रघुराम राजन यांच्या वडीलांना राजीव गांधीनी अपमानस्पदरित्या ‘रॉ’ मधून काढून टाकलं होतं
१९६८ साल. अमेरिका रशिया यांच्यातील शीत युद्ध ऐन भरात होतं. त्यांच्यातील स्पर्धेमुळे जग दोन हिस्स्यात विभागलेलं होतं. पण ही लढाई युद्धभूमीत खेळली जात नव्हती. तर हे शीतयुद्ध मुख्यतः गुप्तहेर खात्याच्या स्पाय लोकांनी लढल.
याच शीत युद्धाचा परिणाम म्हणून भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रॉ ची स्थापना केली.
रामेश्वरनाथ काव यांना सर्वाधिकार देण्यात आले. त्यांनी आपली टीम उभी केली जिला काव बॉयज म्हणून ओळखतात. इंग्लिश सिनेमामध्ये जसा जेम्स बॉंड MI6 टीमचा भाग असतो तशीच ही भारतीय टीम होती. यातला प्रत्येक ऑफिसर भारतातल्या आर्मी व पोलीस खात्यातून खास निवडला होता.
अत्यंत चलाख, पराक्रमी आणि निडर सर्वात महत्वाचे म्हणजे प्रखर देशप्रेमी अशी ही काव बॉयजची टीम होती.
याच टीममध्ये होते आर गोविंदराजन. १९५३ च्या आयपीएस बॅचचे टॉपर.
अगदी सुरवातीच्या काळापासूनच त्यांची नेमणूक गुप्तचर खात्यात झाली होती. रॉ मध्ये येण्यापूर्वी ते इंडोनेशियामध्ये डिप्लोमॅट ऑफिसमध्ये होते. खर तर त्यांची ती नेमणूक तिथे अंडरकव्हर ऑफिसर म्हणून झाली होती.
मात्र याच दरम्यान तिथे राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांच्या विरुद्ध सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न झाला होता.
तो काळ गोविंदराजन यांच्यासाठी कसोटीचा होता. घराबाहेर प्रचंड गोळीबार चालू असायचा. लाखो लोकांचे खून होत होते. अशा वेळी तिथे असलेल्या भारतीयांचे प्राण वाचवण्याच महत्वाच काम या गोविंदराजन यांनी केल होतं. त्यावेळी त्यांचं अख्खं कुटुंब त्यांच्या सोबत इंडोनेशिया मध्ये होतं. यात त्यांचा अवघा तीन वर्षाचा मुलगा देखील होता.
तोच मुलगा पुढे मोठा झाल्यावर सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष बनला. त्याच नाव रघुराम राजन.
रघुराम राजन सांगतात मला अनेक वर्ष माहितच नव्हत कि आपले वडील काय काम करतात. सर्वांच्या आईवडिलांप्रमाणे तेही नोकरी करतात एवढ ठाऊक होतं पण ते महिनोंमहिने गायब असतात आणि त्या काळात आई त्यांच्या काळजीने रात्ररात्र रडत असते एवढच कळायचं.
पुढे रॉच्या स्थापनेनंतर सत्तरच्या दशकात काव आणि गोविंदराजन यांच्या टीमने अनेक मोठे मोठे सिक्रेट मिशन पार पाडले. बांगलादेशला पाकिस्तानपासून अलग करण्यात याच काव बॉयजचा सिंहाचा वाटा आहे. गोविंदराजन यांनी श्रीलंका, बेल्जियम अशा अनेक देशात रॉसाठी काम केल.
इंदिरा गांधीनी या टीमला खूप स्वातंत्र्य दिल होतं. काव यांच थेट रिपोर्टिंग पंतप्रधानांना असायचं.
पण इंदिराजींच्या नंतर आलेल्या मोरारजी देसाईयांनी रॉच महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला. आणीबाणीमध्ये झालेल्या दुष्कृत्यामध्ये काव यांच्या टीमचा देखील हात होता का याची चौकशी झाली. पण इंदिराजींच्या पुनरागमनानंतर रॉची अर्धवट राहिलेली मिशन परत सुरु झाली.
