पुण्याच्या पोलीस अधिकाऱ्याच्या गाण्याची करीना सुद्धा जबराट फॅन, म्हणतेय – लय भारी!

गेल्या जवळपास २ वर्षांपासून सगळ्या जगभरात कोरोनानं थैमान घातलयं. भारतातला संक्रमितांचा आकडा पहिला तर आतापर्यंत ३ कोटींच्यावर लोकांना कोरोनाने आपल्या कचाट्यात अडकवलंय. यातल्या कित्येक जणांनी कोरोनावर मात केलीये, तर काहींचा मृत्यू झाला. आता या व्हायरसवर तोडगा म्हणून जगभरात अनेक लसी विकसित करण्यात आल्यात.

या लसींमुळे कोरोना संक्रमणावर बऱ्यापैकी मात करण्यात मदत झाली, पण कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटमुळे संक्रमण अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये. आता सुद्धा जेव्हा परिस्थती पूर्वपदावर आली असं वाटलं तेव्हा कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरियंटनं डोकं वर काढलयं. ज्यामुळे कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ व्हायला लागलीये. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध लादण्यात आलेत.

पण कोरोनाच्या या अवघड परिस्थितीत महत्वाची भूमिका बजावली ती फ्रंट लाईन वर्कर्सने. म्हणजे आरोग्य कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी. कारण सरकारने लॉकडाऊन आणि नियम लादले खरे, पण ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली. जेव्हा सगळ्यांना आपापल्या घरात राहण्याची ताकीद दिली होती, तेव्हा पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरून नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करत होत.

कारण कडक लॉकडाऊन असून सुद्धा बरीच शहाणी मंडळी बिनाकारण रस्त्यावर उतरत होती, तेही मास्क न लावता. त्यावर पोलिसांच्या कारवाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. लोकांनी नियम पाळावेत म्हणून प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले होते.

दरम्यान आता सुद्धा महाराष्ट्रात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतोय, त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक निर्बध लादले असून मास्क अनिवार्य केला.पण तरी बरेच जण याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतायेत, अशातच पुणे पोलिसांचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात ते गाण्याच्या माध्यमातून लोकांना मास्क घालायचं आवाहन करतायेत. 

पोलिसांनी राज कपूरच्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातील ‘ए भाई जरा देख कर चलो’ या गाण्याचं रिमेक केलंय. या गाण्याला आवाज दिलाय पुणे पोलीस अधिकारी प्रमोद कळमकर यांनी. त्यांच्या गाण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जातोय आणि पोलिसांच्या कामाचे कौतुक केलं जातंय. 

पोलिसांच्या या चाहत्यांमध्ये अभिनेत्री करीना कपूर खानचा सुद्धा समावेश झालाय. करीनाला तिच्या आजोबांच्या गाण्यावर बनवलेले हे रिमेक फारचं आवडलंय. तिने सुद्धा या गाण्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने म्हंटले कि- ‘ब्रिलियंट गाणे’ 

या गाण्याला आपला आवाज देणारे पुणे पोलिस एएसआय प्रमोद कळमकर म्हणाले की,

‘तिसर्‍या लाटेत ओमिक्रॉनचा धोका सतत वाढतोय. तसं तर आम्ही हे गाणं आधीच म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच जनजागृतीसाठी रेकॉर्ड केलं होत, पण ते रिलीज केलं नव्हतं. पण आता जेव्हा तिसऱ्या लाटेचा प्रसार होतोय तेव्हा आम्ही ते रिलीज करण्याचा निर्णय घेतला.’

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा पुणे पोलिसांच्या गाण्याचा हा विडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलाय.

 प्रमोद यांनी दिलेल्या माहितीनुसार हे गाणं नचिकेत जोग यांनी लिहिले असून ओंकार केळकर यांनी त्याला म्युझिक दिलंय. ज्यांनंतर सगळ्यांच्यामते मी ते गाण्याचा निर्णय घेतला. लोक मास्क न लावता रस्त्यावरून फिरत आहेत, कोरोना वाढतोय, त्यामुळे लोकांना संदेश देण्यासाठी आम्ही हे गाणे रिलीज केले आहे.  गाण्यांच्या माध्यमातून आम्ही वेगळ्या पद्धतीने संदेश देण्याचे काम करत आहोत. आम्ही काही लोकांना घरात कोंडून ठेवू शकत नाही, पण मास्क घालून बाहेर पडलो, तर कोरोना टाळता येईल.

कळमकर पुढे सांगतात कि,

‘मला लहानपणापासून गाण्याची आवड होती.  मात्र, त्यासाठी मी कधीही प्रशिक्षण घेतलेले नाही.  याआधीही मी अनेक गाणी गायली आहेत, जी लोकांना खूप आवडली आहेत.  कळमकरांचे हे गाणे पुणे पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे.  आता तो खूप व्हायरल होत आहे.  करीना कपूरची पोस्ट केल्यानंतर तीन लाखांहून अधिक लोकांनी ते पाहिलंय आणि त्यावर मजेशीर कमेंट येतायेत.

दरम्यान, कोरोनाच्या काळात देशभरातल्या पोलीस प्रशासनाकडून जनजागृतीसाठी असे अनेक उपक्रम राबवण्यात आले होते. जेणेकरून नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावेत. त्याला प्रतिसादसुद्धा भरभरून मिळाला. त्यामुळे भिडू आपली सुद्धा एक रिक्वेस्ट आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतोय, त्यामुळे शक्य होईल तेवढं घराबाहेर पडणं टाळा आणि बाहेर पडला तरी मास्क सोबत घेणं काही विसरू नका.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.