PVR मल्टिप्लेक्स कंपनी रितेश देशमुख यांच्या मालकीची आहे?

लातूरकरांना आपल्या गावातल्या उड्डाणपुला पासून ते इडली चटणी पर्यंत प्रत्येक गोष्टीचं कौतुक असते. का असू नये? पण या प्रादेशिक अस्मितेतून पुण्यात आलेला लातूरकर आणि इतर अशा मॅचेस रंगलेल्या पाहायला मिळतात.

असाच एक वाद मल्टिप्लेक्सवर घसरला आणि रागाच्या भरात एक लातूरकर भिडू बोलला,

“एवढं तुम्ही पुण्याचं कौतुक करताव पण तुमच्या पुण्यात PVR मल्टीप्लेक्स नव्हता त्याच्या आधीपासून आमच्या लातुरात आहे.”

खरंच भारतातल्या मल्टीप्लेक्समध्ये सर्वात प्रीमिअर समजला जाणारे हे PVR मल्टिप्लेक्स फक्त दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरात असायचे.

त्याकाळात पुण्याच्याही आधी हे थिएटर लातूर मध्ये सुरू झालं होतं.

आम्हाला त्या दिवशी लातूरच्या भिडून क्लीन बोल्ड केलं. असाच त्याचा चांगला मूड बघून त्याला खुलवला आणि लातुरात PVR कसा हा प्रश्न विचारला, तर भिडू म्हणाला,

“कारण PVR ही कंपनीच मुळात आमच्या देशमुखांची आहे.”

गड्यांन बरेच किस्से रंगवून सांगितले, त्यात विलासराव मुख्यमंत्री असताना लातूरच शांघाय करायचं म्हणून त्यांनी कसा विकास केला आणि याच विकासातून मल्टिप्लेक्स उभारला याची माहिती दिली.

कस रितेश भैय्या लातूरच्या मल्टिप्लेक्सचे आर्किटेक्ट होते आणि बिल्डिंग उभारताना चूक झाली, अजूनही ही बिल्डिंग गंडलेली आहे याच रसभरीत वर्णन केलं.

एकूण काय तर PVR थिएटरचे मालक रितेश देशमुख आहेत यावर प्रत्येक लातूरकराची खात्री आणि अभिमान आहे.

आम्ही आता लॉकडाऊन मध्ये वेळ आहे म्हणून माहिती घेतली. तर PVRचे मालक कोण वेगळेच आढळले.

त्यांचं नाव अजय बिजली.

ते मूळचे दिल्लीचे. बिजली यांच्या वडीलांचा अमृतसर ट्रान्सपोर्ट नावाचा मोठा परंपरागत बिजनेस होता. घरची परिस्थिती चांगली होती.

वडिलांना सिनेमाचा शौक होता, त्यांनी 1978 साली दक्षिण दिल्लीच्या वसंत विहार मध्ये एक थिएटर विकत घेतलं होतं, त्याच नाव प्रिया लव्ह विकास थिएटर.

अजय बिजली यांना देखील सिनेमाच वेड होतं.

लहानपणापासून रात्रंदिवस आपल्या थिएटरमध्ये लागोपाठ शो बघत तो बसायचा. कॉलेज झाल्यावर मात्र त्याच्या वर ट्रान्सपोर्टच्या बिजनेस ची जबाबदारी टाकण्यात आली.

पण रोजचे जाणारे ते हजारो ट्रक त्यावरचा माल याची बोरिंग माहिती सांभाळून तो कंटाळला होता. एक दिवस धाडस करून घरच्यांना सांगितलं की मला हे आवडत नाही. अखेर त्याला प्रिया थिएटरची जबाबदारी देण्यात आली.

तरुण अजयच पहिलं प्रेम हे थिएटर होत.

1988सालीत्याने अमेरिकेतल्या थिएटरच्या धर्तीवर प्रियाच रिन्यूएशन केलं. डॉल्बी साउंड सिस्टीम आणली, आतलं इंटेरिअर सुद्धा स्टायलिश केलं. ठरवून फक्त हॉलिवूड सिनेमे तो प्रिया मध्ये रिलीज करू लागला.

अशातच नव्वदच्या दशकात आलेल्या जागतिकीकरणाचा देखील त्याने बराच फायदा उठवला. प्रिया हे दिल्लीतल सगळ्यात फेमस थिएटर बनलं होतं.

