पंतप्रधानांचं गाव : या गावानं देशाला ७ पंतप्रधान दिलेत

‘प्रयागराज’ उत्तर प्रदेशातलं असं एक शहर जे राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्य अश्या सगळ्याचं दृष्टीनं महत्वाचं आहे. कधी- काळी अलाहाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराला आपण संगम नगरी म्हणू शकतो, किंवा पूर्वेकडील ऑक्सफर्ड. त्यामुळेच नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रयागराज चर्चित असतंच.

या प्रयागराज शहराचा राजकीय इतिहास तितकाच समृद्ध आहे. म्हणजे आता सुद्धा उत्तर प्रदेशात निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे.  तेव्हा प्रयागराजच्या जाग्यावर एखाद्या मात्तबर उमेदवाराला उभा कारण्याचा सगळ्याच पक्षांचा प्लॅन आहे. एवढंच नाही तर उत्तर प्रदेशाचे सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्याची निवडणूक प्रयागराजच्या जागेवरूनचं लढणार अशी चर्चा होती, पण भाजपने त्यांना त्यांच्या गोरखपूर शहरातूनचं उमेदवारी दिली.

पण या प्रयागराजची खास ओळख म्हणजे त्याला पंतप्रधानांचे शहर’ म्हणून सुद्धा ओळखलं जात. कारण या शहरानं  एक-दोन नव्हे तर देशाला सात पंतप्रधान दिलेत. मग ते देशाचे पहिले पंतप्रधान असोत किंवा अवघ्या ७ महिन्यांसाठी देशाची सत्ता हाती घेणारे असोत, प्रयागराजला देशाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे.

या यादीतील पाहिलं नाव म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू.  म्हणजे नेहरू घराणं याच शहरातलं. नेहरू घराण्याच्या वारशाचे साक्षीदार असलेल्या आनंद भवनाला स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे स्थान आहे. पंडित नेहरूंचा जन्म १८८९ मध्ये झाला.  देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा ते अलाहाबादच्या फुलपूर संसदीय जागेचे प्रतिनिधी होते. पंडित नेहरू फुलपूरमधून तीनदा खासदार म्हणून निवडून आले. 

दुसरं नाव म्हणजे लाल बहादूर शास्त्री. शास्त्रींनी १९५७ आणि १९६२ मध्ये अलाहाबादमधून लोकसभा निवडणूक जिंकली. शास्त्री या शहरातून दोनदा खासदार झालेत.  १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांनी अलाहाबादच्या करछना विधानसभेच्या उरुवा ब्लॉकमधील जाहीर सभेत पहिल्यांदा ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला होता. 

प्रयागराज हे देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे जन्मस्थान होते. त्यांचा या शहराच्या संस्कृतीवर आणि वातावरणावर परिणाम होणे स्वाभाविक आहे. इतकेच नाही तर इंदिरा आणि फिरोज गांधी यांचा विवाह आनंद भवनात झाला, ज्याच्या खुणा आजही येथे आहेत.

पुढे इंदिरा गांधींच्या अकाली निधनानंतर पंतप्रधानपद स्वीकारणारे राजीव गांधींचे सुद्धा या शहराशी संबंध होते होते. याच शहरातून त्यांनी त्यांचे मित्र आणि बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. राजीव गांधी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत या शहरासाठी अनेक कामे केली. नैनी येथील हिंदुस्थान केबल कारखाना हे त्यांचेच योगदान आहे.

यादीतलं पुढचं नाव म्हणजे  गुलझारीलाल नंदा.  दोनदा देशाच्या काळजीवाहू पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळणारे गुलझारीलाल नंदा यांचाही संबंध अलाहाबाद म्हणजे आताच्या प्रयागराज शहराशी होता. त्यांचे शिक्षण अलाहाबाद येथूनच झाले. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात पदव्युत्तर आणि कायद्याचे शिक्षण घेतले. ते रिसर्च स्कॉलरही होते.

देशाचे आठवे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांचाही जन्म अलाहाबाद येथे झाला. भारतातील मागास जातींना हक्क मिळवून देण्यासाठी स्मरणात असलेल्या व्ही.पी.सिंग यांनीही अलाहाबाद विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले. ते अलाहाबाद विद्यापीठ विद्यार्थी संघाचे उपाध्यक्षही होते. 

देशातील तरुण-तुर्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या राजकारणात आधी अलाहाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराचे महत्त्वाचे स्थान आहे. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून एमएची पदवी मिळवली. आणि चंद्रशेखर यांनी या शहरात राहूनच राजकारणाचे धडे घेतले.

अशा या राजकीय शहरानं नुसते पंतप्रधानचं नाही तर अनेक बडे नेते सुद्धा दिलेत ज्यांनी देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावलीत. त्यामुळे आजही या शहराला राजकीय दृष्ट्या तितकचं महत्व दिल जात. 

हे ही वाच भिडू : 

Leave A Reply

Your email address will not be published.