रामाजी पांगेऱ्याने दाखवून दिले, मावळे मरणाला भिणारे नाहीत. चिमूटभरांनी परातभरांचा पराभव केला

मराठा स्वराज्यासाठी प्राण वेचणाऱ्या योध्यांचा इतिहास तसा बऱ्यापैकी सर्वज्ञात असतोच. पण या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांपैकी काही शूरांचा इतिहास आजही ज्ञात नाही.

यातलेच एक रामजी पांगेरा म्हणजे बऱ्यापैकी अंधारात असणारं हे व्यक्तिमत्त्व.

रामजी पांगेरा हे त्यांच्या आयुष्यातील २ मोठ्या लढायांसाठी ओळखले जातात. एक म्हणजे प्रतापगड युद्ध आणि दुसरं म्हणजे कण्हेरगड. प्रतापगडच्या युद्धात अफझलखानच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात वाघाने भयंकर थैमान घातल होत. त्यावेळी रामाजीने पराक्रमाची शर्थ केली. ते हे रामाजी पांगेरा कण्हेऱ्यापाशी होते. महाराजांनी त्यांचा पराक्रम आणि योग्यता जाणून त्यांच्यावर योग्य ती कामगिरी सोपवली होती.

इ.स. १६७० मध्ये महाराजांनी मुघलांबरोबर असणारा तह मोडून आपले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली होती. या वेळेस स्वराज्यात अगदी मोजके किल्ले होते एकूणच परिस्थिती अडचणीची होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार रामजी पांगेरा हे तेव्हा कण्हेरगड (कळवण, नाशिक) किल्ल्याच्या परिसरात होते.

कारण मुघलांच्या फौजा कधी स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता, त्यामुळे रामजी हे १००० मावळ्यांना सोबत घेऊन तेथील सपाटीच्या प्रदेशात तळ ठोकून होते. या धामधूमीत दिलेरखान पठाण हा औरंगजेबाचा खासा सरदार बुऱ्हाणपूराहून ३०००० सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून येत आहे ही बातमी रामजी यांना हेरांकडून समजली.

दिलेरखान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुराहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला. या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेले होते. त्यातीलच कण्हेरा गड या नावाचा डोंगरी किल्लामराठ्यांच्या ताब्यात होता. दिलेरखान हा कण्हेरा घेण्यासाठी सुसाट निघाला. दिलेर हा अत्यंतकडवा आणि हट्टी असा सरदार होता.

कण्हेऱ्याच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा रामजी पांगेरा शिलेदार अवघ्या सातशे मराठी पायदळा निशी तळ ठोकून होता. कारण मोगलांच्या फौजा केव्हा स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता. म्हणून ही सातशेची तुकडी गस्तीवर राहिली होती. रामाजी विलक्षण शूर होता.

एका पहाटेच्या प्रहरी रामजींना हेरांनी खबर दिली की,

औरंगजेबाचा खासा सरदार दिलेरखान पठाण भलं मोठं घोडदळ घेऊन कण्हेऱ्यावर चालून येत आहे. दिलेरची फौज खरोखरच मोठी होती.

रामाजीची फौज दिलेरच्या फौजेसमोर चिमूटभरच होती. खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामाजीने आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच आपल्या कण्हेरा गडावर जाऊन बसायला हरकत नव्हती. ते सोयीचे आणि निर्धास्त ठरल असत. पण ते आपल्या चिमूटभर मावळ्यांपुढे उभे राहीले.

रामाजी आपल्या लोकांच्या पुढे उभे राहिले आणि मोठ्या आवेशात गर्जले,

मर्दांनो, खानाशी झुंजायचंय, जे जातीचे असतील ते येतील. मर्दांनो लढाल त्याला सोन्याची कडी, पळाल त्याला चोळी बांगडी

असं बोलून रामाजीने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोक्यावरचं मुंडासही फेकल. अन् दोन्ही हातात हत्यारे घेऊन त्यांनी एकच हरहर केला. त्यांच्या अंगात जणू भवानीच संचरली होती. त्यांच्या मागोमाग अवघ्या सैन्याने ही हरहर महादेवची गर्जना केली.

मूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठी सैन्य भयभयाट करू लागले. अन् दिलेरखान आलाच. वणव्यासारखे युद्ध पेटले. रामजींच्या तलवारबाजीने दिलेरखान थक्कच झाला. दिलेरखानाला पुन्हा एकदा पुरंदरगड अन मुरारबाजी देशपांडा आठवला.

किल्ला लढवण्यासाठी शथीर्ची झुंज चालली होती. पण मराठ्यांचा आणि रामाजीचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता. अखेर हट्टी दिलेर हटला. त्याचं सैन्य वाट दिसेल तिकडे सैरावैरा पळत सुटले. दिलेरलाही माघार घ्यावी लागली.

रामाजी पांगेऱ्याने दाखवून दिले की ,

मराठ्यांचे मावळे मरणाला भिणारे नाहीत. चिमूटभरांनी परातभरांचा पराभव केला.

कण्हेरा गडाला दिलेरखानची सावलीही शिवू शकली नाही. अशी माणसं महाराजांनी मावळ मुलखातून वेचून वेचून मिळविली होती. त्यातलेच हे रामाजी पांगेरा. इतिहासाला त्यांचं घर माहीत नाही, त्यांच गाव माहीत नाही, त्याचा ठावठिकाणा माहिती नाही. त्यांचा पराक्रम मात्र माहिती आहे.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. भिवा करंगुटकर says

    रामजी पांगेरा यांचं गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाजवळ कोरजाई हे आहे. रामजींच्या आहुती नंतर, मालवण किल्ला बांधत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी त्यांच्या कुटुंबीयांना भेट दिली होती. (संदर्भ- श्रीमान योगी पुस्तक)

Leave A Reply

Your email address will not be published.