राणेंच्या स्वप्नात नव्हतं तेव्हा कालनिर्णयवाल्या साळगावकरांनी भविष्यवाणी केली होती..

मुंबईत राहणारे जयंतराव साळगावकर दहावी पास होते. त्यांनी ज्योतिषशास्त्रीय ज्ञान आणि प्रिंटींगमधल्या आपल्या कौशल्यांचा वापर करुन २६०० रुपयांची गुंतवणूक केली आणि १९७३ मध्ये आपल्या दिनदर्शिकेच्या प्रती बनवल्या. एक वेगळा दृष्टिकोन आणि दृढनिश्चयासोबत ते विक्रेत्यांकडे आपली कॅलेंडर विकण्यासाठी गेले, परंतु कोणीही त्यांना ऍडवान्स दिला नाही. पण जयंतराव थांबणाऱ्यातले कुठे होते, त्यांनी तर भारताच्या कॅलेंडर सिस्टीममध्ये क्रांतीचा आधीच अंदाज घेतला होता.

यातूनच कालनिर्णयची सुरवात झाली.

मराठी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, तामिळ आणि तेलगू अशा सात भाषांमध्ये उपलब्ध असलेलं कालनिर्णय हे जगातील सर्वात मोठं प्रकाशन म्हणून ओळखलं जातं.

शब्दकोड्यापासून सुरवात करणाऱ्या ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकरांचा संचार सर्व क्षेत्रात होता. पुलं देशपांडे, गदि माडगूळकर यांच्या सारख्या साहित्यकापासून ते बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्या सारख्या नेत्यांपर्यंत नाना प्रकारचे महानुभाव त्यांचे मित्र होते. यात अनेक नास्तिक मंडळी देखील होती पण साळगावकरांचं व्यक्तिमत्वच एवढं अफाट होतं की त्यांच्याशी गप्पा मारताना आपले सर्व पूर्वग्रह गळून पडत असत.

साळगावकरांचं मूळ गाव होत सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मालवण. १९९० सालच्या विधानसभा निवडणुकांवेळी मालवण मधून शिवसेनेचे तरुण तडफदार नेते नारायण राणे उभे होते. मुंबईत सेना स्थापन झाली तेव्हा रस्त्यावर उतरून लढा देणाऱ्या शिवसैनिकापासून सुरवात करणारे राणे. त्यांच्याकडे जेव्हा बाळासाहेबांनी मुंबईचे परिवहन असणारी बेस्ट सोपवली तेव्हा त्यांनी आपल्या कामगिरीचा चमत्कार करून दाखवला. सर्वत्र त्यांचं नाव गाजू लागलं.

मुंबईपुरतीच मर्यादित असणाऱ्या सेनेला ग्रामीण भागात पोहचवण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसैनिकांना गावाकडे तिकिटे दिली आणि आमदारकी लढवायला सांगितलं. खरं तर मूळ गाव कणकवली असूनही राणेंच तरुणपण मुंबईतच गेलं होतं. तरीही त्यांनी जिद्दीने निवडणूक लढवली. काँग्रेसच्या तोंडातून मालवणची जागा खेचून आणली.

नारायण राणे यांचा मालवण मध्ये गावोगावी सत्कार होत होता. एकदा अशाच एका कार्यक्रमाला जयंत साळगावकर हे देखील उपस्थित होते. राणेंचा आणि त्यांचा जुना परिचय होता. अनेकदा गणेशोत्सवात त्यांच्या घरी बसणाऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी राणे हमखास जायचे.

राणे त्याकाळातली आठवण सांगतात,

एके दिवशी साळगावकरसाहेब आणि मी शिवाजी मंदिर येथे एका गावाच्या ग्रामविकास मंडळाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित होतो. त्या समारंभामध्ये भाषण करीत असताना त्यांनी आपल्या भाषणातून माझे भविष्य वर्तविले होते. त्या ठिकाणी ते म्हणाले की,

नारायण राणे मालवणचे आमदार आहेत आणि भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत.

नारायण राणे यांची आमदारकीची ही पहिलीच टर्म होती. नारायण राणे राहिले लांब खुद्द शिवसेनेला आपण सत्तेत कधी जाऊ यावर विश्वास नव्हता. राणेंच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याने स्वप्नात देखील कधी मुख्यमंत्री होऊ असा विचार केला नसेल पण ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर मात्र म्हणत होते एक ना एक दिवस तुम्ही मुख्यमंत्री बनणार.

पुढच्या काहीच वर्षात जादूच्या कांडीप्रमाणे दिवस बदलत गेले. १९९५ साली सेना भाजपची सत्ता आली. राणे मंत्री बनले. चार वर्षात आपल्या कामाच्या झपाट्याने बाळासाहेबांचा विश्वास संपादन केला. १९९९ साली जेव्हा मनोहर जोशींच्या जागी नवा मुख्यमंत्र्यांची निवड करायची वेळ आली तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी राणेंची निवड केली.

नारायण राणे म्हणतात,

माझी ज्या वेळी राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर निवड झाली त्या क्षणी मला साळगावकरांच्या या भाकिताची आठवण झाली. माझ्यासारख्या तरुणांमध्ये एखादी महत्त्वाकांक्षा निर्माण करून ती महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याबद्दलचे मार्गदर्शन त्यांनी केल्यामुळे मी माझ्या महत्त्वाकांक्षेपर्यंत पोहोचू शकलो.

हे हि वाच भिडू

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.