रामनाथ गोएंका यांनी आयडिया करून काँग्रेस अधिवेशनातून चोर पळवून लावले

एककाळ होता जेव्हा काँग्रेस पक्षाचे दरवर्षी भरणारे अधिवेशन म्हणजे मोठा उत्सव असायचा. महात्मा गांधी, सुभाषबाबू, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू अशा मोठ्या नेत्यांची भाषणे ऐकायला देशभरातले कार्यकर्ते अधिवेशनासाठी कानाकोपऱ्यातून गोळा व्हायचे.

स्वातंत्र्यलढ्याशी निगडित निर्णय व्हायचे, आंदोलनाची घोषणा व्हायची, धोरणात्मक गोष्टींवर चर्चा व्हायची. याच अधिवेशनातली भाषणे ऐकून इंग्रज सरकार हादरायचे.

पण पुढे हळूहळू परिस्थिती बदलू लागली. सत्ता आली तशी खुर्चीला चिकटणारे मुंगळे पक्षामध्ये भरती होऊ लागले. काँग्रेसच्या अधिवेशनात कार्यकर्त्यांच्या सोबतच हवसेगवसेनवसे गोळा होऊ लागले.

काँग्रेसचे हे दरवर्षी भरणारे अधिवेशन वेगळ्याच कारणांनी गाजू लागले ते म्हणजे “खिसेकापू”

अधिवेशन म्हणजे जत्रा असायची. पंतप्रधानांच्या पासून अगदी फाटक्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळे सहभागी व्हायचे. प्रचंड गर्दी असायचीब त्यात बरेचसे चोर पण असायचे. काँग्रेस नेत्यांच्या गरमागरम पाकीटावर त्यांचा डोळा असायचा. कित्येक कार्यकर्त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टी चोरी व्हायच्या.

अनेकांना परत घरी जाण्यासाठी देखील पैसे उरायचे नाहीत. काँग्रेससाठी ही नवीनच डोकेदुखी होऊन बसली होती.

अशावेळी १९५५ सालचे काँग्रेसचे आवडी अधिवेशन पार पाडण्याची जबाबदारी घेतली इंडियन एक्स्प्रेसचे मालक रामनाथ गोएंका यांनी.

मूळचे राजस्थानच्या व्यापारी समाजात जन्मलेल्या रामनाथ गोएंका यांचे मुख्य कार्यक्षेत्र मद्रास व तामिळनाडू हेच राहिले. अगदी लहान वयात त्यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव पडला. यातून ते काँग्रेसच्या आंदोलनाकडे आकर्षित झाले.

त्यांच्या इंडियन एक्स्प्रेस या वर्तमानपत्रातून राष्ट्रवादी भूमिका मांडली जात असे. चलेजावं आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

स्वातंत्र्याची घोषणा झाल्यावर रामनाथ गोएंका यांना कॉन्स्टिट्यूशन असेंम्बली मध्ये स्थान देण्यात आलं. ते खासदार बनले. सी. राजगोपालाचारी उर्फ राजाजी यांचे निकटवर्तीय असणाऱ्या गोएंका यांच्याशी खुद्द पंतप्रधान नेहरू तामिळनाडू विषयक प्रश्नावर चर्चा करून सल्लामसलत करत असत.

मद्रास उर्फ चेन्नई जवळील आवडी येथे काँग्रेसचे ६० वे अधिवेशन भरले होते. तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष ढेबर हे होते ते अधिवेशनाची प्रमुख जबाबदारी रामनाथ गोएंका यांच्या कडे सोपवली होती.

याच अधिवेशनात अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. काँग्रेसने याच अधिवेशनात अधिकृतरित्या समाजवादी विचारसरणी स्वीकारली.

गोएंका यांनी आजवरचे नेत्रदीपक अधिवेशन भरवून दाखवले होते. यावेळच्या कार्यक्रमात कोणताही गोंधळ झाला नाही, सगळं शिस्तबद्ध रित्या पार पडलं.

इतकंच नव्हे तर संपूर्ण अधिवेशनात एकाही माणसाचे पाकीट मारले गेले नाही.

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, मोरारजी देसाई या जेष्ठ नेत्यांनी रामनाथ गोएंका यांचे जाहीर कौतुक केले होते.

पुढच्या काळात काँग्रेसमध्ये फूट पडली तरी रामनाथ गोएंका नेहरूंची मुलगी इंदिरा गांधी यांच्या सोबत राहिले मात्र जेव्हा त्यांनी आणीबाणी लादली तेव्हा रामनाथ गोएंका आणि इंडियन एक्स्प्रेसने अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढा दिला.

डाव्या विचारांनी भारावून गेलेल्या इंदिराजींवर गोएंका यांनी टीकेची झोड उठवली. ते पुढे भारतीय जनसंघाच्या छायेत गेले.

एकदा महाराष्ट्र टाईम्सचे जेष्ठ संपादक गोविंद तळवलकर यांनी त्यांना आवडी अधिवेशन यशस्वी करण्याचे रहस्य विचारले. तेव्हा गोएंका यांनी त्यांची आयडिया सांगितली.

रामनाथजींनी त्याकाळी अधिवेशनाच्या अगोदर स्वयंसेवक पाहिजेत म्हणून वर्तमानपत्रात एक जाहिरात दिली होती.

या स्वयंसेवकांना अधिवेशन काळात दोन वेळचे जेवण आणि एक रुपया भत्ता देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

तेव्हा स्वयंसेवक व्हायचे म्हणून शेकडो लोक आले. गोएंका यांनी त्यांची नावे लिहून घेतली आणि ती सगळी नावे पोलिसांना दिली. तळवलकर यांना या मागचे कारण समजले नाही. तेव्हा रामनाथ गोएंका हसत हसत म्हणाले,

“दोन वेळचे जेवण आणि दिवसाला एक रुपया इतक्यावर लफंग्याखेरीज काम करायची कोणाची तयारी असणार? म्हणून पोलिसांना यादी दिली. परिणामत: चोरीची एकही तक्रार आली नाही.”

असे होते रामनाथ गोएंका. एक काळ गाजवलेल्या या जेष्ठ पत्रकाराचा आज स्मृतिदिन. अजूनही त्यांच्या नावाने पत्रकारितेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा पुरस्कार भारतात मानाचा समजला जातो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.