उपमुख्यमंत्री असूनही आबा आपल्यापेक्षा जेष्ठ नेत्यांसाठी खुर्चीतुन उठून उभे राहायचे…

राज्याच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्राचे सतत्याने प्राबल्य राहिले दिसून येतं आणि त्यातही सांगली जिल्ह्याच जरा जास्तच. कारण एकावेळी सहा मंत्री राज्याच्या मंत्रीमंडळात एकट्या सांगली जिल्ह्यातुन यायचे. यात जयंत पाटील, पतंगराव कदम, आर.आर. पाटील अशा दिग्गजांचा समावेश असायचा. त्यामुळे एकेकाळी जिल्ह्यात आमदार ८ आणि मंत्री ६ अशी वजनदार परिस्थिती असायची.

मात्र या ६ मंत्र्यांमध्ये सर्वाधिक चर्चा असायची ती आर. आर. पाटील आणि पतंगराव कदम यांच्या मैत्रीची.

आपापसात भांडणं होऊन स्वतंत्रपणे निवडणुका लढल्यानंतर १९९९ साली अखेरीस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केलं. १९९९ साली आर. आर. पाटील सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. तर आबांच्या तासगाग मतदारसंघाला लागूनच पतंगराव कदम यांचा त्यावेळचा भिलवडी-वांगी मतदारसंघ होता. ते देखील तिथून तिसऱ्यांदा निवडून आले होते.

पतंगराव कदम आणि आर.आर. पाटील दोघे पण जरी तिसऱ्यांदा आमदार झाले असले तरी पतंगराव कदम आबांना बरेच वरिष्ठ होते. त्यामुळे त्यांचं तर मंत्रीपद निश्चीत होते.

झाले देखील तसेच. पतंगरावांकडे ‘उद्योग’ खातं आलं.  सोबतच अनेकांना आश्चर्यचकीत करत आर.आर. आबांची देखील पहिल्यांदाच थेट कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागली. आबांकडे ‘ग्रामविकास, पाणीपुरवठा, स्वच्छता’ असं मंत्रालय आलं.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान अशा अभिनव योजना आबांनी याच काळात आणल्या. ग्रामविकास विभागातील त्यांच्या कामाची थेट युनेस्कोपर्यंत दखल घेतली गेली.

विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरळीतपणे चालू होता. मात्र पुढे जेव्हा तत्कालीन गृहमंत्री व उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना डिसेंबर २००३ मध्ये राजीनामा द्यावा लागल्यानंतर शरद पवारांनी आबांना मंत्रिमंडळातील थेट दुसऱ्या क्रमांकाच्या महत्त्वपूर्ण अशा ‘गृह’ खात्याची जबाबदारी दिली. पुढे २००४ साली आबा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देखील झाले. शिवाय त्याचवेळी आबा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पण झाले. त्यामुळेच २००४ ते २००८ हा काळ म्हणजे आबांच्या राजकीय कारकिर्दीमधील सर्वोच्च यशाचा काळ होता.

२००४ साली पतंगरावांना ‘सहकार’ हे काँग्रेसकडे असणाऱ्या खात्यांपैकी ‘महसूल’ च्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर असलेलं  खात्याची जबाबादारी मिळाली.

आबा उपमुख्यमंत्री झाल्यावर आपोआपच प्रोटोकॉलनुसार मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आले. त्यामुळे सहाजिकच आबा आता पतंगरावांचे वरिष्ठ झाले होते.

इकडे आपल्या एखाद्या कामाचा पाठपुरावा करण्याची पतंगरावांची पद्धत वेगळी होती. ते ज्या मंत्र्यांकडे काम असेल त्यांना थेट त्यांच्या दालनात जाऊन भेटत असत. त्यामुळे अनेकदा त्यांना आबांकडे पण जावं लागायचं. पतंगराव कदम दालनात आल्यावर आबा पतंगरावांचा आदर म्हणून उठून उभे राहायचे. त्यावर पतंगराव त्वरीत म्हणायचे,

“अरे आर. आर., तू आता माझा सीनिअर आहेस. तू असा उभारलास तर लोक काय म्हणतील?”

मात्र ऐकतील ते आबा कसले? आबा पतंगरावांना हाताला धरून थेट स्वत:च्या खुर्चीत बसवायचे, आणि अगदी जिव्हाळ्याने म्हणायचे,

“साहेब, तुम्ही माझ्यासाठी कायमच ज्येष्ठ राहणार आहात; तो तुमचा मानच आहे,”

एकूणच काय तर दोघांची केवळ तोंडदेखली मैत्री नव्हती. त्यांच्या रोजच्या वागण्यातुन पण ती दिसून यायची. जाहिर सभांमधून पण ही मैत्री जाणवायाची. दोघे एकमेकांना कोपरखळी मारण्याची एकही संधी दोघेही सोडत नसत.

दोघांच्या मैत्रीचा असाच एक किस्सा एकदा सांगलीतील एका जाहिर सभेत घडला होता.

त्या जाहिर सभेत बोलताना पतंगरावांनी नेहमीप्रमाणे आबांचा उल्लेख “माझा धाकटा भाऊ” असा केला.. तर त्याला उत्तर देताना लगेचच आपल्या भाषणात आबा म्हणाले,

“साहेब, तुम्ही नुसतं सारखं सारखं मला धाकटा भाऊ वगैरे म्हणता; पण लोकांना काही हे पटत नाही. लोकांची खात्री पटवण्याचा एकच मार्ग आहे, तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीची अर्धी वाटणी करून ती माझ्या नावावर करा. नाहीतर हे प्रेम वरवरचे आहे असेच लोकांना वाटेल. “

आबांच्या त्या हजरजबाबीपणावर खुद्द पतंगरावांसकट उपस्थित सर्वांनी खळखळून हसत दाद दिली होती. पुढे या दोन्ही मित्रांनी जगाचा अकाली निरोप घेतला. २०१५ साली आबांचे तर २०१८ साली पतंगरावांचे निधन झाले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.