंमल बसवला. पेशवे बाजीराव, मल्हारराव होळकर, महादजी शिंदे असे अनेक पराक्रमी नरवीर याच काळात मराठा साम्राज्याला लाभले

आपले वडील पराक्रमी संभाजी महाराज यांच्याप्रमाणेच शाहू छत्रपतींनी गोव्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करायचं ठरवलं.

बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईची मोहीम हाती घेण्यात आली. अनेक दिग्गज मराठा सरदार या मोहिमेत दाखल झाले. तब्बल ४५ हजारांच्या सैन्यानिधी चिमाजी अप्पा यांनी वसईच्या किल्ल्यावर हल्ला चढवला. पण पोर्तुगीज देखील प्रचंड चिवट होते. त्यांनी वसईचा किल्ला तब्बल २ वर्षे लढवत ठेवला.

वसईच्या मोहिमेला वेळ लागत असलेलं पाहून बाजीराव पेशव्यांनी थेट गोव्यावर हल्ला करायचं ठरवलं. या मोहिमेची जबाबदारी देण्यात आली व्यंकटराव घोरपडे यांच्याकडे.

व्यंकटराव घोरपडे म्हणजे इचलकरंजीचे जहागीरदार. ते मूळचे कोकणातले जोशी. पण संताजी घोरपडे यांनी त्यांचे पूर्वज नारो महादेव यांच्यावर खुश होऊन त्यांना इचलकरंजी वगैरे प्रांत दिला. आपल्या धन्याची आठवण म्हणून त्यांनी स्वतःच आडनाव घोरपडे असं बदललं.

बाजीराव पेशव्यांची बहीण अनुसयाबाई ही व्यंकटराव घोरपडे यांना दिली होती. एकुलती एक बहीण असल्यामुळे पेशव्यांचा आपल्या बहिणीवर मोठा जीव होता. तिच्यासाठी म्हणून पुण्यात त्यांनी वाडा देखील बांधून दिला होता. पेशव्यांच्या दरबारात अनुबाईच्या शब्दाला मोठा मान होता.

त्यांच्यामुळेच बाजीराव आणि चिमाजी आप्पा यांनी गोव्याची जबाबदारी व्यंकटराव घोरपडे यांच्याकडे दिली. शिवाय त्यांचे सहाय्यक म्हणून दादाजीराव भावे नवलगुंदकर यांची नेमणूक करण्यात आली.

गोव्याच्या मोहिमेसाठी नेमस्त करण्यात आलेल्या सैन्यात चार हजार घोडदळ, सहा हजार पायदळ आणि दोन हजार पेंढारी होते. 

मराठा सैन्य गोव्यात ‘दिगी’ घाटातून दि. २३ जानेवारी १७३९ या दिवशी साष्टी प्रांतात उतरले. पुढच्या दोनच दिवसात मडगाव शहर घोरपड्यांच्या हाती पडले. तेथेच त्यांनी आपल्या सैन्याचा मुख्य तळ केला. मडगावची तटबंदी मराठ्यानी काबीज करताच कुकळ्ळी येथील ठाण्याचा देशी अधिकारी कॅप्टन तुकू नाईक हा आपल्या सैन्यासह मराठ्याना येऊन मिळाला. 

फोंड्यामध्ये मराठ्यांनी मर्दनगडचा जिंकला. सरदार व्यंकटराव घोरपडे यांचा दिवाण गोविंदा ठाकूर हा सोंधेच्या राजाच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या किल्ल्यावर पांचशे घोडदळासह चालून गेला. किल्लेदार नरसिंगराव याने विना प्रतिकार किल्ला मराठ्यांच्या हवाली केला. फोंड्याहून मराठ्यानी उसगावला जाऊन तेथील गढीही हस्तगत केली.

ह्या घटना दि. १ मार्च १७३९ या दिवशी घडल्या. थोड्याच दिवसानी व्यंकटराव घोरपडे यानी सोधेच्या राजाच्या अमलाखाली असलेले सुपे आणि सांगे येथील किल्लेही काबीज केले.

फोंडे अथवा अंत्रुज महाल मराठ्यांनी घेताच तिसवाडी अथवा गोवा बेटातील पोर्तुगीजांचे धाबे दणाणले. कारण अंत्रुज महालाची सीमा गोवा बेटाला भिडत असल्याने त्या बेटावर स्वारी करणे मराठ्यांना सुलभ जाणार होते. असे सांगतात की,

गोवे शहर घेतल्यावर तेथील इंक्वझिशनच्या पाद्र्यांना आपल्या पालखीला जुंपून त्यांची गोवा शहरातून आपण धिंड काढणार असल्याचे सरदार व्यंकटराव घोरपडे यानी जाहीर केले होते ती बातमी गोवा शहरात पसरताच पाद्र्यांची घाबरगुंडी उडाली.

मराठ्यांनी साष्टी प्रांत घेतला असला, तरी रायतूर आणि मुरगाव येथील किल्ले त्याना घेता आले नाहीत. पोर्तुगीजानी हे किल्ले प्राणपणाने लढविले. रायतूर, मुरगाव, आग्वाद आणि रेइश मागुश हे चार किल्ले वगळता गोव्याचा इतर सर्व टापू मराठ्यानी घेतला. 

