NDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे

‘प्राइम टाइम विथ रवीश’, ‘देस की बात’ आणि ‘हम लोग’ हे शो देशभरात गाजवलेला पत्रकार म्हणजे रवीश कुमार. एक हुशार, निर्भीड आणि यशस्वी पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवण्यात ते कधीच मागे राहिले नाहीत. काल रविश कुमार यांनी NDTV मधल्या त्यांच्या वरिष्ठ कार्यकारी संपादक या पदावरूम राजीनामा दिला आणि सगळ्या न्यूज चॅनल्सची हेडलाईन बनले.

तब्बल 26 वर्ष एन डी टी व्ही सोबत काम केल्यानंतर त्यांनी एन डी टी व्ही सोबतचा प्रवास थांबवला. 

रवीशकुमार यांची लोकप्रियता बघता त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणं महत्वाचं आहे. 

बिहारमध्ये जित्वरपूर या गावात 5 डिसेंबर 1974 रोजी रवीश यांचा जन्म झाला. पटण्यामध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण पुर्ण केलं आणि मग उच्च शिक्षणासाठी दिल्ली गाठली. ग्रॅज्यूएशन पुर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीमध्येच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन मधून हिंदी पत्रकारितेत मास्टर्स केलं. दरम्यान, शिक्षण सुरू असतानाच त्यांना पत्रकारितेत नोकरी असल्याचं समजलं आणि त्यांनी ती नोकरी मिळवली.

रवीश कुमार यांची पहिली नोकरी काय होती ते वाचून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.

पत्रकारितेतल्या पहिल्या नोकरीमध्ये त्यांना देण्यात आलेलं काम होतं ते , पत्र सेग्रीगेट करण्याचं. आता ही पत्र कसली होती? डीडी वर सुरू असलेला शो ‘गूड मॉर्निंग इंडिया’ या शोसाठी प्रेक्षकांकडून येणारी पत्र ते सेग्रीगेट करायचे. “हे काम करताना मला प्रेक्षकांचे विचार आणि प्रेक्षकांना पत्रकारांकडून नक्की काय अपेक्षित आहे हे लक्षात आलं” असं रवीश कुमार यांनी आऊटलूकला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.

साधारण 5 महिने पत्र सेग्रीगेट केल्यानंतर त्यांना एनडीटीव्ही मध्ये डेस्क जॉब मिळाला. अर्थात ते कंप्यूटरसमोर बसून काम करत असले तरी त्यांचं डोकं हे विचारांनी भरलेलं होतं. “न्यूज रूममध्ये प्रत्येक बातमीविषयी मी चर्चा करायचो आणि एखाद्या बातमीची जर एकच बाजू कोणी पाहिली तर, त्याचा मला राग यायचा” असंही कुमार सांगतात.

ज्यावेळी त्यांना टीव्हीवर दिसून पत्रकारिता करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायला सुरूवात केली. रवीश की रिपोर्ट या त्यांच्या शोमुळे त्यांना पत्रकारितेत स्वत:ची ओळख मिळाली. एनडीटीव्ही वरील प्रमुख अँकर म्हणून समोर येऊ लागले. ‘प्राईम टाईम विथ रवीश’ हा शो ही त्यांना मिळाला. ‘हम लोग’ ‘देश की बात’ हे त्यांचे शो चांगलेच चर्चेत राहिले. त्यांनी सतत आपल्या पत्रकारितेतून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले.

त्यांच्या आजवरच्या पत्रकारितेच्या बळावर त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेत.

2019 साली त्यांना आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळख असलेला ‘रॅमन मॅगसेस पुरस्कार’ देण्यात आला. हा पुरस्कार धाडसी आणि परिवर्तनवादी व्यक्तींना देण्यात येतो. हा पुरस्कार देताना रॅमन मॅगसेस संस्थेनं त्यांचा उल्लेख ‘वॉईस टू द वॉईसलेस’ असा केला.

याशिवाय, 2010 मध्ये गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कार, 2013 आणि 2017 मध्ये रवीश यांना पत्रकारितेतील प्रतिष्ठित असलेला रामनाथ गोयंका अवॉर्ड, 2016 मध्ये रेड इंक अवॉर्ड्स कडून सर्वोत्कृष्ट पत्रकार अवॉर्ड आणि 2017 मध्ये ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नैयर यांच्या नावे सुरू केलेला पहिला पुरस्कारही रवीश कुमार यांना मिळाला.

सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत असताना अनेक राजकीय व सामाजिक शक्तींसोबत त्यांचं अप्रत्यक्ष वैर निर्माण झालं. 

त्याचाच परिणाम म्हणून आजवर त्यांना जीवे मारण्याच्या अनेक धमक्या आल्यात. द हिंदू या माध्यमानं प्रसिद्ध केलेल्या रीपोर्टनुसार 2018 मध्ये, ‘उत्तर प्रदेशातील जौनपूरमधल्या बजरंग दलचा कार्यकर्ता असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीनं रवीश कुमार यांना त्यांच्या राहत्या घराचा पत्ता, घरापासून ऑफिसपर्यंत जाण्याचा मार्ग सांगत त्यांना ठार मारण्याची आणि त्यांच्या कुटुंबातील महिलांवर बलात्कार करण्याची धमकी दिली ​​होती.

केवळ पत्रकारच नाही तर, लेखक म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांची प्रकाशित झालेली पुस्तकं  म्हणजे ‘द फ्री व्हॉईस, बोलना ही है, इश्क मे शहर होना, देखते रहीये, रवीशपंती. 

राजीनामा दिल्यानंतर रवीश कुमार यांनी आज सकाळी एक ट्वीट केलंय. जे अतिशय बोलकं ट्विट आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय, ‘माननीय जनता, मेरे होने में आप सभी शामिल हैं। आपका प्यार ही मेरी दौलत है। आप दर्शकों से एकतरफ़ा और लंबा संवाद किया है। अपने यू- ट्यूब चैनल पर। यही मेरा नया पता है। सभी को गोदी मीडिया की ग़ुलामी से लड़ना है।’ त्यांच्या या ट्वीटवरून हे स्पष्ट होतं की, अदानी समुहानं एन.डी.टी.व्ही ची सुत्र हाती घेतल्यामुळं आणि अदानी समुह आणि पंतप्रधान मोदींचे जवळचे संबंध लक्षात घेऊन रवीश कुमार यांनी राजीनामा दिलाय. इथून पुढे ते त्यांच्या वैयक्तिक यु-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून पत्रकारिता करत राहतील. 

रवीशकुमार यांच्या युट्युब चॅनलची लिंक 

https://www.youtube.com/@ravishkumar.official

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.