ज्या घरात घरगडी होता त्याच घरमालकाच्या पोरीसोबत पिक्चरचा हिरो म्हणून झळकला 

कधी कुणावर कसे दिवस येतील हे सांगता येत नसतय भिडू. आत्ता हेच बघा इसाक मुजावर यांच एक पुस्तक आहे लकी अनलकी. या पुस्तकात सिनेमाच्या अनेक गंमतीदार गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. याच पुस्तकातली ही गोष्ट. 

मराठीतील जेष्ठ निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणजे मास्टर विनायक.

मास्टर विनायक त्या काळात कोल्हापूरच्या शाहूपूरीतील तिसऱ्या गल्लीत रहायला होते. इथे त्यांचा विनायक बंगला होता. काळ सरला आणि विनायक गेले. त्यांच्या मागोमाग हा बंगला देखील विक्रीस काढला. पण कोल्हापूरकरांनी विनायक बंगल्याच्या आठवणी जपल्या. KMT तून प्रवास करताना विनायक बंगल्याची जागा विनायक स्टॉप झाली जी आजही कायम आहे. 

तर या विनायक यांची मुलगी म्हणजे नंदा. जी पुढे जावून अभिनेत्री झाली. तेव्हा विनायक यांच्या घरात एक घरगडी होता. तो छोट्या नंदाला कडेवर घेवून फिरायचा. तिला शाळेत सोडायला जायचा. अनेकदा विनायक मुंबईला गेले की नंदा आणि पर्यायाने हा घरगडी देखील त्यांच्यासोबत मुंबईला जात असे. शिवाजी पार्कवर छोट्या नंदाला घेवून फिरायला जाणे हे घरगड्याचं काम होतं. 

वास्तविक हा घरगडी कम सिनेमातला एक्स्ट्रा कलाकार होता. पिक्चरमध्ये भूमिका करताना काहीतरी काम करावं म्हणून तो मास्टर विनायक यांच्या घरी घरगडी म्हणून काम करायचा. विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये काम करत असताना त्यांच विनायक यांच्या घरी घरगडी म्हणून काम फिक्स झालं. 

हे सगळं चालू असतानाच विनायक यांच्या गजाभाऊ या चित्रपटात या गड्याने काम केलं. त्यानंतरच्या काळात देखील तो लहानसहान भूमिका करत राहिला पण म्हणावा असा ब्रेक मिळाला तो १९५२ च्या राजा परांजपे यांच्या लाखाची गोष्ट या पिक्चरमधून.. 

कालचा घरगडी आज नायक बनला, आत्ता लोक या घरगड्याला त्याच्या नावाने म्हणजेच राजा गोसावी म्हणून ओळखू लागले. 

राजा गोसावी यांच नाव गाजू लागलं. १९५७ साली झालं गेलं विसरून जा नावाचा पिक्चर आला आणि त्यामध्ये राजा गोसावी यांची हिरोईन होती नंदा. तिच नंदा जिला घरगडी म्हणून लहानपणी अंगाखांद्यावर खेळवलं होतं. 

हे ही वाच भिडू 

 

1 Comment
  1. abhinavagupta benodekar says

    लाखाची गोष्ट पुण्याला प्रभात थिएटरला लागला ,अन त्याच सिनेमाची तिकिटे राजा गोसावी प्रभातच्याच बुकिंग विन्डोवर विकत होते .

Leave A Reply

Your email address will not be published.