त्याच्या आजूबाजूला मॅकडोनाल्डस, अर्चिज असे शॉप सुरू झाले. हायफाय पब्लिकला तिथे जाण्यात अभिमान वाटायचा. पण बिजली यांना या व्यवसायात म्हणावा तितका फायदा होत नव्हता.

अशातच वडील वारले आणि अजय वर खूप मोठी जबाबदारी पडली.

संकटाच्या काळातच माणूस अधिक कणखर होतो अस म्हणतात. अजय बिजली ने असच एक मोठं धाडस करायचं ठरवलं.

ऑस्ट्रेलियामध्ये व्हिलेज रोडशो नावाची एक मीडिया कंपनी आहे, त्यांच्याशी करार करून भारतात मल्टिप्लेक्स थिएटरची साखळी सुरू केली,

नाव होतं प्रिया व्हिलेज रोडशो उर्फ PVR.

१९९७ साली दिल्लीमध्ये भारतातला पहिला मल्टिप्लेक्स उभा राहिला. एकाच ठिकाणी चार थिएटर, एकाच दिवसात 24 शो, जबरदस्त मुव्ही एक्सपिरियन्स हे दिल्लीकर पहिल्यांदाच अनुभवत होते.

PVR ला प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला. या प्रतिसादामुळे बिजली यांनी खूप मोठेमोठे प्रोजेक्ट सुरू केले. जवळपास 100 कोटी रुपये गुंतले होते आणि अचानक ९/११ चा न्यूयॉर्कमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि ऑस्ट्रेलियन व्हिलेज रोड शो या कंपनीने भारतातून काढता पाय घेतला.

Mr. Ajay Bijli Chairman and Managing Director PVR Ltd..

अजय बिजली यांच्यावर आभाळ कोसळले. त्यांच्या कडे हे सगळे प्रोजेक्ट चालवायला पैसे नव्हते. अशातच एअरटेलचे मालक सुनील मित्तल यांच्या सल्ल्याने आयसीआयसीआय बँकेने त्यांना मदत केली.

वाजपेयी यांच्या सरकारने 5 वर्षांची करातून सूट दिल्यामुळे भारतात मल्टिप्लेक्सच्या धंद्याला बराच मोठा फायदा झाला.

अशातच PVR चे आयपीओ सर्वसामान्यांना खुले झाले. अजय बिजली यांना जवळपास 250 कोटी त्यांना शेअरमार्केटमधून उभे करता आले. PVR भारतातल्या छोट्या मोठ्या शहरात उभे राहू लागले.

आता सिनेमा निर्मिती क्षेत्रातही त्यांनी प्रवेश केलाय. आमिर खानच्या घरच्या तारे जमी पर, जाने तू या जाने ना या सिनेमाच्या प्रोड्युसरमध्ये PVR च देखील नाव आहे.

सध्या PVRचे भारतभरात ९०० पेक्षाही जास्त स्क्रीन आहेत. हजारो कोटींचा बिजनेस आहे. अंबानी वगैरे मार्केटमध्ये येऊनही भारतातील सर्वात मोठा मल्टिप्लेक्स ब्रँड PVR हाच आहे.

आता विषय राहिला रितेश देशमुख यांच्या मालकीचा.

तर PVR मध्ये देशमुख कुटुंबाचा कोणताही सहभाग नाही. विलासराव मुख्यमंत्री असताना त्यांनी जिद्दीने आपल्या शहरात मल्टिप्लेक्स सुरू करून दाखवलं या पलीकडे त्यांचा या कंपनीशी संबंध होता असे वाटत नाही.

पण तरीही लातूरमध्ये चर्चा असते की मराठवाड्यातील PVR ची फ्रेंचायजी रितेश देशमुख यांच्या मालकीची आहे. बऱ्याचदा रितेश देशमुख यांच्या सिनेमाचे प्रीमिअर शो लातूरच्या मल्टिप्लेक्स मध्ये आयोजित होतात.

रितेश स्वतः देखील तिथे हजर असतो पण तो लातूरकरांच्या प्रेमापोटी तिथे येतो. याव्यतिरिक्त बाकीच्या सगळ्या या अफवाच असतात.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Swapnil says

    तुझे मेरी कसम व्यतिरिक्त रितेश त्याच्या कुठ्ल्याही सिनेमाच्या प्रिमीयरला लातूरमध्ये उपस्थित नव्हता.

Leave A Reply

Your email address will not be published.