म्हणून प्रशांत किशोर नवा पक्ष काढत बिहारमध्ये राडा घालायला सुरवात करतील, असं बोललं जातंय

निवडणुकीच्या स्ट्रॅटेजीसाठीचा बाप माणूस म्हणून प्रशांत किशोरांना सध्या ओळखलं जातं. २०१४ ला जेव्हा मोदींची लाट आली आणि त्यानंतर केंद्रात बीजेपीचं सरकार स्थापन झालं. तेव्हा प्रशांत किशोर पहिल्यांदा राष्ट्रीय चर्चेत आले होते. 

आफ्रिकेत निवडणुकीची रणनीती आखून काही प्रमाणात यश मिळवल्यानंतर, २०१४ ची लोकसभा निवडणूक प्रशांत किशोर यांच्यासाठी पहिला मोठा टप्पा होता

तेव्हापासून त्यांची जी धूम राहिली आहे ती अजूनही कायम आहे.

त्या निवडणुकीनंतर त्यांनी अनेक पक्षांसाठी निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम बघितलं आहे. प्रत्येक वेळी त्यांची फक्त स्ट्रॅटेजिस्ट म्हणूनच न राहता स्वतः एखाद्या पक्षात सक्रिय कार्यकारी नेता होण्याची महत्वकांक्षा दिसून आली आहे. गेल्या काही दिवसांमध्येही याचं उदाहरण बघायला मिळालं.

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची डुबती नय्या पार लावण्यासाठी प्रशांत किशोर यांनी परत एकदा काँग्रेसचे सल्लागार म्हणून रिंगणात उडी घेतल्याचं दिसलं. 

त्यावेळी ते काँग्रेसमध्ये सामील होतील, अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र गेल्या आठवड्यात त्यांनी कॉंग्रेसची ऑफर नाकारली असल्याचं सांगितलं होतं. 

शिवाय २ मे आधी आपण आपलं एक कोडं उलगडणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं. 

त्यानुसार आज प्रशांत किशोर यांनी एक ट्विट केलं आहे.

ज्यावरून ते नवीन पक्ष स्थापन करणार की काय? अशा चर्चांना उधाण आलंय.

ट्विट असंय…

प्रशांत किशोर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की…

“लोकशाहीमध्ये प्रभावी योगदान देण्याची त्यांची भूक आणि जनतेप्रती कृती धोरण तयार करण्यात मदत करण्याचा त्यांचा प्रवास खूप चढ-उतारांचा राहिला आहे.

आज जेव्हा मी पानं उलटतो तेव्हा असं वाटतं की, खऱ्या मालकांमध्ये म्हणजेच ‘लोकां’ मध्ये जाण्याची वेळ आली आहे. त्यांच्या समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची आणि ‘जन सूराज’च्या मार्गाकडे वाटचाल करण्याची वेळ आलीये. “

किशोर यांच्या या ट्विटकडे सर्व जण ‘स्वतंत्र पक्ष निर्माण करण्याची हिंट’ म्हणून बघत आहेत, आणि त्याची सुरवात ते बिहारपासून करतील अस बोललं जातय. नेमकं बिहारचं का याचीही कारणं सांगितली जात आहे. तीच क्रमवार बघण्याची गरज आहे.. 

सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रशांत किशोर स्वतः मूळ बिहारचे आहेत. 

बिहारच्या सासाराममध्ये त्यांचा जन्म झाला होता. म्हणजे बिहार त्यांचं होमस्टेट आहे. त्यांनी बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात काम देखील केलं आहे, ज्यामुळे त्यांचं बरंच नाव तिथे झालंय. होमस्टेटचा फायदा हा होतंच असतो. शिवाय त्यांनी त्यांच्या स्वतंत्र कामाची सुरुवात आपल्याच राज्यातून करण्याची इच्छाही अनेकदा बोलून दाखवली आहे. 

