केंद्र आणि राज्याच्या राड्यात गडकरी हिरो ठरलेत..

महाराष्ट्राच्या वाट्याला कमी लसी आल्या आहेत, केंद्रानं लसीचा पुरवठा नीट करावा. केंद्र सरकारनं ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करावा. केंद्रानं राज्याच्या रेमडीसीवीर इंजेक्शनचा प्रश्न सोडवावा.

हि सगळी स्टेटमेन्ट आहेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची.

त्यावर राज्यातल्या भाजपच्या सगळ्या नेत्यासह विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, प्रकाश जावडेकर या सगळ्यांची उत्तरं म्हणजे,

राज्यांन केंद्राकडे बोट दाखवू नये, महाराष्ट्रानं राजकारण करू नये, केंद्र राज्याला संपूर्ण सहकार्य करत आहे.

मागच्या महिन्याभरापासून केंद्र आणि राज्यामध्ये असा हा सगळा राडा सुरु आहे. आरोग्य आणीबाणीत देखील एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं सुरु आहे. राज्य केंद्राकडे बोट दाखवतेय, केंद्र राज्यावर आरोप करत आहे. यात कोण राजकारण करत हे ओळखण्याच काम सुज्ञ जनता व्यवस्थित पार पाडत आहे.

पण दुसऱ्या बाजूला या काळात सुरु असलेल्या राड्यात न पडता शांतपणे काम करणारं एक नाव मात्र सातत्यानं हिरोच्या भूमिकेत समोर येत आहे.

हे नाव म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं.

राज्य आणि केंद्र अशा कोणत्याही वादात न पडता गडकरींनी मागच्या महिन्याभरापासून कोरोनाच्या परिस्थितीवर कोणाकडेही बोट न दाखवता फक्त कामाचा आणि मदतीचा सपाट लावला आहे. नागूपरात अगदी टेस्टिंग पासून, बेड, रेमडीसीवर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा सगळ्या आघाड्यांवर त्यांनी कुठून न कुठून मदत उभी केली आहे.

केंद्रीय मंत्री म्हणून आपला शब्द वापरून, प्रसंगी आपली वैयक्तीक ओळख वापरून ते रुग्णांच्या गरजांची पूर्तता करत आहेत. या सगळ्या कामाचा घेतलेला आढावा…. 

१. नागपूरमधील रुग्णांना बेडसाठी हेल्पलाईन :

८ एप्रिलला नितीन गडकरी यांनी नागपूरमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत ज्या रुग्णांना बेड मिळण्यात अडचणी येत आहेत अशांसाठी आपल्याच कार्यालयातून त्यांनी एक २४*७ हेल्पलाईन सुरु केली. यासाठी सागर कोतवालीवाले आणि जयंत दीक्षित यांचे मोबाईल नंबर प्रसिद्ध करून नागपूरकरांना तात्काळ संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या.

२. निवृत्त डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत येण्याचं आवाहन : 

नागपूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील जे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी सेवा देऊन निवृत्त झाले आहेत अशांना पुन्हा सेवेत येण्यासाठी गडकरींनी आवाहन केले. त्यासाठी नागपूरच्या महापालिका आयुक्तांना स्पष्ट सूचना देत अर्ज स्वीकारण्यास सांगितले. मानधनाची अपेक्षा असेल, नसेल पण सेवेत या असं म्हणतं गडकरींनी आरोग्य व्यवस्थेचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

३. सन फार्मा कडून १० हजार रेमडीसीवीर : 

राज्यांप्रमाणेच नागपूरमध्ये देखील रेमडीसीवीर इंजेक्शन कमी पडत होते. त्यासाठी १० एप्रिल रोजी नितीन गडकरी यांनी थेट सन फार्माचे मालक दिलीप संघवी यांना फोन करत नागपूरमध्ये १० हजार इंजेक्शनची तरतूद केली. त्यानंतर त्यांच्याकडून नागपूरमध्ये तात्काळ ४९०० तर विदर्भात ५०० इंजेक्शन पोहोच झाली. सोबतच पुढच्या ३ ते ४ दिवसात उर्वरित पोहोच होतील असं सांगण्यात आलं.

४. मायलन कडून ४ हजार रेमडीसीवीर : 

दोन दिवसात गडकरी यांनी रेमडीसीवीरसाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरु केले. त्यांनी मायलन/’व्हिटारीस इंडीया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी संपर्क करून आणखी ४ हजार रेमडीसीवीर इंजेक्शनची तरतूद केली. पुढची खेप देखील लवकरच येईल असं आश्वासन देण्यात आलं.

