अन् कानेटकरांना नाटकासाठी नाव सुचलं, ‘ रायगडाला जेव्हा जाग येते’

भिडूंनो, भारतीय सिनेसृष्टी कशी बदलली आहे हे आपण पाहत आहोत. आधुनिकता आली असली तरी सिनेमाचे विषय, त्यातली सामाजिकता यामुळे जगभरात भारतीय सिनेसृष्टीचं स्वतःचं असं वेगळं स्थान आहे.

पण भिडूंनो, खूपदा सिनेमा आपल्याला इतका आकर्षित करतो की नाटक या माध्यमाकडे आपलं दुर्लक्ष होतं. मराठी रंगभूमी ही तर अनेक सकस आणि चांगल्या नाटकांनी परिपूर्ण अशी रंगभूमी आहे.

आपल्या मराठी रंगभूमीवर अनेक दिग्गज नटश्रेष्ठ मंडळींचा सोनेरी इतिहास आहे. उत्तमोत्तम नाटककार आपल्या रंगभूमीला लाभले आहेत.

असाच एक नाटककार म्हणजे वसंत कानेटकर.

बालगंधर्व, केशवराव भोसले, दिनानाथ मंगेशकर यासारख्या नटश्रेष्ठ कलाकारांनी मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांचे संस्कार केले. काळ बदलत होता, त्यामुळे संगीत नाटकाचं रुपांतर झालं. संवादांची जुगलबंदी, प्रसंगांचे ताणतणाव यांसारख्या गोष्टींनी परिपूर्ण असलेली नाटकं रसिकांचं मनोरंजन करू लागली.

रंगभूमीच्या या बदललेल्या काळात एक नाटककार सातत्याने नवनवीन आणि कल्पक विषय रंगभूमीवर आणत होता. तो नाटककार होता वसंत कानेटकर.

कानेटकरांच्या घरी मराठी साहित्याचं उत्तम वातावरण होतं. त्यांचे वडील शंकर कानेटकर. ते कवी गिरीश या टोपणनावाने कविता लिहायचे. वडिलांकडून मिळालेला साहित्याचा वारसा कानेटकरांनी पुढे चालवला.

इंग्रजी विषयात एम. ए. केल्यानंतर कानेटकरांनी नाशिक येथील हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालयातून जवळपास २५ वर्ष शिकवण्याचं काम केलं. असं म्हणतात की,

कानेटकरांचं शिकवणं इतकं सुंदर असायचं की त्यांचा विषय न घेतलेले विद्यार्थी सुद्धा त्यांचं शिकवणं अनुभवायला त्यांच्या वर्गात बसायचे.

साधारण १९६० नंतर कानेटकरांनी मराठी नाटकं लिहिण्याकडे स्वतःचं लक्ष केंद्रित केलं.

कानेटकरांच्या नाटकांची वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या नाटकांची नावं. ‘अश्रूंची झाली फुले’, ‘संगीत मत्स्यगंधा’, ‘इथे ओशाळला मृत्यु’ अशी नाटकं कानेटकरांनी लिहिली. या नाटकाच्या शीर्षकावर नजर टाकल्यास तुम्हाला कळून येईल की किती वेगळी आणि कल्पक नावं कानेटकरांनी त्यांच्या नाटकांना दिली आहेत.

परंतु एका नाटकाच्या नावाचा मात्र कानेटकांना खूप विचार करावा लागला होता.

असं नव्हतं की मराठी रंगभूमीवर ऐतिहासिक नाटकं झालीच नव्हती. परंतु कानेटकरांनी लिहिलेल्या नाटकांमुळे मराठी रंगभूमीवर ऐतिहासिक नाटकांना नवी झळाळी मिळाली. असंच एक वेगळ्या विषयावरचं ऐतिहासिक नाटक कानेटकर मराठी रंगभूमीवर आणू पाहत होते.

या नाटकातून प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातलं पिता – पुत्राचं नातं कानेटकर मांडू पाहत होते.

या नाटकाचं दिग्दर्शन दत्ताराम वळवईकर अर्थात मास्टर दत्ताराम करणार होते. मास्टर दत्ताराम हे दिग्गज कलावंत आणि उत्तम नाट्यदिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध. मराठी नाट्यक्षेत्रातील सर्वजण मास्टर दत्ताराम यांना आदराने पाहत असत.

वसंत कानेटकरांनी हे ऐतिहासिक नाटक दिग्दर्शनासाठी मास्टर दत्ताराम यांच्याकडे राजीखुशी सुपूर्त केलं.

कानेटकरांचं नाटक लिखाणात अव्वल झालं होतं. परंतु या नाटकाला नाव काय असावं, याबाबतीत कानेटकर संभ्रमात होते.

मास्टर दत्ताराम कलाकारांच्या तालमी घ्यायचे. त्या तालमीला लेखक म्हणून कानेटकर सुद्धा उपस्थित असायचे.

त्यावेळेस ‘स्वराज्यसंग्राम’, ‘सह्याद्रीचा राज्याभिषेक’, ‘राज्याभिषेक’ अशी नावं कानेटकरांना सुचत होती. परंतु नाटकाचा विषय इतका भारदस्त होता की ही नावं विषयाला अनुसरून नाहीत, म्हणून मास्टर दत्ताराम यांना ही नावं पसंत पडली नाहीत.

एकदा चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेताना कानेटकर आणि मास्टर दत्ताराम नाटकाच्या नियोजनासंबंधी गप्पा मारत बसले होते. तेव्हा सहज गप्पा मारताना

‘तुमच्या शब्दांमध्ये उभा महाराष्ट्र खडबडून जागा करण्याची ताकद आहे’,

असं मास्टर दत्ताराम कानेटकरांना म्हणाले. हे ऐकताच कानेटकर क्षणभर थबकले. त्यांनी मास्तर दत्ताराम यांनी उचारलेल्या वाक्याचा पुन्हा मनात स्वतःशी विचार केला.

आणि त्यांना नाव सुचलं ‘रायगडाला जेव्हा जाग येते’.

हे नाव मास्टर दत्ताराम यांनाही खूप आवडलं.

१९६२ साली हे नाटक रंगभूमीवर झालं. ज्या गिरगावात नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार होता तिथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. हे नाटक मराठी रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

या नाटकाद्वारे एक उत्तम कलावंत मराठी नाटकाला आणि सिनेसृष्टीला मिळाला तो कलाकार म्हणजे डॉ. काशिनाथ घाणेकर. काशिनाथ घाणेकरांनी साकारलेली छत्रपती संभाजीची भूमिका प्रचंड गाजली.

अभिजीत देशपांडे दिग्दर्शित ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमात हा प्रसंग पाहायला मिळतो.

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकानंतर सुद्धा वसंत कानेटकरांनी अनेक नाटकं लिहिली. मुळात संभाजीच्या दृष्टिकोनातून विचार करून एक नाट्यकलाकृती निर्माण करणारे वसंत कानेटकर हे बहुदा पहिलेच नाटककार असावेत.

कानेटकरांसारख्या नाटककारांनी इतकी आशयघन नाटकं लिहिली म्हणून आजही मराठी रंगभूमी जगभरात नावाजली जाते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.