म्हणून त्यांच्या बिहारमध्ये स्वत:चा पक्ष सुरू करण्याच्या निर्णयाच्या अंदाजानंतर राज्यातील राजकीय निरीक्षकांना फारसं आश्चर्य वाटलं नसल्याचं दिसतंय.

दुसरं म्हणजे नितीश कुमार यांची बिकट अवस्था

सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना सत्ताधारी आघाडीत अस्तित्वाच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याची कुजबूज सुरू आहे. एकतर ते दिल्लीला जातील किंवा पायउतार होतील अशा चर्चा सुरु आहेत. 

नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेड (जदयू) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यात सर्व काही ठीक नाही का? हाच प्रश्न गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. अनेक मुद्द्यांवरून दोन्ही पक्षांतील मतभेद ज्या पद्धतीने उघडपणे समोर आले आहेत, त्यावरून या अंदाजाला खतपाणी मिळत आहे.

रमजानमध्ये विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांसोबत दोनदा इफ्तार पार्टी नितीशकुमार यांनी केली आहे. त्यात यूसीसीपासून लाऊडस्पीकर वादापर्यंत भाजपवर त्यांनी टीकास्त्र चालवलं आहे.

तिसरं बीजेपी नेत्यांमधील असंतोष

मुख्यमंत्री कार्यालयाचे सर्वांवर नियंत्रण आहे, या गोष्टीने राज्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये, अगदी काही मंत्र्यांमध्येही काहीशी नाराजी असल्याचं दिसतंय.

एका भाजप नेत्याचा म्हणण्यानूसार, प्रशांत किशोर बिहारमध्ये ‘आप’ (आम आदमी पार्टी) करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण त्यांना माहित आहे की लोकांना काहीतरी पर्याय हवा आहे.

वोट शेअरिंग बघता भाजपकडे ३५%, राष्ट्रीय जनता दलाकडे (आरजेडी) ३५% तर नितीश कुमार यांच्या जद (यू) ला १५% आणि उर्वरित १५% मते काँग्रेस आणि डाव्यांसारख्या इतर पक्षांकडे वोट शेअरिंग आहे.

बिहारमध्ये सत्तेत राहण्यासाठी दोन गट एकत्र असणं आवश्यक आहे. २०१५ मध्ये, नितीश आणि राजद एकत्र आले होते आणि आता प्रशांत यांना बिहारमध्ये आप आणि बीजेपीची गरज असल्याचं बोललं जातंय.

तरी नवा ‘आप’ असण्याबाबतचा हा सिद्धांत किशोर यांनी फेटाळून लावला आहे आणि त्यावर अधिक बोलण्यास नकार दिलाय.

चौथा मुद्दा आहे ब्राम्हण मत

बिहारच्या राजकारणातील सर्वात प्रबळ समाज घटकांपैकी एक ‘उच्च जाती’ आहेत. राज्यातील या जातीसमूहात मोठ्या प्रमाणात ब्राह्मण, भूमिहार आणि राजपूत हे तीन गट आहेत. त्यात राज्याच्या लोकसंख्येत ब्राम्हणांचा मोठा वाटा आहे. म्हणून प्रत्येक पक्ष ब्राम्हण मतांसाठी कार्यरत असतो. 

अशात किशोर ब्राह्मण नेते आहेत. त्यामुळे ही मतं त्यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

अशा या मुद्यांच्या आधारे त्यांनी सध्या बिहारपासून सुरुवात केल्याचं दिसत आहे. 

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, प्रशांत किशोर काही महिन्यांसाठी बिहारमध्ये राहणार आहेत. तिथल्या लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. या राजकीय चळवळीचं रूपांतर पुढे नव्या राजकीय पक्षात होऊ शकतं, असं मानले जात आहे.

इतकंच नाही तर या पक्षाचं नावही ‘जन सूराज’ असू शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  तरी अजून तशी अधिकृत रित्या प्रशांत किशोर यांच्याकडून घोषणा केली गेली नाहीये. म्हणून त्यांच्या या हिंटचा नक्की अर्थ काय? हे येत्या काळातच समजणार आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.