पोर्तुगीज-इंग्रजांनी नाही तर मुंबई या महान राजाने वसवली.

मुंबई म्हणेज देशाची आर्थिक राजधानी. खऱ्या अर्थाने भारतातील सर्वात मोठं महानगर. रोज लाखोंच्या संख्येने लोक इथे रोजगार शोधत येत असतात. इथल्या सुपरस्टार हिरोपासून ते अंडरवर्ल्ड डॉन पर्यंत प्रत्येकाचं स्वप्न मुंबईवर राज करण्याचं असतं. इथल्या नेत्यांची ओळख देखील मुंबई सम्राट स.का.पाटील, बंद सम्राट जॉर्ज फर्नांडिस, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अशी असते. कोणाला पटो अथवा न पटो या सगळ्यांनी आपापल्या काळात मुंबईवर राज्य हे केलंच.

मात्र स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी मुंबईचे राजे होते इंग्रज आणि त्यांच्याही आधी त्यांना  मुंबई आंदण देणारे पोर्तुगीज.

पण सगळ्यांच्या आधी मुंबईचा आद्य राजा कोण या प्रश्नच उत्तर आपल्या पैकी अनेकांना देता येणार नाही. मुंबईच्या या पहिल्या राजाच नाव होतं,

प्रताप बिंब.

महिकावतीची बखर आणि इतिहासाचार्य राजवाडे यांनी त्याचे लावलेले अर्थ यात प्रताप बिंब या राजाचा उल्लेख येतो.

साधारण ११३८ सालच्या काळची गोष्ट.  चंपानेर नावाच्या राज्यात बिंब नावाचे एक राजे राज्य करीत होते. हे राजे महाराष्ट्रिक म्हणून ओळखले जात. त्यांचे पैठणच्या भौम राजांशी जवळचे संबंध होते.

गोवर्धन बिंब हा गादीवर बसला होता. त्याच्या लहान भावाने प्रताप बिंब याने उत्तर कोकणावर स्वारी करण्याची योजना आखली.

त्याकाळी कोकणात उत्तर कोकणातील शिलाहार आणि . दक्षिण कोकणातील कदंब यांच्यात अनेक युद्धे सुरू होती व या दोन्हीच्या लढयातून प्रदेशाची प्रचंड वाताहत झाली होती. याचा फायदा घेण्यासाठी प्रताप बिंब कोकणावर चालून आला. त्याने या मोहिमेसाठी सोबत आठ प्रमुख अधिकारी आणि दहा हजार फौज घेतले

पण त्याने थेट कोकणावर हल्ला केला नाही तर तो आधी नर्मदा उतरून पैठण येथे भौम राजाकडे गेला तेथे तो संपूर्ण फौजेसह तब्बल दोन वर्षे राहिला. प्रताप बिंबला मोहिमेवरून निघताना बहुदा पैशाची बरीच अडचण असावी. भौम राजाने सुद्धा त्याला जवळ ठेवून घेतले आणि त्याच्या दहा हजार फौजेचा खर्च पाहिला त्याला आणखी दोन हजारच सैन्य दिलं.

अखेर दोन वर्षांनी पैशाची व्यवस्था करून प्रताप बिंब मुंबई-ठाणे भागावर चाल करून आला.

सुरवातीला त्याने दमन म्हणजे सध्याच्या महाराष्ट्र-गुजरात उत्तर सीमा भागावर हल्ला करायचा आणि तिथून भगदाड पाडून कोकणात उतरायचे ठरवले.  या वाटचालीत त्याला हरबाजी देशमुख हा शूर योद्धा सामील झाला. भौम राजाने दिलेल्या फौजेचे नेतृत्व करायला त्याने सोबतीला होता बाळाजी शिंदे. तो देखील पराक्रमी म्हणून ओळखला जायचा.

या फौजेने सर्वप्रथम दमन प्रांतावर हल्ला चढविला तेथे राज्य करीत असलेला काळोजी शिरण्या नामक राजाला हरवले. दमनची व्यवस्था पाहण्यासाठी हरबाजी कुळकर्णी नावाचा अधिकारी नेमला.

दमण जिंकल्यावर उंबरगाव डहाणू तारापूर करत तो महिकावतीस पोहोचला. हे महिकावती म्हणजे आजचे माहीम.

तेथे विनाजी घोडेल म्हणून कोणी नायक राज्य करीत होता. याच्या काळात तिथल्या भागातली सुपीकता ओसरून प्रदेश देशोधडीला लागला होता. निसर्गरम्य असा समुद्रकिनाऱ्याचा भाग वैराण आणि उद्ध्वस्त झालेला होता. प्रताप बिंबाने त्याचा सहज पराभव केला. या भागात सुसंस्कृत लोकांची वसाहत वसवून गत वैभव पुन्हा मिळवून द्यायचं त्याच्या मनात बसलं.