गोवा शहरातील नागरिकांची तर पाचावर धारण बसली. सगळीकडे पळापळ सुरू झाली. पोर्तुगीज लोक तिसवाडीला पळून गेले. इ. स. १६८३ साली संभाजी महाराजांच्या स्वारीच्या वेळी जी घबराट माजली तशी घबराट यावेळीही माजली. परंतु त्यावेळी मोगल सैन्य आपल्या मदतीला धावून येईल अशी आशा पोर्तुगीजाना वाटली होती. तशी आशा यावेळी करता येत नव्हती. यावेळी कुणाकडूनच मदत येण्याची शक्यता नव्हती.

कुठूनही मदत येण्याची आशा नसल्याचे पाहून गोव्याचा व्हाइसरॉय कौंट द सांदोमिल याने सरदार व्यंकटराव घोरपडे यांच्याकडे तहाचं निशाण फडकवलं. 

दि. ८ मार्च १७३९ या दिवशी त्याने तशा स्वरुपाचे पत्र व्यंकटराव घोरपडे याना पाठविले. तत्पूर्वी त्याने छत्रपती शाहू महाराजांचे एक मंत्री नारोराम यांच्यामार्फत शाहू महाराजांकडे तहाची याचना केली होती. परंतु शाहू महाराजानी स्वतःच्या अखत्यारीत पोर्तुगीजांशी तह करण्यास नकार दिला. त्यानी व्हाइसरॉयला बाजीरावाशी संपर्क साधावयास सांगितले.

शाहू महाराजांच्या नकारामुळे व्हाइसरॉयची निराशा झाली असली, तरी त्याने चिकाटी सोडली नाही. त्याने गोव्याच्या स्वारीवर आलेले सरदार व्यंकटराव घोरपडे व दादाजी भावे नरगुंदकर या दोघांशी गोव्यातील काही प्रतिष्ठित हिंदू व्यापाऱ्यांच्या विद्यमाने संधान जुळविले. या व्यापाऱ्यानी दादाजी भावे नरगुंदकर याना मोठी लांच देऊन तह करण्याबाबत व्यंकटराव घोरपडे यांचे मन वळविण्याची त्याना गळ घातली. 

एकूण सत्तर हजार अश्रफी व्हाइसरॉयने व्यंकटी कामत नावाच्या व्यापाऱ्याकरवी दादाजी भावेस देऊ केल्या. त्यापैकी व्यंकटी कामतने दादाजीस इसारा म्हणून बारा हजार अश्रफी दिल्या. व्यंकटी कामत आणि भाव्यांचा दिवाण महादजी शेणवी या दोघांचे आतून सूत होते. महादजी शेणवीचे गोव्यात काही नातेवाईक होते. त्यांचे आणि पोर्तुगीज अधिकाऱ्यांचे स्नेहाचे संबंध असल्याने दादाजीला लांच देऊन तहास प्रवृत्त करणे त्याना शक्य झाले.

व्यंकटराव घोरपडे यांचा या सगळ्या लाचखोरीला आशीर्वाद होता. दादाजी भावे यांच्या या प्रकरणात त्यांनाही पैशांचा मोठा वाटा मिळणार होता.

भाव्यांचा दिवाण महादजी शेणवी याने ‘इंक्विझिशनच्या अधिकाऱ्यानी हिंदूच्या वाटेस जाऊ नये’ अशी शर्त घातली. परंतु त्या दोन्हीही अटी पोर्तुगीजानी मान्य केल्या नाहीत. त्यानी सबब सांगितली की हा प्रश्न धार्मिक असल्याने त्यांत ढवळाढवळ करण्याचा आपणास अधिकार नाही. 

व्यंकटराव घोरपडे आणि दादाजी भावे या दोघानी पोर्तुगीजांकडून लांच घेतल्याने ते त्यांचे मिंधे बनले होते. त्या दोघानी तहाच्या करारावर दि. २ मे १७३९ या दिवशी मुकाट्याने सह्या केल्या. 

लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की ह्या लांच्छनास्पद करारावर छत्रपती शाहू महाराज यानी शिक्कामोर्तब केले नाही.

पोर्तुगीजानी युद्धनुकसानी म्हणून मराठ्याना सात लक्ष रुपये द्यावे अशी अट तहाच्या कलमात होती. ह्या रकमेपैकी एक लक्ष रुपये आपणा स्वतःला मिळण्याची व्यवस्था दादाजीने अगोदरच करून ठेवली होती. मराठ्यांशी तह करण्यासाठी पोर्तुगीजाना मोठा भुर्दड भरावा लागला. परंतु हा पैसा त्यानी आपल्या अंकित असलेल्या हिंदू व्यापाऱ्यांवर कर लादून बऱ्याच मोठ्या प्रमाणात वसूल केला.

मराठ्यांच्या इतिहासात गोवा जिंकण्याची आलेली संधी पेशव्यांच्या मेहुण्याने केलेल्या लाचखोरीच्या प्रकरणामुळे वाया गेली.

सन्दर्भ- पोर्तुगीज मराठा संबंध स.शं.देसाई 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.