१९८४ साली जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान बनले तेव्हा त्यांनी रॉला अत्याधुनिक करण्यावर जोर दिला. संगणक आणले.
इंदिरा गांधी यांच्या काळात होत त्याही पेक्षा जास्त लक्ष रॉ कडे दिल गेलं.
या काळात पंजाबमधील दहशतवाद त्याच्या चरणसिमेवर होता. आसाम मध्ये बांगलादेशी घुसखोरांमुळे परिस्थिती चिघळली होती. काश्मिरमध्ये अशांतता वाढत होती. दक्षिणेतही तमिळभाषिकांच आंदोलन तीव्र झाल होतं. यासर्वांतून आपल्याला रॉच बाहेर काढेल अशी खात्री राजीव गांधीना होती.
इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर सहानुभूतीच्या लाटेत अगदी कमी वयात पंतप्रधान बनलेल्या राजीव गांधीना देशभरात प्रचंड बहुमत मिळालेलं होत. त्यांची इमेज स्वच्छ होती. देशाला नव्या सहस्त्रकात नेताना विकासाच स्वप्न त्यांनी दाखवलेलं.
याला पहिला धक्का बसला बोफोर्स घोटाळ्यामुळे.
चौफेर उधळलेले राजीव गांधींचे वारू या घोटाळयामुळे अडखळले. त्यांच्या स्वच्छ इमेजला तडा गेला. त्यांची पत्नी सोनिया गांधी यांच्या माहेरी इटलीला त्यांच्या आप्तस्वकीयांना फायदा करून देण्यासाठी हा घोटाळा घडवून आणला अशी चर्चा झाली. आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आणि तोही देशाच्या संरक्षणदलाच्या खरेदी संदर्भात झाल्यामुळे राजीव गांधी यांच्या विरुद्ध देशभर निगेटिव्ह वातावरण झाले.
याच काळात रॉचे तेव्हाचे प्रमुख एस.ई.जोशी निवृत्त होत होते आणि सिनियोरीटीच्या नियमानुसार नंबर होता गोविंदराजन यांचा. मात्र राजीव गांधीनी त्यांना डावलून ए के वर्मा यांची निवड केली. अस सांगितल गेल की,
गोविंदराजन यांनी बोफोर्स प्रकरणाची चुणूक लागूनही ही गोष्ट पंतप्रधानानां सांगण्यास हलगर्जीपणा केला होता.
हाच राग मनात ठेवून राजीव गांधीनी त्यांना रॉमधून दूर केले. पुढचे चार महिने ते चेन्नईमध्ये आपल्या घरीच होते. त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी दिली नव्हती.
रघुराम राजन यांची आई मैथिली यांनी सांगितलं की, तो काळ आमच्या साठी खूप दुःखद होता. देशासाठी माझ्या पतीने एवढी वर्ष प्राण पणाला लावले, आपल्या कष्टाने रॉ उभी केली मात्र तिथून त्यांना काढण्यात आलं. अखेर, कित्येक अपमानास्पद चौकशीना सामोरे गेल्यानंतर त्यांची सेवानिवृत्तीपूर्वी संयुक्त गुप्तचर समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.
अगदी हीच वेळ रघुराम राजन यांच्यावरही आली होती. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम पाहात असताना त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अनेक गोष्टीत मतभेद झाले. याच राजकीय दबावामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते मोदी सरकारच्या अनेक निर्णयांवर टीका देखील करत आहेत. त्यातच रघुराम राजन हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यामुळे ते काँग्रेसमध्ये सहभागी होतील का अशी चर्चा सुरु आहे.
हे ही वाच भिडू
- राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेबद्दलच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का..?
- रघूराम राजन म्हणतायत भारताची अर्थव्यस्था सुधारायला या ‘डार्क स्टेन्स’वर काम करावंच लागेल
- थेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार आहे.’