त्याने आपला मोठा भाऊ गोवर्धन बिंब आणि पैठणचा राजा भौमाकडे विद्वान व पराक्रमी लोकांना पाठवून देण्यासाठीची पत्रे रवाना केली  व आपला पुत्र मही बिंब यास देखील येथे धाडून द्यावे असे त्याने आपल्या मोठ्या भावाला कळविले.

दुसरीकडे प्रताप बिंबाने आपला मुख्य प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी याला ठाणे साष्टी आणि मुंबईचा मुलुख काबीज करण्यासाठी पाठवले.

बाळकृष्णराव सोमवंशी याने पहिलाच फटक्यात ठाण्यावर हल्ला चढवत यशवंत शिलाहार शेलार याला ठार केले आणि शिलाहारांची उरलीसुरली सत्ता ठाण्यातून उपटून टाकली. त्याने पुढे खाडी ओलांडून कळवा येथे कोकाट्या नावाच्या मराठ्याचा पराभव केला.

बाळकृष्णराव तिथून मुंबईच्या दिशेने निघाला आणि मढ येथे पोहोचला. तिथून तो जुहू मार्गे वाळुकेश्वरी पोहोचला. तिथून त्याने प्रताप बिंबास पत्र पाठवून बोलवून घेतले. प्रताप बिंबाने माहीम प्रांता प्रमाणे वाळुकेश्वरी देखील वसाहत बसविण्याचा निर्णय केला.

पुढे सतराव्या शतकात माँसाहेब जिजामाता यांनी लहानग्या शिवबांना घेऊन पुणे वसवताना जे कष्ट करावे लागले तेवढेच किंवा तेवढेच कष्ट प्रताप बिंबास मुंबई व ठाणे प्रांतात पडले. बखरीतल्या नोंदी प्रमाणे  शेती ग्रामसंस्था व्यापार-उदीम हे पुन्हा सुरू व्हावे यासाठी त्याने निश्चित धोरणे आखली होती.

इसवीसन ११४० मध्ये स्वतःच्या राजधानीचे गाव म्हणून त्याने केळवे-माहीम निश्चित केले.

वडिलांनी पाठवलेल्या पत्राप्रमाणे मही बिंब चंपानेर वरून महिकावतीस पोहोचला. त्याने देश वसाहत वसवण्यासाठी सोबत अनेक लोक आणले होते. यात वैश्य वाणी या पासून ते आगरी कोळी समाजापर्यंत अनेक समाजाचे लोक होते.

यातील प्रमुख कुळे घेऊन प्रताप बिंब वालुकेश्वर येथे स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला.

प्रताप बिंब याने आजच्या मुंबई ठाणे भागात लोकांना वसवले आणि या उजाड भागाचे रूपांतर गावात केले.

इ.स. ११४७ मध्ये प्रताप बिंब माहीम येथे वारला. पुढे त्याचा मुलगा मही बिंब याने अनेक वर्षे राज्य केले. त्यामुळे त्यांना मुंबईचा आद्य राजा असे मानले जाते.

पुढच्या काळात पोर्तुगीज आले त्यांनी काही काळ राज्य केला व पुढे मुंबई इंग्रजांना लग्नात आंदण म्हणून दिली. इंग्रजानी सात बेटे एकत्र करून शहर बनवले इथून पुढचा इतिहास तर आपल्याला ठाऊकच आहे. पण मुंबई शहराचा खरा निर्माण कर्ता महाराज प्रताप बिंब यांना जाते याचा उल्लेख मात्र इतिहास सोयीस्कर रित्या विसरतो.

संदर्भ- रोहन चौधरी यांचा ब्लॉग , महिकावतीची बखर विनोद सोनवणे 

हे ही वाच भिडू.

 

2 Comments
  1. रोहन चौधरी says

    हा लेख माझा आहे. मी २०११ मध्ये लिहिलेला आहे. विनोद सोनवणे कोण? Content तरी प्रमाणिक ठेवा.

  2. टिम बोलभिडू says

    डॉ.विनोद सोनवणे यांनी लिहिलेल्या महिकावतीची बखर या पुस्तकावरून ही पोस्ट लिहिली होती.आपला ब्लॉग वाचनात आला नव्हता. आम्ही पुन्हा तपासल्यावर या पुस्तकात देखील आपल्या ब्लॉगचा उल्लेख आलेला आहे हे आढळून आले. सदर गोष्ट लक्षात आणून दिल्या बद्दल धन्यवाद. आपल्या ब्लॉगचा देखील उल्लेख करत आहोत.महिकावती व प्रताप बिंब याची माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवावी इतकाच आमचा प्रामाणिक हेतू होता. आपल्या काही सूचना असतील अथवा आक्षेप असतील तर जरूर कळवा, आम्ही नक्की दुरुस्ती करू. संपर्क क्रमांक ८१४९४९५४३२

Leave A Reply

Your email address will not be published.