५. दोन्ही कंपन्यांकडून मिळालेली इंजेक्शन विदर्भात इतर जिल्ह्यात वितरित करण्याचे निर्देश :

सन फार्मा आणि मायलनकडून मिळालेली इंजेक्शन फक्त नागपूर पुरते मर्यादित न ठेवता विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील वितरित करण्याचे निर्देश गडकरींनी नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिले.

६. पेटंट कायद्यातील सुधारणांसाठी पंतप्रधानांना पत्र :

१३ एप्रिल रोजी रेमडीसीवीर इंजेक्शन आणि औषधांची कमतरता भासू नये यासाठी ‘पेटंट एक्ट’मधील सेक्शन ८४ शिथिल करण्यासाठी नितीन गडकरी यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवत उत्पादन क्षमता वाढवण्याची मागणी केली.

दुसऱ्याच दिवशीच पंतप्रधानांनी यावर विचार करत रेमडीसीवीर इंजेक्शन बनवणाऱ्या ७ कंपन्यांना १० लाख प्रतिमहिना उत्पादन क्षमता वाढवण्याची परवानगी देण्यात आली.

७. नागपूर एम्समधील बेड वाढवण्यात यश :

१५ एप्रिल रोजी नागपूर एम्स’च्या डायरेक्टर डॉ. विभा गुप्ता, डॉ. गिरीवार यांच्यासोबत बैठक घेत तिथले बेड वाढवण्याच्या सूचना दिल्या. दुसऱ्याच दिवशी इथल्या बेडची संख्या ६० वरून ५०० करण्यात आली.

८. नागपूरच्या कँसर इन्स्टिट्यूटमध्ये १०० बेडची तरतूद :

नागपूरमधील कँसर इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनासाठी अतिरिक्त १०० बेड वाढवण्यात येऊन ते रुग्णांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले. सोबतच जे रुग्णालय अतिरिक्त बेडची मागणी करतील त्यांना २४ तासात परवानगी देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

९. ऑक्सिजन आणि रेमडीसीवीरच उत्पादन विदर्भांतच. 

१५ एप्रिल रोजी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासोबत बैठक घेत विदर्भातच मोठ्या प्रमाणावर रेमडीसीवीर इंजेक्शनची निर्मिती करणे आणि हिंगणा एमआयडीसीत ताबडतोब ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

त्यानुसार गडकरींनी स्वतः चार दिवस सात्तत्यानं पाठपुरावा करून वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सला परवानगी मिळवून दिली. हि कंपनी आता प्रतिदिवस ३० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देणार आहे.

१०. नागपूरमध्ये चाचण्यांसाठी २ मोबाईल व्हॅन :

नागपूरात आरटीपीसीआर चाचण्या तातडीने व्हाव्यात यासाठी गडकरींनी ‘स्पाईस जेट (हेल्थ) ‘चे मालक अजय सिंह यांच्याशी चर्चा करून आरटीपीसीआर टेस्टसाठी नागपूरला दोन मोबाईल चाचणी लॅब देण्याची विनंती केली.

‘स्पाईस हेल्थ’ने ही विनंती मान्य करत तात्काळ मोबाईल टेस्ट लॅब नागपूरला पोहच केल्या. त्यामुळे एका लॅबमध्ये ३५० रुपयांत प्रति दिन ३००० लोकांच्या करता येऊ शकत आहेत.

११. विविध कंपन्यांशी चर्चा करून व्हेंटीलेटर्स उपलब्ध : 

नागपूरातील रुग्णालयांमध्ये असलेली व्हेंटिलेटर्स मशीनची कमतरता लक्षात घेता गडकरींनी सीएसआर फंडातून विशाखापट्टणमच्या ‘एमटीझेड’द्वारे निर्मित व्हेंटिलेटर मशिन्स नागपूरकरांसाठी उपलब्ध करून दिली.

सोबतच स्पाईस हेल्थचे मालक अवनी सिंह यांच्याशी चर्चा करून १२५ व्हेंटिलेटर्स एका दिवसात उपलब्ध करून दिले.

१७ एप्रिल रोजी गडकरींकडून नागपूरच्या दंदे हॉस्पिटलला ५ व्हेंटिलेटर भेट देण्यात आले.

त्यानंतर चेन्नईच्या फिनिक्स मेडिकल सिस्टिम कंपनीला सीएसआर फंडच्या माध्यमातून ५०० व्हेंटिलेटर्सची ॲार्डर दिली.

१२. २ हजार ऑक्सिजन कॅान्सन्ट्रेटर

नागपूरमधील रुग्णालयांत ऑक्सिजनची वाढती कमतरता लक्षात घेऊन गडकरींनी सीएसआर फंडमधून विशाखापट्टणमच्या AMTZ मधून दोन हजार ऑक्सिजन कॅान्सन्ट्रेटर मागवले. 

१३. १५७ मेट्रिक टन ऑक्सिजनची तरतूद : 

विशाखापट्टणम, भिलाई, वर्धा जिल्ह्यातील लॉयड स्टील, उत्तम गल्व्हा,  भंडारा जिल्ह्यातील सनफ्लॅग या कंपन्यांशी सातत्याने चर्चा करून गडकरींनी नागपूरला जवळपास १५७ मेट्रिक टन ऑक्सिजनची तरतूद केली आहे.

गडकरींच्या प्रयत्नांतून सज्जन जिंदल यांनी २० टन प्राणवायू वहन क्षमता असलेले दोन टॅंकर्स पूर्ण वेळ नागपूरसाठी दिले आहेत. या टॅंकर्समुळे ‘भिलाई स्टील प्लांट’मधून रोज ४० टन ऑक्सिजन नागपूरला येत आहे.

१४ : युट्युब कडून मिळालेले १० हजार कोरोना रुग्णांसाठी : 

यूट्यूबवर व्हिडीओ मोठ्या संख्येने पाहिले जाऊ लागले की, यू ट्यूबकडून त्या व्यक्तीला मानधन स्वरूपात काही रक्कम दिली जाते. गडकरी यांच्या व्हिडीओंना लाखोंच्या संख्येनं व्हू असल्यामुळे त्यांना यू ट्यूबकडून १० हजार रुपयांची रक्कम नुकतीच प्राप्त झाली. ती त्यांनी कोरोना रुग्णांसाठी महापौर निधीला दिली.

या माध्यमातून मिळणारी सर्व रक्कम आपण समाजासाठी वापरणार आहोत, असे गडकरी यांनी घोषित केले.

१५. विविध संस्थांकडून आर्थिक आणि साहित्याची मदत :

नितीन गडकरी यांच्याकडून विविध संस्थांना मेडिकल सुविधांसाठी आर्थिक मदत देण्याचे आवाहन करण्यात आलं होत. त्यानुसार राजेश अग्रवाल यांनी १५ लाख, आदित्य अनघा मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्टाफ वेलफेअर फंडमधून ११ लाख रुपयांची मदत केली.

सोबतच प्रसिद्ध उद्योजक नितीन खारा यांनी एक हजार ऑक्सिजनचे सिलेंडर दिले. तसेच मालवाहतूक क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक प्यारे खान यांनी ५० लाखांची मदत केली आहे. इतकच नाही तर गडकरी यांचे चिरंजीव व उद्योजक निखिल गडकरी यांनी देखील त्यांच्या समूहातर्फे पन्नास लाखांची मदत दिली.

१६. खाजगी स्वीय सहाय्यकाचा जीव वाचवण्यासाठी अर्ध्या रात्री बँक उघडून ३५ लाखांची मदत : 

अलीकडेच नितीन गडकरी यांचा एक हळवा अनुभव जगासमोर आला होता. त्यांचे खाजगी स्वीय सहाय्यक अतुल मंडलेकर यांची कोरोनामुळे प्रकृती बिघडल्यानंतर त्यांचे प्राण वाचवण्यासाठी गडकरींनी रात्री बँक उघडायला लावली. त्यातून ३५ लाख रुपये काढून स्वीय सहायकाला हवाई रुग्णवाहिकेने चेन्नईला हलवले आणि त्यांचा जीव वाचवला होता.

हि सगळी काम बघितल्यानंतर नंतर कळत कि नागपूरमध्ये रेमडीसीवीर, ऑक्सिजन अशा गोष्टींची कमतरता असल्याच्या बातम्या अलीकडच्या काही दिवसात का येत नाहीत. त्यामुळेच राजकारणाच्या राड्यात नितीन गडकरी हिरो ठरलेत.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.